पोलादपूर अपघात : 'ती फांदी मोडली असती तर मी बससोबत खाली गेलो असतो'

पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान असलेल्या अंबेनळी घाटात शनिवारी झालेल्या मोठ्या अपघातात 30 जण दगावले तर एक व्यक्ती वाचली आहे. अंबेनळी घाट रायगड जिल्ह्यात आहे.

हे सर्व 31 जण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. दोन दिवसांच्या सलग सुटीमुळे ते सहलीसाठी शनिवारी सकाळीच महाबळेश्वरच्या दिशेने निघाले होते.

सहलीला रवाना होण्यापूर्वीचं त्यांचं छायाचित्रं सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केली आहेत. सहलीच्या ठिकाणी पोहोचण्याआधीच त्यांची बस सुमारे 800 फूट खोल दरीत कोसळली.

रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी हे स्वतः अपघातस्थळी हजर होते. तिथून बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की "सकाळी 11.30 वाजता हा अपघात घडला. या अपघातातून एक व्यक्ती वाचली. त्या व्यक्तीनं दरीतून वर येत संपर्क साधल्याने या अपघाताची माहिती सर्वांना मिळाली." प्रकाश सावंतदेसाई असं या व्यक्तीचं नाव आहे.

घटनास्थळी मदत कार्यात सहभागी असलेले सह्याद्री टेकर्सचे राहुल वारंगे यांनी सांगितलं की, "आज रात्रभर बचावकार्य सुरू राहणार आहे. सध्या लाईटची उपाययोजना करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 14-15 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. गेल्या दोन-तीन तासांत एकही मृतदेह हाती लागलेला नाही."

अपघातातून वाचलेले हे प्रकाश सावंतदेसाई हे काही लोकांशी चर्चा करत असतानाचा व्हीडिओ पण सोशल मीडियावर आला. यात त्यांनी अपघात कसा झाला याची माहिती दिली. व्हीडिओतील प्रकाश सावंतदेसाई आणि त्यांच्यासमोरील व्यक्तींच्या यांच्यात झालेला संवाद पुढीलप्रमाणे -

"ती फांदी पावसामुळे मोडली असती तर मीही त्यांच्याबरोबर खाली गेलो असतो."

"मग तुम्ही पुढं काय केलं?"

"मी बसून राहिलो. त्या झाडावरनं अंदाज घेतला कुठं काय आहे. बुंध्याशी गेलो आणि जे सापडेल ते पकडत-पकडत मातीत हात रोवत पाय रोवत वरती आलो."

"मग तू फोन केला?"

"हो. गाड्यांचे आवाज आले. ही पलटी झालेली. खालच्या धबधब्याला जे होते, ते आले धावत. त्यातल्याच एकाने मला मोबाईल दिला आणि तो मुंबईत निघून गेला. मी त्या मोबाईलवरून पहिला फोन लावले. पोलीस स्टेशनला फोन केला. मग सगळं सुरू झालं."

"कन्फ्यूजन काय झालं, तू ज्या अर्थी सेफ आला म्हणजे बाकीचे सगळे सेफ आहेत."

"मी त्याला काहीच नाही सांगितलं."

"तुम्ही 40 जण काल जाणार होता. गाडीत 33 जण झालेत."

"बाकीचे कॅंसल केले. गाडीत सीटच कमी."

"कशामुळे झालं?"

"त्या मातीवरून सरकली गाडी. रस्त्यावर मातीचे जे टेपरे करून ठेवले आहेत ना, त्याच्यावर टायर टेकलं ना, ती गाडी डाव्या साइडला घसरतच गेली.

"मला आठवलेली नावं मी 30 काढली."

ही माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने मदत पाठवली, असं जिल्हाधिकारी सूर्यवंशींनी सांगितलं.

"माहिती मिळताच आम्ही तातडीने महाड आणि पोलादपूर इथले बचाव पथक घाटाकडे रवाना केले. त्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय मदत पथकही घटनास्थळी आले. आताच महाबळेश्वर इथले ट्रेकर्सही या ठिकाणी आले असून मदतकार्यात साथ देत आहेत," असं सूर्यवंशी म्हणाले.

"हा अपघात कशामुळे घडला याबाबत अद्याप काही सांगता येणार नाही. तांत्रिक बाबी तपासल्यानंतरच अपघात कशामुळे घडला ते कळू शकेल," असं सूर्यवंशी म्हणाले.

मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत

दरम्यान, या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच, अपघातातील जखमींचा हॉस्पिटलमधला खर्चही शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेनं ट्वीट करुन जाहीर केली.

मृतदेह काढण्यासाठी काढण्यासाठी ट्रेकर्सची मदत घेतली जात आहे. प्रशासन मदतीसाठी सर्व प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तर राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की त्यांनी मदतकार्यात सहकार्य करावं.

दरम्यान, या घटनेसंदर्भात रायगड जिल्हा प्रशासनानं संपर्कासाठी काही नंबर दिले आहेत.

  • चंद्रसेन पवार - महाड तहसीलदार- 8454997740
  • प्रदीप कुडाळ- 9422032244
  • प्रदीप लोकरे- नायब तहसीलदार रोहा- 9423090301
  • श्री.भाबड- नायब तहसीलदार माणगाव -9422382081

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)