You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आरक्षण : आंदोलनादरम्यान एका पोलिसाचा मृत्यू, डॉक्टरांनी दिली 'ही' माहिती
कायगाव टोका इथं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद पोलीस मुख्यालयाचे हेड काँस्टेबल शाम काटगावकर हे बंदोबस्तासाठी कायगाव टोका इथं आले होते. काकासाहेब शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव टोका इथल्या गोदावरी पुलावर पुन्हा आंदोलक जमले.
बारा वाजेपर्यंत वातावरण बरंच तापलं. त्याचवेळी औरंगाबाद इथून आलेल्या अग्निशमन दलाची व्हॅन आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिली. त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्याची माहिती इथं उपस्थित प्रत्यक्षदर्शी आणि पत्रकारांनी दिली.
संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तिकडे धावले. याच धावपळीत पोलीस कर्मचारी शाम काटगावकर यांना अत्यवस्थ वाटत असल्यानं तातडीनं औरंगाबादला हलवण्यात आलं. घाटी या शासकीय रुग्णालयात त्यांना आणण्यात आलं असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना माहिती दिली की, "शाम काटगावकर यांना रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला होता. आम्ही इथं कार्डियाक मसाज देण्याचाचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मृत्यू झालेला असल्यानं मृतदेह नंतर पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे."
"त्यांचा मृत्यू कशामुळे हे पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होईल. प्राथमिक तपासणीमध्ये त्यांना बाह्यमार लागलेला नसल्याचं आढळून आलं," असं डॉ. सोनवणे म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)