BBC Impact : 'बीबीसी मराठीनं बातमी दिली अन् दुसऱ्याच दिवशी संडास बांधून मिळाला'

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

सत्यभामा सेलकर आता आरामशीर उठू शकतात. सकाळी उठून गावाबाहेर जाण्याचं त्यांना टेन्शन नसतं. त्या गरोदर आहेत आणि आता त्यांचा सातवा महिना भरत आला आहे. आधी त्यांना रोज सकाळी उजेडायच्या आत लांब चालत जावं लागत होतं. कारण त्यांच्या घरात संडास नव्हतं. पण बीबीसी मराठीनं त्यांची बातमी प्रसिद्ध केली आणि त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला.

बुलडाणा जिल्ह्यातल्या डोंगरशेवली या गावात 23 आणि 24 एप्रिल असे 2 दिवस राहून बीबीसी मराठीच्या टीमनं तळ ठोकून ग्राऊंड रियालिटी दाखवली होती.

2 मे राजी प्रकाशित झालेल्या या रिपोर्टचं शीर्षक 'मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र हागणदारीमुक्त नाही - हा घ्या पुरावा!' असं होतं. राज्य सरकारनं याची चांगलीच दखल घेतली.

"व्हीडिओ रीलिज झाला त्या संध्याकाळीच शेजाऱ्या-पाजाऱ्यायला फोन आले. सत्यभामा संतोष सेलकर कोण आहे, असं साहेब लोक फोनवर विचारत होते. तिथं आमच्या आत्याबाई (सासू) होत्या. सत्यभामा मही सून आहे, असं त्यायनं साहेब लोकायलं सांगितंल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता अनिल भाऊ (ग्रामपंचायत कर्मचारी) घरी आले. मी तवा संडासलाच जायेल होते," संडास बांधण्याच्या घटनाक्रमाबद्दल सत्यभामा सांगतात.

"अनिल भाऊच्या समोरच मी घरी आले. त्यायनं मला पाहिलं आणि विचारलं की, सिमेटची थैली आणायला कोण आहे घरी? आमचे मालक 6 वाजताच विहीरीवर कामाला जायेल असल्यानं घरी कोणी नाही, असं मी त्यायला सांगितलं. मग सिमेटची थैली, गज, पाईप, दरवाजा सगळं सामान त्यायनीच आणून टाकलं," सत्यभामा सांगतात.

"त्यानंतर सकाळी 9 वाजता 2 गाड्या आल्या. एक साहेब लोकायची आणि दुसरी मिस्तरीची (गवंडी). मी तेव्हा पोरीयला घेऊन घरात बसेल होते. घरात उभं राहायला जागा नव्हती इतके साहेब लोक आले. म्हटलं आता हे कशासाठी आले असतील?

मग त्यायनं संडास आणि तब्येतीबाबत विचारपूस केली. मिस्तरी लोकायनं संडासच्या सामानाबद्दल विचारलं. मिस्तरीपण 10 ते 12 एवढे होते. मग त्यायनं पुढच्या 15 मिनिटांत संडास उभा केला. पहिला संडास आपल्या घरचा झाला. संडास होऊस्तोवर साहेब लोक तिथंच उभे होते," सत्यभामा पुढे सांगत होत्या.

सत्यभामा सेलकर ७ महिन्याच्या गरोदर आहेत. 2 मे पर्यंत त्यांच्या घरी संडास नव्हता. त्यामुळे त्यांना उघड्यावर संडासला जावं लागायचं. त्यांना होणारा त्रास आम्ही आमच्या रिपोर्टमध्ये सांगितला होता.

"लय चांगलं झालं संडास झाला ते. संडास बाधणं सुरू होता तव्हाच मही पोरगी संडासमध्ये जाऊन बसायचं म्हणत होती. आता आमच्या घरचे सगळेच संडास वापरतात. बरं झालं तुम्ही फोन केला. मलाही तुम्हाला बोलायचं होतं, तुम्हाला 'धन्यवाद' म्हणायचं होतं," बोलताना सत्यभामा ताईंचा ऊर भरून येतो. त्यांच्या आवाजावरून ते जाणवत होतं.

पाणी नसल्यामुळे बांधलेला संडास वापरत नाही, असं गावातला तरुण ज्ञानेश्वर पवार यानं आम्हाला सांगितलं होतं.

संडास वापरायला पाणी पुरतं का, असं विचारल्यावर सत्यभामा सांगतात, "पहिले महिन्यातून एक-दोनदा नळाचं पाणी यायचं. आता मात्र आठ दिवसातून एकदा येतं. त्यामुळे पाणी पुरतं."

