You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्नाटक : या 5 मार्गांनी येडियुरप्पा सरकार वाचवू शकतात
- Author, इमरान कुरेशी
- Role, बंगळुरूहून बीबीसी हिंदीसाठी
बी. एस. येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुप्रीम कोर्टाने आज दुपारी 4 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करून दाखवण्याचे आदेश दिले आहेत.
सत्ता राखण्यासाठी येडियुरप्पा सगळे डावपेच लावताना दिसत आहेत.
बहुमतासाठी भाजप, काँग्रेस आमदारांना धमकावत आहे आणि घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप काँग्रेस आणि JD(S)नं केला आहे.
भाजपनं 2 आमदार पळवल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी केला आहे.
दरम्यान, बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडे खालील पाच पर्याय उपलब्ध आहेत.
1. आमदारांची गैरहजेरी
येडियुरप्पा यांना भाजप व्यतिरिक्त 15 आमदारांना मतदानाच्या वेळी गैरहजर ठेवण्यात यश आलं तर विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या 207 होईल.
भाजपकडे एकूण 104 आमदार आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी ही संख्या पुरेशी आहे. त्यामुळे भाजपचं सरकार शाबूत राहू शकतं.
2. आमदारांचा राजीनामा
JD(S) आणि काँग्रेसच्या कमीत कमी 15 आमदारांनी पक्षाच्या व्हीपला न जुमानता भाजपला मतदान केलं; किंवा 15 आमदारांनी राजीनामा दिला तर येडियुरप्पा आपलं सरकार वाचवू शकतात. पण दोन्ही प्रकरणात त्यांना आपली आमदारकी गमवावी लागणार आहे.
3. आमदारांचा गोंधळ
बहुमत चाचणीच्या वेळी काही आमदारांनी गोंधळ घातला तर सभापती त्यांना विधानसभेच्या बाहेर काढू शकतात. त्यामुळे विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या कमी होऊ शकते आणि बहुमतासाठी आवश्यक आकडा खाली येऊन येडियुरप्पा यांचं सरकार वाचू शकतं.
4. मठाधीशांचा लिंगायत आमदारांना आदेश
काँग्रेसमध्ये एक डझनाहून अधिक लिंगायत आमदार आहेत. इथल्या मठाधीशांनी आमदारांना लिंगायत असलेल्या येडियुरप्पा यांना समर्थन करण्याचे आदेश दिले तर भाजपचं सरकार वाचू शकतं.
याआधी वीरशैव समुदायाला पाठीशी घालून लिंगायत समुदायात फूट पाडत असल्याचा काँग्रेसवर आरोप होत आहे.
5. गुप्त मतदान
बहुमत सिद्ध करण्यासाठी गुप्त मतदानाचा वापर करावा, अशी मागणी भाजप करत आहे. त्यामुळे भाजपला मतदान करणाऱ्या आमदारांची ओळख जाहीर होणार नाही. गुप्तपणे भाजपला मतदान झालं तर सरकार वाचू शकतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)