आंध्र प्रदेशच्या या गावात प्रत्येक घरासमोर एक कबर आहे

    • Author, श्याम मोहन
    • Role, बीबीसी तेलुगूसाठी

कबर म्हटलं की अनेकांना थोडी भीती वाटू शकते. काहींना कब्रस्तान म्हटलं की भुताच्या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मग अशीच एखादी कब्र आपल्या घरासमोर असेल तर? आणि आपल्याच नव्हे तर शेजारच्याही आणि बहुदा गावात प्रत्येक घरासमोर असेल तर?

आंध्र प्रदेशात कुरनूल जिल्ह्यात असंच एक गाव आहे, जिथे प्रत्येक घराच्या समोर एक कबर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही या गावात जाल तेव्हा तुम्हाला नक्की हा प्रश्न पडेल, की आपण एखाद्या स्मशानात उभे आहोत जिथे अनेक घरं बांधली गेली आहेत, की एखाद्या भरवस्तीत ही स्मशानभूमी आहे.

कुरनूल शहरापासून 66 किमी दूर गोनेगंदल मंडलात एका टेकडीवर अय्याकोंडा गाव वसलं आहे. मालासदारी समुदायातील एकूण 150 कुटुंब या गावात राहतात. पण या या गावात कोणतीच स्मशानभूमी नाही, म्हणून इथले लोक आपल्या नातेवाईकांच्या मृतदेहाचं घरासमोरच दफन करतात.

प्रत्येक घराच्या समोर एक-दोन कबरी दिसतात. गावातल्या लोकांना आपली रोजची कामं उरकण्यासाठी या कबरींना ओलांडून जावं लागतं.

कधी महिला या कबरी ओलांडून पाणी भरायला जातात तर कधी मुलं या कबरींच्या भोवताल खेळताना दिसतात.

या गावातल्या लोकांची म्हणणं आहे की या कबरी त्यांच्या पूर्वजांच्या आहेत, ज्यांची ते रोज पूजा करतात, त्यांना प्रसाद अर्पण करतात आणि आपापल्या प्रथांचं पालन करतात.

इतकंच काय तर जोवर घरी शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य ते आपल्या पूर्वजांना दाखवत नाहीत, तोवर घरातले कुणीही त्या अन्नाला हात लावत नाही.

कबरींची कहाणी

गावाचे सरपंच श्रीनीवासुलू या प्रथेबद्दल बीबीसीला अधिक माहिती देतात, "अध्यातमिक गुरू नल्ला रेड्डी आणि त्यांच्या शिष्या माला दशारी चिंतला मुनिस्वामी यांनी गावाच्या विकासासाठी आपलं पूर्ण सामर्थ्य आणि पैसा खर्च केला होता. त्यांनी केलेल्या या कामांसाठी एका मंदिराची स्थापना करण्यात आली आणि त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली. त्याच प्रमाणे लोक आपापल्या पूर्वजांची कबर आपल्या घरासमोर तयार करू लागले."

ही प्रथा फक्त पूजा करण्यापुरती किंवा नैवेद्य दाखवण्यापर्यंतच मर्यादित नाही. कुणी काही नवीन वस्तू घेतली, एखादा फोन किंवा टीव्ही तरी आधी तो कबरीच्या समोर ठेवला जातो. नंतरच त्याला ऑन केलं जातं, असं गावकरी सांगतात.

गावकऱ्यांमध्ये असलेली ही अंधश्रद्धा मुळापासून दूर करणं खूप कठीण आहे, असं श्रीनिवासुलू सांगतात. म्हणून आता ते गावातल्या लहान मुलांना याबद्दल योग्य ते शिक्षण देत आहेत, कारण तेच भविष्यात बदल घडवून आणू शकतात, असा त्यांना विश्वास आहे.

कुपोषण हा सुद्धा या गावात चिंतेचा विषय असल्याचं श्रीनिवासुलू सांगतात. अंगणवाडी केंद्रांसाठी आणि डोंगराळ भागात घर बांधण्यासाठी जमीन अधिग्रहण करावी, अशी विनंती गावकऱ्यांनी सरकारला केली आहे.

आणखी काही अंधश्रद्धा

गावात आणखी काही अंधश्रद्धा असल्याचं श्रीनिवासुलू यांनी बीबीसीला सांगितलं. जसं की, इथले लोक गावाबाहेर कुणाशीच लग्न करत नाहीत, आणि परंपरागत खाटेवर पण झोपत नाही. अशा अनेक प्रथा आहेत.

गावातल्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्याशिवाय इथे कांदा, शेंगदाणे आणि मिर्चीची शेती होते.

अय्याकोंडा परिसरात खूप जास्त सशे आढळतात, म्हणून हा परिसर कुंडेलू पाडा (सशांचं घर) म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर त्याचं नाव अय्याकोंडा पडलं.

गावकऱ्यांना आपल्या किराणा, पेन्शन किंवा दैनंदिन गरजांसाठी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गंजिहल्ली या गावी जावं लागतं.

पंचायत समितीचे सदस्य ख्वाजा नवाब सांगतात की, जर कब्रस्तान तयार करण्यासाठी सरकार जमीन देत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलनात त्याची मदत होईल.

गावाचे प्रमुख रंगास्वामी म्हणतात, "पिढ्यानपिढ्या ज्या प्रथा आम्ही पाळत आलो आहोत, जर त्या अचानक सोडल्या तर आम्हाला नुकसान होऊ शकतं. भविष्यात तर कबरी बनवण्यासाठी आमच्याकडे जागा उरणार नाही, अशी भीती वाटते. आणि नेते तर निवडणुकीच्या आधी आमच्या गावात ढुंकूनही बघत नाहीत."

कुरनूलच्या खासदार बुट्टा रेणुका यांना बीबीसीने याबद्दल विचारलं असता, अशा कोणत्याही प्रथेची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रथेबद्दल त्यांनी पहिल्यादांच बीबीसीकडून ऐकलं, असं त्यांनी सांगितलं.

गावकऱ्यांना योग्य ते सहकार्य केलं जाईल, असं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं. शिवाय, आता त्यांनी कुरनूलच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून याबद्दल एक अहवाल मागवला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)