You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ : ...आणि त्यांनी माहीम बीचवरच्या घाणीत हात घातला
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईच्या समुद्रकिनारी कोणाला घर नको आहे? प्रत्येकाच्या मनात ही इच्छा असते. मात्र मुंबईच्या समुद्रकिनारी राहणं एवढं सोपं नाहीये.
कारण बीचवर जमा होणारा कचरा कदाचित तुमची डोकेदुखी ठरू शकेल. असंच काहीसं घडलं इंद्रनील सेनगुप्ता आणि राबिया तिवारी या दांपत्यासोबत. मात्र या दांपत्यानं या समस्येमुळे चिडचिड केली नाही, की कोणावर राग व्यक्त केला नाही.
त्यांनी या समस्येवर जो उपाय शोधला त्यामुळे केवळ तेच नाही तर त्यांच्यासोबत समुद्र किनारी राहाणारे इतरी लोक आज खूप आनंदी आणि समाधानी झाले आहेत.
हा नेमका उपाय काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही इंद्रनील आणि राबिया यांची भेट घेण्याचं ठरवलं. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर या दांपत्यानं आम्हाला एका शनिवारी सकाळी ७.३० वाजता माहीम बीचवर भेटायला बोलावलं.
शनिवारी जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तेव्हा हे जोडपे स्वतः बीचवर उतरून कचरा गोळा करताना दिसलं. एवढंच नव्हे तर त्यांच्यासोबत अनेक तरुण तसंच वयस्कर मंडळीही या कामात त्यांना हातभार लावताना दिसली.
या सर्व प्रकाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा जी माहिती मिळाली ती आश्चर्यचकित करणारी होती. राबिया या सर्व घटनेबद्दल सांगताना प्रचंड उत्सुक दिसत होत्या.
त्या म्हणाल्या की, "माझी नणंद माहीम बीचजवळील एका सोसायटीमध्ये राहात होती. जेव्हा केव्हा आम्ही त्यांना त्यांच्या घरी भेटायला यायचो. तेव्हा लाटांचा आवाज, समुद्राकडून येणारा थंड वारा अनुभवायला मिळायचा. एवढंच नाही तर वांद्रे-वरळी सी लिंकचा व्ह्यूसुध्दा खूप छान दिसायचा."
"तेव्हा वाटायचं की बीचच्याजवळ राहायला किती छान वाटत असेल. काही दिवसांनंतर माझी नणंद मुंबईहून दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली. त्यामुळे हे घर रिकामंच होतं. मग आम्हाला इथं राहाण्याची संधी मिळाली. जेव्हा आम्ही इथं राहायला आलो तेव्हा पाहिलं की, या बीचवर किती कचरा आहे.
"एक-दोनदा बीएमसीचे जेसीबी येऊन गेले, मात्र चांगल्या प्रकारे स्वच्छता होत नव्हती. एक-दीड महिना वाट पाहिल्यानंतर आम्हालाच वाटलं की, आपणच काही तरी करायला हवं. मी माझ्या पतीला सांगितलं की, आपणच बीचवर जाऊन कचरा काढायला सुरुवात करू. आपल्याला पाहून इतर लोकही आपल्या मदतीला येतील.
राबिया यांनी त्यांचे पती इंद्रनील यांना या गोष्टीसाठी तयार केलं आणि मग हे दांपत्य बीचच्या स्वच्छतेसाठी धडपडायला लागलं.
सुरुवातीच्या दिवसांबद्दल माहिती देताना इंद्रनील सांगतात, "आम्ही पावसाळ्यात इथं राहायला आलो होतो. तेव्हा पाहिलं की, जुलै-ऑगस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचरा समुद्रकिनारी जमा झाला होता."
"तेव्हापासून आम्ही बीच क्लिनिंगला सुरुवात केली. जेव्हा आम्ही बीचवर उतरलो तेव्हा परिस्थिती एवढी वाईट होती की, आम्हाला थांबावसंच वाटलं नाही. कारण, एवढा कचरा होता की त्याची गणती नाही. आम्ही दहा महिन्यांपूर्वी हा उपक्रम सुरू केला होता. आता आम्ही 25 ते 30 स्वयंसेवक दर शनिवारी आणि रविवारी सकाळी ८ ते १० बीचच्या स्वच्छतेसाठी एकत्र येतो.
दर शनिवार-रविवार बीच क्लीन होत असल्यानं लोकांच्या प्रतिक्रियासुध्दा खूप चांगल्या ऐकायला मिळतात. हे पाहून इंद्रनील समाधान व्यक्त करतात. ते म्हणतात, जेव्हा आम्ही बीच स्वच्छ करतो, तेव्हा लोक या बीचवर फिरायला येतात. मुलांना इथं स्वच्छ बीचवर क्रिकेट, फुटबॉल खेळताना पाहून आम्हाला खूप आनंद होतो.
असंच काहीसं मत राबिया व्यक्त करतात. त्यांना आता त्यांच्या घराच्या बाल्कनीत बसून चहा पिताना चिडचिड होत नाही, उलट एक आत्मिक समाधान मिळतं असं त्या सांगतात.
त्या म्हणाल्या की,"जेव्हा आम्ही खिडकीबाहेर पाहातो, बाल्कनीत बसून चहा पितो तेव्हा मनात एक समाधान असतं की सकारात्मक बदल दिसतोय. वाटतं की, आमच्या हातून काही तरी चांगलं काम घडतं आहे. भलेही छोट्या स्वरूपात असेल, पण हे चांगलं आणि अर्थपूर्ण काम आहे."
बीचचा एक ठराविक भूभाग इंद्रनील आणि राबिया नियमित साफ जरी करत असले तरी बीचचा इतर परिसरसुध्दा स्वच्छ व्हावा, असं या दाम्पत्याला मनापासून वाटतं आणि ते यासाठी प्रयत्नशील आहेत.
त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल सांगताना इंद्रनील म्हणतात की, "मागील दहा महिन्यात आम्ही जी स्वच्छता मोहीम राबवली आहे, त्यामुळे आम्हाला बीचवर फरक जाणवत आहे. आता आमचा पुढील उद्देश असा आहे की, आम्हाला बीचचा मोठा परिसर स्वच्छ करायचा आहे."
"तसंच अजून नवीन स्वयंसेवक, तरुण स्वयंसेवक तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. सोबतच प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत एक मोहिम सुरू करायची आहे. यामध्ये प्लास्टिकवर अवलंबून न राहाता इतर पर्याय शोधायचे आहेत. सरकारी यंत्रणांसोबत चर्चा घडवून मिठी नदीतील पाण्याचं शुध्दीकरण कसं करता येईल यावर उपाय शोधायचा आहे. कारण मिठी नदीतून येणारा सर्व कचरा हा समुद्रात मिसळला जातो.
इंद्रनील आणि राबिया यांच्या कार्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांच्यामुळे आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्वच्छतेबाबतची बीजं रोवली जात आहेत. तसंच त्यांच्या या कामाची युनायटेड नेशननंही दखल घेतल्यामुळे या दांपत्याला आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आल्याची जाणीव आहे आणि ही जबाबदारी आपण नक्कीच पूर्णत्वास नेऊ, असा विश्वासही ते बोलून दाखवतात.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)