'इस्टर एग्स' आणि 'इस्टर बनी' आहेत तरी काय?

इस्टर हा ख्रिश्चन धर्मियांचा सण असून येशू ख्रिस्तांचं पुनरुत्थान झाल्याच्या निमित्तानं साजरा केला जातो.

बायबलनुसार, ज्या दिवशी येशू ख्रिस्तांना सूळावर देण्यात आले त्या दिवसाला गुड फ्राय डे म्हणतात. यंदा 30 मार्चला गुड फ्रायडे होता.

गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्तांचं निधन झाल्यानंतर लगेचच्या रविवारी त्यांचं पुनरुत्थान झालं. म्हणून त्या रविवारला 'इस्टर संडे' म्हणतात. ख्रिस्त कालगणनेतील हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे.

इस्टर सर्वसामान्यपणे 21 मार्च ते 25 एप्रिल या काळात असतो. वसंतातल्या पौर्णिमेच्या चंद्रावरही ही तारीख अवलंबून असते.

या दिवसांत ख्रिश्चन धर्मीय जल्लोष करतात, प्रार्थना करतात. तसंच, मित्र-मंडळींसोबत कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं.

इस्टर साजरा करण्यासाठी काही आधुनिक आणि अनोख्या गोष्टींचा वापर केला जातो. या गोष्टी म्हणजे इस्टर एग्स, इस्टर बनी आणि चॉकलेट्स. पण, आधुनिक गोष्टींच्या संकल्पना आल्या कुठून?

इस्टर एग्सचं महत्त्व काय?

इस्टरमध्ये चॉकलेट एग्सवर सगळ्यांच्याच उड्या पडतात. मात्र, इस्टर हा अध्यात्माच्या दृष्टीनं महत्त्वाचं आठवडा असल्यानं या काळात अंडी खाण्याला चर्चकडून पूर्वी परवानगी नव्हती.

त्यामुळे अंड्यांच्या आकारातील चॉकेलट्स लहान मुलांना भेटवस्तूंच्या स्वरुपात देण्याची प्रथा सुरू झाली. व्हिक्टोरिया राणीच्या काळात कार्डबोर्ड पेपरची आणि सॅटीन रिबीन गुंडाळलेली अंडी तयार करण्याची प्रथा सुरू झाली. या कार्डबोर्डच्या अंड्यांमध्ये इस्टरसाठीच्या भेटवस्तू ठेवतात.

याचं रुपांतर आता इस्टर साजरा करण्याच्या आधुनिक परंपरेत झालं आहे.

इस्टर एग्सचं चॉकलेट?

19व्या शतकात जर्मनी आणि फ्रान्समध्ये प्रथम चॉकलेट एग्स बनवली गेली. पण, ती चॉकलेट एग्स कडवट होती.

कालांतरानं चॉकलेट बनवण्याची पद्धत बदलत गेली. त्यातूनतच आता बाजारात मिळणारी चॉकलेट एग्स तयार झाली आहेत.

आता सहज मिळणारी चॉकलेट अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि खवय्ये त्यांच्या प्रेमात पडले.

इस्टर बनी म्हणजे काय?

19व्या शतकातली इस्टर बनीची कहाणी सांगितली जाते. ससे एकावेळी बऱ्याच पिल्लांना जन्म देतात. त्यानां नव्या जिवाचं प्रतीक मानलं जातं.

यावरून असं मानण्याची प्रथा आहे की, इस्टर बनी हा सुध्दा सुशोभित केलेली अंडी लपवतो, त्यांचं रक्षण करतो. कारण ही अंडीसुद्धा नव्या जिवाचं प्रतीक असतात.

उत्सव काळात लहान मुलं या अंड्यांच्या लपवाछपवीचा खेळ खेळतात. स्वित्झर्लंडमध्ये इस्टर एग्स कोकिळेशी जोडलेली आहेत. तर, जर्मनीत इस्टर एग्स कोल्ह्यांशी निरडित आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)