पाऊस : आल्या आल्याच थैमान; पुढचे 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा

मान्सूनचं आगमन झाल्यानंतर आज मुंबईतल्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे.

अतिवृष्टीमुळे दादर, परळ, हिंदमाता, लोअर परळ, वरळी भागांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा फटका लोकल ट्रेनला बसला आहे.

तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे तर पश्चिम रेल्वे 35 ते 40 मिनिटे उशिरानं धावत आहे.

हवामान विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना घराबाहेर पडू नका, असं सांगितलं आहे. तसंच मच्छिमारांनी समुद्रापासून खूप दूर जाऊ नये, असंही सांगण्यात आलं आहे.

"पुढचे दोन दिवस मुंबई आणि कोकण परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व संस्था आणि मच्छिमारांना आम्ही त्यासंबंधीच्या सूचना जारी केल्या आहेत," असं भारतीय हवामान विभागाच्या अजय कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

दरम्यान पावसामुळे 32 विमानांच्या उड्डाणास उशीर झाला तर 2 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.

मुंबईतल्या दादर आणि परळ परिसरातील पावसाची दृश्य या व्हीडिओत बघता येतील.

"8 जूनपासून पाऊस वाढण्याची शक्यता होती. 9 जूनला त्यात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांनी बाहेर पडू नये," असं मुंबईच्या प्रादेशिक हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस

मुंबईसह पुण्यातही पाऊस पडला आहे. यासोबतच मराठवाड्यातील लातूर आणि विदर्भातल्या बुलडाणा जिल्ह्यातही पाऊस पडला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)