गोव्यात समुद्र पातळी अचानक का वाढली? शॅक्स कसे गेले वाहून?

फोटो स्रोत, Manaswini nayak
- Author, मनस्विनी नायक
- Role, बीबीसी मराठीसाठी
गोव्यात समुद्राच्या पाण्याची पातळी सोमवारी-मंगळवारी अचानक वाढलेली दिसली. नेहमीची रेषा ओलांडून समुद्राच्या लाटा थेट किनाऱ्यावरील शॅक्समध्ये घुसल्या.
तीन महिन्यांपूर्वीच 'ओखी' वादळामुळं समुद्राचं पाणी किनाऱ्यावरील शॅक्समध्ये घुसून प्रचंड नुकसान झालं होतं. त्याचीच पुनरावृत्ती याही वेळी झाली.
दक्षिण तसंच उत्तर गोव्यातील किनाऱ्यावरील शॅक्सचं पुन्हा एकदा नुकसान झालं. ऐन पर्यटनाच्या हंगामात अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे.
'इंडियन सेंटर फॉर ओशन'नं पाण्याची पातळी वाढणार आहे, असा सतर्कतेचा इशारा दोन दिवसांपूर्वी दिला होता. पण तो कुणीही फारशा गांभीर्यानं घेतला नाही, हे झालेल्या नुकसानीतून दिसतं.
"हवामान खात्याकडून आणि समुद्र विज्ञान संस्थेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. जर तो पाळला गेला असता तर हे नुकसान टाळता आलं असतं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली," असं गोवा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Manswini nayak
सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरू आहे. मुलांच्या परीक्षा संपल्यामुळे पूर्ण कुटुंबासहित गोव्यात आलेल्या पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे. त्यातही समुद्र किनाऱ्यावरील शॅक्समध्ये राहण्याला पर्यटकांची अधिक पसंती असल्यामुळे गोव्याचे समुद्रकिनारे पर्यटकांनी भरून गेलेत.
तीव्र उष्णता असलेल्या काळात स्थानिक गोवेकर मंडळीही सहकुटुंब किनाऱ्यावर गेली होती. वर्षांतून एकदा या काळात गोवेकर कुटुंबासोबत जेवणाचे डबे घेऊन मुद्दाम समुद्र किनारी जातात. सगळा दिवस किनाऱ्यावर घालवतात. पण मुख्य हेतू या काळात समुद्र स्नान करणं हाच असतो.

फोटो स्रोत, Manswini nayak
सोमवारी दुपारी 3 नंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागली, तेव्हा अनेक पर्यटक स्नानासाठी पाण्यात उतरले होते. पण पाण्याची पातळी वाढतेय हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. जेव्हा अचानक लाटा शॅक्समध्ये घुसू लागल्या तेव्हा मात्र सर्वांची धावपळ सुरू झाली.
यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण पुन्हा एकदा शॅक्सचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शॅक्समधील खुर्च्या पाण्यात वाहून गेल्या. किनाऱ्यावरील रेस्टॉरंटमध्ये पाणी घुसल्यानं तिथल्या अन्नधान्याची नासाडी झाली.
केरी-तेरेखोल, मांद्रे-मोरजी, आश्वे, हरमल, कलंगुट-कांदोळी, कोलवा या भागातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी आहे.
समुद्रात होणाऱ्या या बदलांविषयी डॉ. नंदकुमार कामत सांगतात, "ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राचं तापमान वाढू लागलंय. जे हजारो वर्षांत काही अंशांनी वाढायचं ते आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे झपाट्यानं वाढू लागलंय. समुद्राच्या या वाढत्या तापमानामुळे समुद्रात उष्ण वारे तयार होण्याचंही प्रमाण अलीकडे वाढलं आहे आणि या जोरात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागलीय."
पण एका दिवसात समुद्रपातळी अशी अचानक कशी काय वाढू शकते?
डॉ. बबन इंगोले यांनी हवामानात वारंवार होणार्या बदलांबाबत आणखी माहिती देताना सांगितलं, "हवामानात सतत चढउतार होत आहेत आणि याचे परिणाम फक्त भारतातच नाही तर जगभर दिसत आहेत. या बदलांमुळे ऋतुचक्र देखील हललं आहे. काही बदल आपल्याला पटकन दिसून येत नाहीत. पण काही बदल थेट आपल्यावर परिणाम करणारे असतात. महाराष्ट्रात अवकाळी होणारा पाऊस किंवा गारपीट, हेही याचेच परिणाम आहेत."
इथल्या शॅक्सचंही भरपूर नुकसान झालं. किनाऱ्यावरील पर्यटकांच्या आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








