You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोलादपूर अपघात : '...आणि आमचा व्हॉटसअॅप ग्रुप अचानक शांत झाला'
- Author, मुश्ताक खान आणि स्वाती पाटील-राजगोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी पोलादपूरहून
"आजारी असल्याने शेवटच्या क्षणी मी या सहलीला गेलो नाही. पण मी आमचा व्हॉटसअॅप ग्रुप सतत पाहात होतो. सगळे त्यावर आजूबाजूच्या निसर्गाचे फोटो टाकत होते. शेवटचा मेसेज सकाळी 9.30ला आला. यावेळी ते नाश्त्यासाठी थांबणार होते. पण काही वेळाने ग्रुपवरील सर्व मेसेज थांबले. अचानक ग्रुप शांत झाला. मी मेसेज टाकूनही कुणी प्रतिसाद दिला नाही. अखेर 12.30ला फोनंच आला!"
दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी प्रवीण रणदिवे सांगत होते. याच विद्यापीठाचे 31 कर्मचारी दोन दिवस सलग सुटी असल्याने सहलीसाठी शनिवारी सकाळीच महाबळेश्वरकडे निघाले होते. पण शनिवारी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर इथं अंबेनळी घाटात बस दरीत कोसळली नि काळाने घात केला. ड्रायव्हरसकट 30 जणांचा बळी गेला.
रणदिवे यांची तब्येत बिघडल्याने शेवटच्या क्षणी ते या सहलीत सहभागी होऊ शकले नाहीत. PTI वृत्तसंस्थकडे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. व्हॉट्सअॅप ग्रुपवरील संवाद अचानक का थांबला, हे त्यांना समजू शकले नाही. "पण दुपारी 12.30च्या सुमारास जे समजलं ते निव्वळ धक्कादायक होतं. आता मी माझ्या मित्रांना कधीही पाहू शकणार नाही," असं ते म्हणाले.
सहलीला गेलेल्यांपैकी या अपघातातून बचावलेले एकमेव म्हणजे विद्यापीठातील सहाय्यक अधीक्षक प्रकाश सावंतदेसाई.
शनिवारी सकाळी 11.30च्या सुमारास हा अपघात झाला. नेमका अपघात कसा झाला, हा घटनाक्रम एका व्यक्तीला सांगताना सावंतदेसाई यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर आला. "मी गाडीतून फेकला गेलो. एका झाडावर अडकलो, पण ती बस खाली गेली. ती फांदी मोडली असती तर मीसुद्धा दरीत गेलो असतो," असं ते या व्हिडिओत सांगताना दिसतात.
कठडे असते तर...?
आंबेनळी घाटात पावसाळ्यात सतत पाऊस आणि दाट धुकं पाहायला मिळतं. मात्र घाटात संरक्षक कठडे नसल्याने आणि पावसाच्या पाण्याने जमीन अशी निसरडी झाल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात, असं स्थानिकांच म्हणणं आहे.
"जर इथे भिंतीचं किंवा लोखंडाचं संरक्षक कठडे असते तर गाडी त्याला धडकून रस्त्यावरच थांबली असती, अशी थेट खाली नसती गेली," असं घटनास्थळापासून जवळच असलेल्या दाबिल गावचे भाऊसाहेब परब म्हणाले. "हा रस्ता जर मोठा झालाच पाहिजे व्यवस्थित. इथे असे अपघात होत असतात."
'सहल आयत्यावेळी रद्द केली'
महाबळेश्वर येथील गहू संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी 38 कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे गाडीची परवानगी मागितली होती. पण "काही जणांचं जाणं कँसल झालं. बसमध्ये तितक्या सीट नव्हत्या," असं सावंतदेसाई यांनी अपघातानंतर सांगितलं. म्हणून 31 कर्मचारी लोकच अखेर रवाना झाले.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे स्वीय सहाय्यक सुनील दळवी हेही विद्यापीठाचे कर्मचारी आहेत. तेही या सहलीला जाणार होते.
दळवी म्हणाले, "27 जुलैला कदम यांचा वाढदिवस असल्यामुळे मला रात्री दापोलीकडे निघायला उशीर झाला. सुरुवातीला मी त्यांना पोलादपूरला भेटणार होतो. पण नंतर मी सातारामार्गे महाबळेश्वरला येतो, असं त्यांना कळवलं. पण माझी त्यांच्याशी भेट काही होऊ शकली नाही."
दोन दिवसांची सुट्टी असल्यामुळे रत्नागिरी थिबा पॅलेस जवळ राहणारे हेमंत सुर्वे खरंतर घरी जाणार होते. पण महाबळेश्वरचा दौरा ठरल्यामुळे घरी येऊ शकत नाही, असं कुटुंबीयांना कळवून ते महाबळेश्वरला गेले. त्यांचा तो संवाद शेवटचाच ठरला.
