You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ABP न्यूज प्रकरण संसदेतही गाजलं; माध्यमांवर सरकारी दबाव असल्याचा दावा
- Author, फैजल मोहम्मद अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ABP टीव्ही चॅनलशी निगडीत एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. शुक्रवारी लोकसभेत हा विषय चर्चेला आला.
दोन दिवसांपूर्वी ABP न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी राजीनामा दिला होता. तसंच, मास्टर स्ट्रोक कार्यक्रमाचे अँकर पुण्यप्रसून वाजपेयी यांनीही राजीनामा दिला. अँकर अभिसार शर्मा यांना काही दिवसांसाठी 'ऑफ एअर' केल्याच्या बातम्याही येत आहेत. यावरून संसदेत मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला धारेवर धरलं.
लोकसभेच्या सभागृहात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चॅनलच्या व्यवस्थापकीय संपादकांना आणि एका अँकरला राजीनामा देण्याचा मुद्दा उचलला. अशा राजीनामा द्यायला लावणं म्हणजे, मीडियाला 'धमकावणं' आणि त्यांचं 'तोंड बंद ठेवण्या'चा प्रकार असल्याचं सांगितलं.
खरगे यांनी दावा केला की, 'राज्यसभेच्या एका वरिष्ठ सदस्यानं संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मीडियाला आव्हान देत सांगितलं होतं की, जर तुम्ही आमच्या विचारांप्रमाणे चालणार नसाल तर आम्ही तुमचं चॅनल बंद करून टाकू.'
केंद्रीय सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यावर उत्तर देताना म्हणाले, "हे त्या चॅनलचं अंतर्गत प्रकरण आहे. याचा सरकारशी काहीही संबंध नाही. त्या चॅनलचा TRP हा कायम खालीच पडत होता. ते चॅनल कोणी पाहतही नव्हतं."
राठोड यांनी कोणत्याही चॅनलचं नाव न घेता सांगितलं की, "खरगे ज्या चॅनलबद्दल बोलत आहेत, त्यांनी आधी चुकीची बातमी चालवली, पण सरकारने त्यांना कोणतीही कारणे दाखवा नोटीस बजावली नाही. पण, जे काही झालं त्यामुळे त्यांची लोकप्रियता घसरली असावी."
काय आहे एबीपी प्रकरण?
गेल्या दोन दिवसांत सोशल मीडियावर एक बातमी पसरली की, 'मास्टर स्ट्रोक' नावाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधानांचा एक दावा कसा चुकीचा आहे हे दाखवलं आणि त्यावरून चॅनल व्यवस्थापनावर दबाव आहे.
गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये दावा केला होता की, सरकारच्या स्कीममुळे चंद्रमणी कौशिक यांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे. पण, ABPच्या रिपोर्टरने जेव्हा छत्तीसगडच्या या महिलेकडून स्वतः माहिती घेतली, तेव्हा तिला आपल्याला कसं बोलायचं त्याबद्दल बजावण्यात आल्याचं तिने सांगितलं.
पंतप्रधानांच्या शेतकऱ्यांशी थेट संवादात तिचं उत्पन्न दुप्पट झाल्याचं तिनं स्वतः सांगितलं होतं.
सरकार प्रश्नोत्तरांच्या फेऱ्यात
यानंतर सोशल मीडियावर अनेक लोक तक्रारी करू लागले की, मास्टर स्ट्रोक कार्यक्रम सुरू होताच चॅनलवर अडथळे निर्माण होतात. त्यामुळे या वेळात हे चॅनल नीट पाहता येत नाही.
दोन दिवसांपूर्वी ABP न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी राजीनामा दिला होता. तसंच, मास्टर स्ट्रोक कार्यक्रमाचे अँकर पुण्यप्रसून वाजपेयी यांनीही राजीनामा दिला. अँकर अभिसार शर्मा यांना काही दिवसांसाठी 'ऑफ एअर' केल्याच्या बातम्याही येत आहेत.
दरम्यान, या तिघांनीही चॅनलमध्ये झालेल्या या बदलांबद्दल स्वतःहून कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पण, यामुळे माध्यमांवर असलेल्या दबावाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.
मिलिंद खांडेकर यांनी ट्वीट करून ABP न्यूज सोडल्याबद्दल सांगितलं. पण, चॅनलबद्दल कोणतंही मत व्यक्त केलं नाही.
आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये सांगितलं की, "स्वतंत्र मीडियाला संपवण्याचा मोदी सरकारचा घाट आहे." तर, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याला 'ऑपरेशन कमळ' असं संबोधलं.
दरम्यान, काहींनी काँग्रेस पक्षावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इतिहासात ज्या काँग्रेस पक्षाकडून मीडियावर बंधनं लादली गेली होती, तो पक्ष आता मोदींच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून काय सिद्ध करू पाहत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)