You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'एकाच दिवशी एवढं दुःख' : पोलादपूर अपघातात गेले या गावातील सात जण
- Author, मुश्ताक खान
- Role, बीबीसी मराठीसाठी दापोलीहून
दापोली शहराला लागून असलेलं गिम्हवणे गाव 'उत्सवांचं गाव' म्हणून ओळखलं जातं. पण आता हे गाव दुःखात बुडालेलं आहे. शनिवारी अंबेनळी घाटात झालेल्या बस अपघातात ज्या 30 जणांचा मृत्यू झाला, त्यांच्यापैकी सात जण या गिम्हवणे गावचे होते.
"नियतीने आमच्यावर ही वेळ का आणली? आता आम्ही काय करायचं?" याच गावातल्या झगडे कुटुंबीयांचे हे शब्द. संतोष झगडे, सचिन झगडे, संदीप झगडे, संजीव झगडे अशी चार माणसं या कुटुंबाने गमावली.
शिवाय, राजेश सावंत, सचिन गिम्हावणेकर आणि विक्रांत शिंदे यांच्यावरही काळाने झडप घेतली. हे सातही जण पस्तिशीच्या आतील होते.
आपली व्यक्ती गमावलेल्या या कुटुंबीयांबद्दल माहिती घेताना आम्हाला अनेक हृदयद्रावक गोष्टी कळल्या.
सचिन चंद्रकांत झगडे यांना एका वर्षाची मुलगी आहे. संदीप झगडे यांचा मुलगा 11 वर्षांचा मुलगा तर दोन वर्षांची मुलगी आहे. संतोष झगडे यांना 11 आणि 9 वर्षांच्या मुली आहेत. संजीव झगडे यांनाही आठ आणि सात वर्षांच्या मुली आहेत.
"आम्हाला हे दुःख पचवणं खूपच जड जातंय, एकाच दिवशी एवढं दुःख चुकूनही कुणाला मिळू नये. आता या मुलांपुढे भविष्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे," असं नातेवाईक सुभाष झगडे म्हणाले.
"हे सातही जण गेल्यामुळे केवळ वाडीचंच नाही तर संपूर्ण गावाचं नुकसान झालं आहे," असं प्रभाकर झगडे सांगत होते. "वाडीत किंवा गावात कोणतंही कार्य असो, हे सगळे त्यात हिरिरीने सहभागी व्हायचे. संतोष, सचिन, संदीप आणि संजीव यांच्या असण्याने गावातलं वातावरण कायम आनंदी राहायचं. या सर्वांच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे."
"एका क्षणात कसं होत्याचं नव्हतं होतं, हे आम्ही प्रत्यक्षात अनुभवतोय" अशा शब्दात माजी सरपंच अर्चना येलवे यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. "आमच्या बाबतील जे घडलं आहे ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये," असंही त्या म्हणाल्या.
नोकरीत सामावण्याची मागणी
या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर विद्यापीठाने नोकरीत सामावून घ्यावं, अशी मागणी गिम्हवणे गावचे सरपंच रोशन मंडपे यांनी केली आहे. "या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यासाठी शासनानेही हातभार लावावा," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या 30 पैकी 23 कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्यात येईल. त्याशिवाय उर्वरित 7 जण जे वर्ग-2 मध्ये येतात, त्यांच्या वारसांना देखील विशेष बाब म्हणून नोकरीत सामावून घेण्यात येईल, असं पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितलं.
राज्यपाल C. विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्याशी आपली चर्चा झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत बोलणार असल्याचं वायकर म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)