विद्यापीठाच्या आस्थापना शाखेत कार्यरत असलेले चंद्रनगर येथील नीलेश तांबे आणि पंकज कदम या दोघांच्या पत्नी गरोदर आहेत. आता या मुलांना त्यांच्या वडिलांचा चेहरा कसा पाहता येईल, असं म्हणत नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
हर्णे येथील रोशन तबीब यांचं तर गेल्या मार्चमध्येच लग्न झालं होतं.
मदतकार्य करणारे 'ते' हात...
अपघातातील मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इथलं वातावरण सुन्न करणारं आहे. बीबीसी मराठीसाठी या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या स्वाती राजगोळकर - पाटील यांनी त्यांच्या या मदतकार्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्या सांगतात, "आम्ही मदतकार्याच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा जे दृश्य पाहिलं ते विचलित करणारं होतं. काल दुपारपासून मृतदेह बाहेर काढण्याचं सुरू होतं. जसे मृतदेह बाहेर येतील तसे जवळच उभ्या असलेल्या अॅम्ब्युलन्समधून पोलादपूरला पाठवण्यात येत होते. हातात हँडग्लोव्स घालून दरीतून येणारे मृतदेह वर ओढले जात होते. दरीतून वरपर्यंत पाच टप्पे करण्यात आले होते. प्रत्येक टप्प्यापर्यंत मृतदेह ओढत-ओढत वर आणले जात होते. कित्येक तासांपासून राबणारे हे हात त्याच वातावरणात मिळेल ते खात होते. त्यातच बराच काळ झाल्यानं मृतदेहांचा वासही सहन होत नव्हता. त्यातही मदतकार्य पावसा-पाण्यात अविरत सुरूच आहे."
S. R. शिंदे हे नेहमी या ग्रुपबरोबर फिरायला जातात. पण नातेवाईकांकडे कुडाळला गेल्याने ते या सहलीला जाऊ शकले नाहीत. पण सहलीसाठी जाणार म्हणून शिंदे यांचं नावंही 38 जणाच्या यादीत होतं.
या घटनेची माहिती कळताच गेल्या 24 तासात त्यांना किमान 800 ते 900 जणांचे फोन आलेत, असं त्यांनी सांगितलं.
नीलेश जाधव आणि शशी येलवे यांचंही जाणं आयत्यावेळी रद्द झालं.
गोरक्षनाथ तोंडे आणि श्रीकांत तांबे यांची नावंही आधी मृतांच्या यादीत जाहीर झाली होती. श्रीकांत तांबे म्हणाले, "माझ्या घरात नातेवाईक आणि मित्रांची गर्दी झाली होती. सतत माझा फोन वाजत आहे. कुठली शाहनिशा न करता माझं नाव मृतांच्या यादीत टाकल्याने आम्हाला मानसिक त्रासाला समोरं जावं लागलं."
मदतकार्य थांबवलं
शनिवारी घटनेची माहिती मिळताच रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी स्वतः घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले होते. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "माहिती मिळताच आम्ही तातडीने महाड आणि पोलादपूर इथले बचाव पथकं घाटाकडे पाठवली. त्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय मदत पथकही घटनास्थळी पोहोचले. महाबळेश्वर इथले ट्रेकर्सही मदतकार्यात साथ देत आहेत."
दुपारी 1 वाजता मदतकार्य थांबवण्यात आलं. 30 मृतदेह सापडले असून सर्व बाहेर काढण्यात आले आहेत. पाऊस आणि दाट धुक्यामुळे NDRFचे जवान, ट्रेकर्स आणि स्थानिक लोकांना मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते.
बीबीसीशी बोलताना NDRF टीमचे डेप्युटी कमांडर वैरव भैरवनाथ म्हणाले, "काल आम्हाला साधारण 1.30 वाजता कॉल आला आणि आम्ही इथे संध्याकाळी 6.30 ला पोहोचू शकलो. तोवर इथल्या सह्याद्री टेकर्सच्या स्वयंसेवकांनी 14 मृतदेह बाहेर काढले होते. आम्ही रात्रभर मदतकार्य सुरू करायचं ठरवलं म्हणून तसे फ्लडलाईट लावले."
"आम्ही जवळजवळ 600 फीट खोल दरीत उतरलो आणि बसपर्यंत पोहोचलो. रात्रभरात आम्ही बसचा काही भाग कापून आणखी सहा मृतदेह बाहेर काढले," असं ते पुढे म्हणाले.
दरम्यान, या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच अपघातातील जखमींचा उपचाराचा खर्चही शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ संजय भावे यांनी विद्यापीठाने आपला कणा गमावला अशा शब्दात शोक व्यक्त केला.
या अपघातामुळे दापोलीवर शोककळा पसरली असून दापोलीतील बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)