You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदींना दिलेली 'झप्पी' ही राहुल गांधींची 'गांधीगिरी' आहे का?
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
भाजप सरकारविरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा सुरू होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भाषणासाठी उभे राहिले आणि भाजपवर घणाघाती टीका करायला सुरुवात केली.
आधी सरकारवर टीकास्त्र सोडताना आक्रमक दिसणारे गांधी यांनी काही वेळाने वेगळ्या ट्रॅकवर गेले नि म्हणाले, "तुमच्याबद्दल माझ्या मनात काही कटुता नाही. तुम्ही मला 'पप्पू' म्हटलं तरी मी तुमचा द्वेष करणार नाही."
"तुमच्या मनातला राग मी काढून टाकीन आणि तुम्हाला मी काँग्रेसी बनवेन," असंही ते यावेळी म्हणाले आणि ते थेट सरकारी बाकांपर्यंत चालत गेले आणि अचानक पंतप्रधान मोदींना त्यांनी मिठी मारली. हा क्षण लगेच सोशल मीडियासह इतर माध्यमांवर व्हायरल झाला.
अनेकांनी या क्षणाला राहुल गांधींची 'गांधीगिरी' संबोधलं.
"शत्रूचंदेखील हृदयपरिवर्तन करावं," हा महात्मा गांधींच्या विचार राहुल गांधींनी केवळ कृतीतून नव्हे तर आपल्या भाषणातूनही लोकसभेत मांडला. याविषयी बीबीसी मराठीनं महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले, "राहुल गांधी यांनी केलेली कृती ही थेट गांधीजींच्या विचारांपासून प्रेरित आहे, असं आपल्याला लगेच म्हणता येणार नाही. पण ही भारतीयांची परंपराच आहे. जर राहुल गांधी म्हणत असतील की कटुता बाजूला सारून मी काम करायला तयार आहे, तर या गोष्टीचं आपण स्वागत करायला हवं."
वैचारिक मतभेद आणि वैयक्तिक संबंध, हे पूर्वीच्या नेत्यांच्या कामाआड येत नव्हते. पंडित नेहरू यांनी तर विरोधी पक्षातील लोकांनाही मंत्रिपदं दिल्याची उदाहरणं आहेत. पूर्वी राजकारणात कितीही वैचारिक मतभेद असले तरी नेत्यांचे एकमेकांसोबत चांगले वैयक्तिक संबंध असायचे, याकडे लक्ष वेधत तुषार गांधी म्हणाले, "भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहर लाल नेहरू आपल्या राजकीय विरोधकांविरोधात कधीही मनात कटुता ठेवत नसत. राहुल गांधी देखील त्याच परंपरेतून आले आहेत."
"गेल्या काही दिवसांतील वातावरण पाहता आपल्या लक्षात येईल की गोष्टी फक्त ब्लॅक अॅंड व्हाइट याच स्वरूपात आहेत, असं समजलं जातं. जर नेते आपले मतभेद बाजूला सारून राजकीय संबंध सुधारण्याकडे लक्ष देत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. पुन्हा पूर्वीसारखं वातावरण निर्माण होऊ शकतं," असं मत तुषार गांधी यांनी व्यक्त केलं.
ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई म्हणतात, "राहुल गांधी यांचं कृत्य हे पाहणाऱ्याला 'गांधीगिरी'सारखं वाटू शकतं. पण त्यांनी केलेल्या या साहसी कृत्यामुळं अशा लोकांवर परिणाम होऊ शकतो जे अद्याप काँग्रेस किंवा भाजपकडे पूर्णपणे झुकलेले नाहीत. इतकंच नाही तर राहुल गांधी यांना या गोष्टीची जाणीव आहे की काही लोक त्यांना 'पप्पू' म्हणतात. या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी त्यांची राजकीय प्रगल्भता दाखवली. यातून त्यांनी शत्रू आणि मित्र या दोन्ही गटांत आता त्यांनी स्वतःची एका गंभीर राजकारण्याची प्रतिमा उभी केली आहे."
राहुल गांधी प्रतिमांचा खेळ करत आहे, असा आरोप देखील त्यांच्यावर केला जात आहे. त्या संदर्भात बोलताना, ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी झी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "राहुल गांधी हे प्रतिमांचा खेळ करत नाहीयेत तर ते नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमांच्या खेळाला आव्हान देत आहेत."
"आधी प्रतिभावान या शब्दाला एक वेगळं महत्त्व होतं तर आता प्रतिमावान असा शब्द रूढ होताना दिसत आहे. संसदेच्या सभागृहामध्ये नरेंद्र मोदींनी अनेक वेळा प्रतिमांचा खेळ केला आहे. त्यालाच राहुल गांधी यांनी आपल्या शैलीत उपहासात्मक उत्तर दिलं आहे," असं कुमार केतकर म्हणतात.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)