"साहेब लोक सकाळी 9 वाजता गावात आले ते 5 वाजेस्तोवर गावातच होते. आपल्या बातमीमुळे त्याच दिवशी गावातल्या 15 जणायचे संडास बांधून झाले. एका दिवसात इतक्या जणायचे संडास कधीच बांधून झाले नव्हते," इतर लोकांच्या संडासचं काम सुरू झालं का, असं विचारल्यावर सत्यभामा यांचे पती संतोष सांगत होते.

या 15 जणांमध्ये सुनिता रमेश वाघ यांचाही समावेश आहे. पैसे नसल्यानं संडास बांधू शकत नसल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आता मात्र त्या आणि त्यांचं 3 जणांचं कुटुंब संडासचा वापर करत आहे.

गावातल्या परिस्थितीत बदल

2 मे पर्यंत गावातल्या 132 संडासांचं काम बाकी होतं आणि गावात सार्वजनिक शौचायल नव्हतं.

"गेल्या 10 दिवसांत आम्ही 74 संडास बांधून पूर्ण केले आहेत आणि 58 संडासांचं काम सुरू आहे. 20 ते 25 तारखेपर्यंत 100 टक्के कुटुंबांकडे संडास असेल," गावातल्या शौचालयांच्या संख्येबद्दल ग्रामसेवक समाधान पडघाण सांगतात.

"राहिलेल्या 58 संडासांचं काम पूर्ण झाल्यानंतर 100 टक्के कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय असेल, त्यामुळे सार्वजनिक शौचालयाची गरज राहणार नाही," असं पडघाण म्हणाले.

यानंतर अधिक माहितीसाठी आम्ही बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन यांच्याशी संपर्क साधला.

"तुमच्या बातमीप्रमाणे लोकांचे प्रश्न खूपच जेन्यूअन होते. त्यामुळे मग दोन-तीन वेळा डेप्युटी सीईओ गावात जाऊन आले आणि नंतर काम सुरू झालं," षण्मुगराजन यांनी बीबीसीशी बोलतांना ही प्रतिक्रिया दिली.

तुम्ही बातमी येईपर्यंत वाट का पाहिली, आधीच काम का नाही केलं? यावर षण्मुगराजन सांगतात, "एकतर ग्रामसेवकानं यासंबंधी व्यवस्थित रिपोर्टिंग केलं नाही. दुसरं म्हणजे गावात संडास बांधून झालेत की नाहीत याची पडताळणी करण्यासाठी शासनानं तळपाटी नेमली आहे.

ही तळपाटी प्रत्येक गावात जाऊन तिथल्या परिस्थितीची पडताळणी करते. राज्यभर तळपाटीचं काम सुरू असल्यानं बुलडाणा जिल्हयातल्या 120 गावांबाबतची पडताळणी आमच्यापर्यंत पोहोचली नाही. जोपर्यंत तळपाटीची पडताळणी येत नाही तोपर्यंत गावात काम झालं की नाही हे आम्हालाही सांगता येत नाही. त्याकाळातच ती आली असती तर आम्ही लगेच कारवाई केली असती."

तळपाटी म्हणजे सरकारच्या प्रतिनिधींची एक टीम असते जी गावागावात जाऊन सरकारच्या कामांची पाहणीकरून त्याचा अहवाल सादर करते.

मग असं असेल तर ग्रामसेवकांवर काय कारवाई केली? असा सवाल बीबीसीनं षण्मुगराजन यांना केला. त्यावर, "तात्पुरत्या स्वरुपात ग्रामसेवकांची इन्क्रीमेंट वाढत असते. ग्रामसेवक समाधान पडघाण यांचं इन्क्रीमेंट आम्ही बंद केलं आहे.

तसंच लोकांच्या आरोपांची दखल घेत आम्ही एक चौकशी समिती नेमली आहे. ही समिती पडघाण यांची चौकशी करत आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल," असं उत्तर त्यांनी दिलं.

आम्ही या गावाची बातमी दाखवली म्हणून तुम्ही इथली कामं केलीत, बाकीच्या गावांची बातमी नाही केली तर तिथली कामं नाही करणार का? असही प्रश्न आम्ही त्यांना विचारला. "एका गावात ही बाब समोर आली आहे. हे लक्षात घेऊन आम्ही जिल्ह्यातल्या सर्व गट विकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) त्यांच्या-त्यांच्या भागातल्या परिस्थितीची चौकशी करायला सांगितलं आहे.

बाकी गावांमध्येही अशी परिस्थिती असू शकते, म्हणूनच बीडीओंना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच ज्या गावातली कामं अजूनही बाकी असतील तिथली कामं लवकरात लवकर करून घेण्याचं त्यांना सांगितलं आहे."

हे वाचलंत का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)