'धडक' ट्रेलर आला : हिंदीतला 'सैराट' प्रेक्षकांना कसा वाटला? पाहा इथे

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा धाकटा भाऊ ईशान खट्टरची मुख्य भूमिका असलेला 'धडक'चा ट्रेलर आज अखेर रिलीज झाला.

नागराज मंजुळेच्या गाजलेल्या 'सैराट'चा 'धडक' हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. त्यामुळे या सिनेमाच्या ट्रेलरची सगळ्यांना खूपच उत्सुकता होती.

या चित्रपटात जान्हवी कपूर पार्थवी अर्थात 'आर्ची'च्या पात्रात तर इशान खट्टर मधुकर म्हणजेच 'परश्या'च्या भूमिकेत दिसणार आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स, झी स्टुडिओ, हिरू यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरुवात झाली होती.

चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खैतान यांनी या ट्रेलरबाबत ट्विटरवर म्हटलं आहे की - "या क्षणाला मी स्वत: खूप उत्सुक आहे, पण सोबतच मी नर्व्हसही आहे. जान्हवी आणि ईशान यांनाही अशीच उत्सुकता वाटत असेल याची मला खात्री आहे."

तसंच त्यांनी पुढे करण जोहर यांनी 'आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्यासाठी' त्यांचे आभार मानले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या ट्रेलरवरून चर्चेला उधाण आलं आहे. तासाभरातच '#धडक', '#IshaanKhattar', #Dhadak, #JhanviKapoor असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले.

काहींनी दोघांच्या अॅक्टिंग कौशल्यावर कमेंट केली आहे, तर काहींनी 'बॉलिवुडमधल्या घराणेशाही'वर टीका करत त्यांची खिल्ली उडवली आहे.

मनोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "ना चेहऱ्यावर भाव, ना अॅक्टिंग स्किल्स, हिंदी डायलॉगसुद्धा नीट बोललेले नाही. जान्हवीमुळे पूर्ण ट्रेलरची वाट लागली आहे, इशान त्यातल्या त्यात बरा आहे."

तर दिलग्रेस कौर या ट्विटर आकउंटवरून दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे, "रिमेक म्हणजे हुबेहूब कॉपी असते ना? फक्त स्टोरीच किंवा व्यक्तीरेखा नाही, पण संगीतसुद्धा ना? पण हिंदी सिनेमात नाविन्यपूर्ण काहीच उरलेलं दिसत नाहीये? काही तर स्वत:चं असं आणा."

तर शर्वरी गायकवाड यांना हिंदीमधलं झिंगाट गाणं ऐकून धक्काच बसल्याचं दिसतंय.

तर प्रवीण यांनादेखील 'धडक'चा ट्रेलर फार आवडलेला दिसत नाहीये. "सैराट मस्त होता. धडकचा ट्रेलर तितका आवडला नाही. सैराटमधल्या हिरोईननेदेखील खूप चांगलं काम केलं होतं, पण जान्हवीची ऑक्टिंग OK OK आहे," असं ते म्हणतात.

तर इरफान यांनी अतिशय तिखट शब्दात आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, "दिग्दर्शकाची कामगिरी तर कीव आणणारी आहे. निर्मात्यांनी तर दोघांच्या करियरची वाट लावली आहे. चांगली फ्रेश स्क्रिप्ट आणि सीन्स असती तर त्यांचं भवितव्य वाचवता आलं असतं. धडकच्या ट्रेलरची सुरुवात फ्लॉप आहे. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन."

हा चित्रपट श्रीदेवीच्या 21 वर्षीय कन्येचा डेब्यू आहे, तर 22 वर्षांचा ईशान यापूर्वीही माजिद मजिदी यांच्या 'Beyond The Clouds' मध्ये झळकला होता. तसंच मोठा भाऊ अर्थात शाहीद कपूरबरोबर 'उडता पंजाब'मध्येही त्याने लहानशी भूमिका साकारली होती.

ईशान आणि जान्हवी या दोघांसाठीही हा चित्रपट फारच महत्त्वाचा आहे, यात शंका नाही. हा चित्रपट आधी 6 जुलैला रिलीज होणार होता. पण आता त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता हा चित्रपट 20 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराटने जगभरात बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमवला होता, तर अनेक पुरस्कारही खिशात घातले होते.

आता जान्हवी, ईशानचा 'धडक' बॉक्स ऑफिसवर कुठवर धडक मारणार? तुम्हाला काय वाटतं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)