You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावत्र भाऊ अर्जून कपूरबद्दल काय म्हणाली जान्हवी
- Author, सुप्रिया सोगले
- Role, बीबीसी हिंदीसाठी
श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर ही बहुचर्चित धडक सिनेमातून हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे.
बॉलिवुडमधल्या एका दिग्गज कुटुंबातून जान्हवी येत असल्यानं इतर स्टार किड्सप्रमाणेच अपेक्षांवर खरं उतरण्याचा दबाव तिच्यावर आहे.
बीबीसीनं जान्हवीशी संवाद साधला. त्यात तिनं स्टार किड असण्याच्या दबावाविषयी सांगितलं, "शूटिंगदरम्यान हे जाणवलं नाही. पण आता जेव्हा मी लोकांना भेटते तेव्हा हा दबाव मी अनुभवू शकते. मम्माला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला लोकांकडून भरभरून प्रेम आणि सन्मान मिळाला. त्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे. तेच प्रेम मी माझ्या कामाच्या माध्यमातून माझ्या प्रेक्षकांकडून मिळवू इच्छिते."
धडक सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जान्हवीचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सुरूवातीच्या काळात श्रीदेवी स्वतः तिच्याबरोबर उदयपूरला सुद्धा गेल्या होत्या.
शूटिंगच्या पहिल्या दिवसाविषयीची आठवण काढताना जान्हवीनं सांगितलं की, संपूर्ण शूटिंगचं वातावरण हे अगदी कौटुंबिक होतं. पण आपल्या आईसमोर कॅमेराला सामोरी जाताना ती थोडी घाबरली होती.
असं असलं तरी नंतर मात्र श्रीदेवी व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसल्या होत्या.
जान्हवी म्हणते, "मम्मानं सिनेमाचे काही सीन बघितले होते. त्यांना ते आवडल्यानं त्या आनंदी झाल्या. त्यांनी नंतर मला सल्ला दिला की, सिनेमाच्या दुसऱ्या भागात मी मेकअप लाऊ नये. त्यानुसार मी मेकअप नाही लावला."
आईप्रमाणेच मिठाईची आवड
आई श्रीदेवी प्रमाणेच आपणही तेवढंच संवेदनशील असल्याचं जान्हवी मानते आणि आपल्या आईसारखंचं तिलासुद्धा मिठाई फार आवडते.
यावर्षी श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतरचा काळ जान्हवीसाठी खूप कठिण होता. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी सावत्र भाऊ अर्जून कपूर आणि सावत्र बहिण अंशुला कपूर यांनी तिला फार साथ दिली.
जान्हवी म्हणते, "या कठिण काळातून बाहेर पडण्यात अर्जून भैय्या आणि अंशुला दिदीचा फार मोठा वाटा आहे. हे नातं आमच्यासाठी नवीन असलं तरी आता माझ्याकडे भाऊ आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते, कारण हा भाऊ फक्त प्रेरणादायीच नसून तो फार चांगला व्यक्तिसुद्धा आहे."
सोशल मीडिया बेगडी
सिनेमांमध्ये पाऊल ठेवण्याआधीच सोशल मीडिया स्टार झालेली जान्हवी कपूर मात्र सोशल मीडियाच्या जगाला नकली जग मानते.
सोशल मीडियावर लोक तेवढंच दाखवतात, जेवढं त्यांना दाखवायचं असतं असं ती मानते.
सोशल मीडियावरील नकारात्मकतेवर जान्हवी सांगते, "लोक जेव्हा सोशल मीडियावर नकारात्मक गोष्टी बोलतात, तेव्हा मला वाईट वाटतं. सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे, हे मी समजू शकते."
"मला अगदी सहजतेनं संधी मिळाली म्हणून काही लोक असंतुष्ट असतील. कारण मी त्यांची संधी हिरावून घेतली असं त्यांना वाटू शकतं. मला जबाबदारीचं भान आहे. जे लोक तोंडावर बोलू शकत नाहीत, ते सोशल मीडियावर बोलतात. कारण हे माध्यमच असं आहे. अशा नकारात्मकतेला प्रोत्साहन दिलं जातं हे पाहून मला वाईट वाटतं."
ती पुढे म्हणते, "दुसऱ्यांच्या नजरेत मला संघर्ष करावा लागला नाही हे मी समजू शकते. मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. माझ्या कामाच्या माध्यमातून मी त्या सगळ्या लोकांचं हृदय परिवर्तन करू इच्छिते."
हिंदी सिनेमातल्या मधुबाला, वहिदा रहेमान, मीना कुमारी, नुतन यांचा प्रभाव जान्हवीवर आहे. तिला त्यांच्यासारखंच व्हायचं आहे.
पण जान्हवीला हेही माहीत आहे की, ती त्यांच्यासारखं होऊ शकत नाही. त्या महान आहेत आणि त्यांनी पडद्यावर दाखवलेली जादू ही दुसऱ्या जगातली आहे, असं जान्हवी म्हणते.
शशांक खेतान दिग्दर्शित धडक हा सनेमा नागराज मंजुळे यांच्या सैराट या मराठी सिनेमावर आधारित आहे. धडकमध्ये शाहिद कपूरचा लहान भाऊ इशान खट्टर हा जान्हवीबरोबर प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा 20 जुलैला रिलीज होत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)