पाहा फोटो : उपराजधानी नागपूरची पावसाने केली दैना

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला पावसानं झोडपून काढलं. पहाटे पाच वाजेपासून मुसळधार पावसला सुरुवात झाली होती. प्रशासनाने पुढच्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन यावर्षी नागपुरात सुरू आहे. त्यावरही या पावसाचा परिणाम झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने विधिमंडळाचं कामकाज आज स्थगित करावं लागलं.

आज दिवसभर सुरू असलेल्या पावसाने नागपूरकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे लोकांची धावपळ झाली.

दक्षिण पश्चिम नागपूर भागातल्या दीनदयाल नगरमधील एकाच कुटुंबातील दहा लोकांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं. हा भाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात येतो.

शहरात मध्यवर्ती भागातील सीताबर्डी भागात पाणी साठणं हे आता नेहमीचंच झालं आहे. मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे या भागातील समस्यांत आणखी भर पडली आहे.

मुसळधार पावसात नरेंद्र नगरच्या पुलात पाणी साठणं नागपूरकरांसाठी नवीन नाही. आज झालेल्या पावसामुळे याचा पुनर्प्रत्यय नागपूरकरांना आला.

आज झालेल्या पावसामुळे अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीस आघाडीवर होते. मदतकार्यात अनेक संस्थांनी पुढाकार घेत. पोलीस उपायुक्तांनी अडकलेल्या बसला बाहेर काढतानाचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

अनेक भागात लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी बोटींची मदत घेण्यात आली.

सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन नागपुरात प्रशासन यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आप्तकालीन नियंत्रण कक्षात जाऊन पाहणी केली.

दरम्यान गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केलं आहे. तसंच घरात पाणी साठलं असेल तर महापालिकेतर्फे काही सुरक्षित ठिकाणं निवडली आहेत, तिथे जाण्याचंही आवाहन केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)