You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्नाटक : कधीपर्यंत टिकेल काँग्रेस आणि JD(S)ची युती?
- Author, इमरान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी कर्नाटकहून
कर्नाटकच्या निवडणुकांत सट्टेबाजांनी आधी राज्यात स्थिर सरकारसाठी भाजपवर सट्टा लावला. त्यात नुकसान झाल्यानंतर आता हेच सट्टेबाज काँग्रेस आणि JD(S) यांची युती किती टिकणार यावर सट्टा लावत आहेत.
सट्टेबाजच कशाला सामान्य लोकसुद्धा कर्नाटकच्या या राजकारणाकडे लक्ष ठेवून आहेत. ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी गेल्या 33 वर्षांतली सगळ्यांत कठीण निवडणूक होती. एवढंच नाही तर या दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर कडवट टीका केली होती. पण नाईलाजास्तव याच दोन पक्षांनी आता सत्तेसाठी युती केली आहे, असंही मानलं जात आहे.
पहिली गोष्ट अशी की JD(S) गेल्या दहा वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहेत. त्यांच्या समोर अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. दुसरी म्हणजे दोघांसमोर भाजपला रोखण्याचं एक मोठं आव्हान आहे.
दोघं कधीपर्यंत एकत्र राहतील?
राजकीय विश्लेषक एम. के. भास्कर राव म्हणतात, "लोकसभा निवडणुकीपर्यंत हे दोन्ही पक्ष एकत्र राहतील. पण खातेवाटप, प्रशासनाशी निगडित बाबी आणि अनेक संस्थांवरच्या नेमणुका हे मतभेदाचे मुद्दे राहतीलच."
प्रा. मुजफ्फर असादी बीबीसीशी बातचीत करताना सांगतात, "काँग्रेस- JD(S) एक अस्थिर युती आहे आणि त्याला अजोड युती म्हणू शकत नाही. राष्ट्रीय राजकारणात इतर युतींप्रमाणेच ही युती चालेलही. ही युती एखाद्या प्रयोगासारखी आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेलं युपीए किंवा भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएसारखी ही युती असेल."
भास्कर राव मानतात की, "माजी पंतप्रधान आणि JD(S) चे प्रमुख एच. डी. देवेगौडा अशा मुद्द्यांवर काँग्रेस पक्षाच्या प्रादेशिक पातळीवरच्या नेत्यांशी चर्चा करणार नाहीत, ते सरळ सोनिया गांधींशी चर्चा करतील. अगदी राहुल गांधीसुद्धा त्यात नसतील."
जागावाटपावरून ताणतणावाची शक्यता
पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांत दोन्ही पक्षांना जवळून बघावं लागेल कारण दोन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करतील.
पण 1996 च्या निवडणुकांची पुनरावृत्ती होणार नाही. तेव्हा JD(S) ला 28 जागांवर विजय मिळाला होता आणि काँग्रेसला फक्त 16 जागा मिळाल्याने मोठा धक्का बसला होता.
एका आठवड्याआधी काँग्रेस JD(S) ला पाठिंबा देईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. कारण JD(S) ने वोक्कलिगा समुदायात आपली मतं सुनिश्चित करत चामुंडेश्वरीतून लढणाऱ्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा - सिद्धारमय्या यांचा पराभव निश्चित केला होता.
काँग्रेसकडून उचलेल्या या युतीच्या प्रस्तावावर कुमारस्वामी आणि देवेगौडा यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
1991 साली चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढून घेतला होता. अशी परिस्थिती उद्भवू नये असं देवेगौडा यांना वाटतंय. पण त्या वेळी एक दिवशी साध्या वेशात काही पोलिसांनी राजीव गांधींच्या घराची कथितरित्या तपासणी केली तेव्हा काँग्रेसने आपला पाठिंबा परत घेतला होता.
जास्त जागा असून काँग्रेस ज्युनिअर पार्टनर
काँग्रेसकडे 78 आणि JD(S) कडे 37 जागा असूनसुद्धा काँग्रेस पक्ष देवेगौडा यांचा प्रस्ताव मानण्यास तयार झाला आणि या युतीत ते ज्युनिअर पार्टनर व्हायला तयार झाले.
प्रा. असादी मानतात, "या युतीचं भवितव्य काँग्रेसच्या ताकदीवर अवलंबून आहे. काँग्रेस एक मोठा पक्ष म्हणून कधी परत येईल तेव्हा या युतीत अनिश्चितता निर्माण होईल."
ज्या दिवशी कुमारस्वीमींनी 117 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपाल वजुभाई वाला यांना सोपवलं तेव्हा JD(S) च्या एका नवनिर्वाचित आमदाराला विचारलं की, "तुम्ही आपले जुने मित्र सिद्धारमय्या यांच्याशी चर्चा केली आहे का?"
या आमदाराने खासगीत सांगितलं, "नाही. आम्हाला अजून ती संधी मिळालेली नाही. पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला माहिती नाही मी त्यांना कधी भेटेन आणि भेटलो तरी त्यांच्याशी काय बोलणार? आमच्या राजकीय आयुष्यातला हा सगळ्यांत कठीण काळ आहे."
कठीण राजकीय काळ
काही थोड्या आमदारांनाच या कठीण काळाचा सामना करावा लागतोय असं नाही. एच. डी देवेगौडा आणि सिद्धरामय्या यांनी विधानसभेच्या परिसरात महात्मा गांधीच्या मूर्तीसमोर हात मिळवले तेव्हापासूनच दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये चलबिचल आहे.
जेव्हा कुमारस्वामी पुढच्या आठवड्यात विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकतील तेव्हा कदाचित त्यांच्या नात्यात एक सहजपणा येईल.
दोन्ही पक्ष समन्वय समिती बनवतील की नाही. आपले मतभेद दूर करून एका समान कार्यक्रमावर येतील की नाही यावर लक्ष ठेवावं लागेल, असं प्रा. असादी म्हणाले.
विधानसभेत विरोधी पक्ष 104 आमदारांच्या साहाय्याने एका मजबूत स्थितीत आहे. त्यामुळेच सत्ताधारी युतीला कायम सतर्क रहावं लागेल.
जर ही युती तुटली तर भविष्यात आपण सत्तेवर येऊ शकणार नाही, या एकाच जाणीवेवर ही युती टिकेल.
ही युती भाजपाविरोधी ताकदींसाठी एक मोठं उदाहरण ठरत आहे. त्याच आधारावर इथून पुढे मोदी- अमित शाह या जोडीला टक्कर देण्याची तयारी केली जाईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)