मदर तेरेसांच्या 'मिशनरी ऑफ चॅरिटी'तून मुलांची विक्री झाल्याचा आरोप

मदर तेरेसांनी स्थापन केलेल्या मिशनरी ऑफ चॅरिटी संस्थेत काम करणाऱ्या झारखंडमधील एका महिलेला 14 दिवसांचं नवजात अर्भक विकण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

या केंद्रातल्या इतर दोन सिस्टर्सनाही अटक करण्यात आली असून अशी अजून प्रकरणं झाली का याबाबत चौकशी करण्यात येत आहे.

राज्याच्या बालकल्याण समितीने (CWC) तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

"या केंद्रातून अजूनही काही बालकांना असंच बेकायदेशीरपणे विकलं गेल्याची माहिती पुढे येत आहे," असं ठाणे अंमलदार एस. एन. मंडल यांनी बीबीसी हिंदीच्या नीरज सिन्हा यांना सांगितलं. "आम्ही त्या अर्भकांच्या मातांशी संपर्क साधला आहे आणि आम्ही पुढील चौकशी करत आहोत."

14 दिवसांच्या बालकाचा दीड लाखाला सौदा

पोलिसांनी या केंद्रातून 1 लाख 48 हजार रुपये हस्तगत केले आहेत. नोबेल विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचं 1997 साली निधन झालं. त्यांनी 1950 मध्ये मिशनरी ऑफ चॅरिटी या संघटनेची स्थापना केली.

या संस्थेत 3000 नन्स जगभरात आहेत. आजारी लोकांसाठी घरं, बेघर लोकांसाठी अन्नाची व्यवस्था, कुष्ठरोग्यांसाठी घरं आणि अनाथाश्रम स्थापन केले आहेत. मिशनरी ऑफ चॅरिटी कुमारी मातांनी सोडलेल्या मुलांसाठी केंद्र चालवतात. पण ती मुलं दत्तक घेण्याची व्यवस्था नाही.

"आम्ही सध्या या नवजात अर्भकाची उत्तर प्रदेशच्या एका जोडप्याला केलेल्या विक्रीच्या प्रकरणाची चौकशी करत आहोत." असं बालकल्याण समितीच्या अध्यक्ष रुपा कुमारी यांनी बीबीसीला सांगितलं.

"हा पैसा हॉस्पिटलसाठी वापरण्यात येणार असं त्या जोडप्याला सांगण्यात आलं."

"ते नवजात अर्भक मुलगा होता. एका तरुण मुलीच्या पोटी 19 मार्चला या मुलाचा जन्म झाला होता. 14 मेला या अर्भकाची विक्री झाली." असंही त्यांनी सांगितलं.

जेव्हा त्या युवतीला रुग्णालयात नेलं तेव्हा समितीला सांगायला हवं होतं, असं रुपा कुमारी यांचं मत आहे. इतर मुलांना 50,000 ते 70,000 रुपयांना विकलं आहे, असं समितीला समजल्याचं त्यांनी सांगितलं.

समितीने 13 गरोदर महिलांना रांचीहून एका वेगळ्या ठिकाणी हलवलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)