कॉमनवेल्थ गेम्स 2018 : आईची जिद्दीने मनू भाकरला कसं बनवलं सुवर्ण नेमबाज?

    • Author, सत सिंह
    • Role, गोरियाहून (झज्जर), बीबीसी हिंदीसाठी

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावणाऱ्या मनू भाखरच्या वाटचालीत तिच्या आईचा वाटा निर्णायक आहे.

हरियाणातल्या झज्जर जिल्ह्यातलं गोरिया हे छोटसं गाव. गोरियापासून गोल्ड कोस्टपर्यंतचं साधारण अंतर आहे 10,375 किलोमीटर. मनूचं हे कॉमनवेल्थ पदार्पण. गोरिया गावाची लेक मनू भाखरने गोल्ड कोस्टमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली तेव्हा तिची आई देव पाण्यात घालून बसली होती.

मनूचे बाबा रामकिशन मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. पत्नी सुमेधा यांच्यासोबत ते गोरिया गावात खाजगी शाळा चालवतात.

मनू आपल्या आईवडिलांचं दुसरं अपत्य. तिचा मोठा भाऊ निखिल खेळांबरोबरच अभ्यासातही अव्वल आहे.

मनूच्या जन्मावेळच्या आठवणींना सुमेधा यांनी उजाळा दिला. त्या सांगतात, "2002 साली मनुचा जन्म झाला, त्यावेळी मी संस्कृतची परीक्षा देत होते. मनूचा जन्म सोमवारी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी झाला. त्याच दिवशी सकाळी दहा वाजता मला परीक्षा द्यायची होती."

अशा परिस्थितीत डॉक्टरांनी सुमेधा यांना डिस्चार्ज द्यायला परवानगी दिली नाही. सुमेधा यांच्या बहिणीने डॉक्टरांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर डॉक्टरांनी सहमती दर्शवली. सुमेधा यांनी मनूला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही तासांत परीक्षा दिली.

सुमेधा पुढे सांगतात, "माझी बहीण परीक्षा घेणाऱ्यांकडे गयावया करत होती. माझी स्थिती पाहून परीक्षा अधिकारी हैराण झाले होते. अशाप्रकारे मी माझ्या सहा विषयांची परीक्षा गाडीत प्रवासादरम्यान आराम करून पूर्ण केली."

त्या म्हणतात, "मनू आमच्या कुटुंबाचा अभिमान आहे. मनूने जन्मावेळी जराही त्रास दिला नाही. मी परीक्षेला जायची तेव्हा ती रडायची नाही."

मनू हे नाव का?

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना स्मरून मुलीचं नाव मनू ठेवल्याचं सुमेधा सांगतात. मनूला पाहिल्यावर त्यांचीच आठवण येत असल्याचं त्या सांगतात.

"मला कोणतीही गोष्ट सहजतेने मिळालेली नाही. हरियाणातल्या कर्मठ रूढीवादी समाजात महिलांना अशीच वागणूक मिळते. माझं लग्न लवकर झालं पण मी लग्नानंतरही शिक्षण सुरूच ठेवलं. B.Ed /M.Ed पर्यंत मी शिकले. शिक्षणाबाबत मी खूप ठाम होते. शिक्षण घ्यायला ज्यांनी विरोध केला मग ते घरचे असोत की बाहेरचे- मी त्यांना टक्कर देत शिकले," असं सुमेधा सांगतात.

मनूने त्यांच्याकडूनच संघर्ष आणि शिस्तीचे बाळकडू घेतले असल्याचं सुमेधा सांगतात.

"कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक पटकावल्यानंतर मी मनूशी बोलले. बाकी मुलींसाठी खेळ आणि अभ्यास यांचा मिलाफ साधून वाटचाल करता यावी, यासाठी योगदान द्यायला हवं," असं सांगितल्याचं सुमेधा सांगतात.

घरात शिक्षणाचं वातावरण

मनूचे कुटुंबीय झज्जर आणि रेवाडी या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गोरिया गावात राहतात. राजस्थानपासून 80 किलोमीटरवर असलेल्या या गावात जाट आणि अहीर समुदायाचं प्राबल्य आहे.

गावची लोकसंख्या जेमतेम 3,500. नीरज देवी गावच्या सरपंच आहेत.

मनूचे आजोबा सुभेदार राजकरण भारतीय लष्करात होते. कुस्तीगीर म्हणूनही त्यांची ओळख होती. शिक्षणाची आवड असणारं कुटुंब म्हणून आमच्या कुटुंबाची गावात ओळख आहे, असं मनूचे वडील रामकिशन यांनी सांगितंलं.

"मला पाच भाऊ आणि एक बहीण आहे. सगळ्यांनी चांगल्या महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. आमचं कुटुंब शिक्षणासाठी ओळखलं जातं. मात्र मनूच्या पदकाने आता आमची ओळख बदलली आहे," असं त्यांनी पुढे सांगितलं.

जेव्हा पहिल्यांदा मनूने बंदूक हातात घेतली

मनूला डॉक्टर व्हायचं होतं. ती टेनिस, तायक्वांडो खेळायची. दोन वर्षांपूर्वी तिने शूटिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

"दोन वर्षांपूवी मनूने बंदूक उचलली आणि दहापैकी दहा गुण मिळवत प्रशिक्षकांना चकित केलं. तिच्या शाळेत शूटिंग रेंज आहे, हे आमचं भाग्य. तसं नसतं तर मनूला प्रशिक्षणासाठी 100 किलोमीटर दूर जावं लागलं असतं," असं ते पुढे सांगतात.

"कॉमनवेल्थ पदकाने आनंद झाला आहे. आता मनूला ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर पदकासह पाहायचं आहे," असं रामकिशन यांनी सांगितलं.

रामकिशन आणि सुमेधा CBSE बोर्डाची शाळा चालवतात. या शाळेत तिरंदाजी, कबड्डी आणि बॉक्सिंगसाठीच्या सोयी आहेत. म्हणूनच झज्जर आणि परिसरातील गावातून दोनशेहून अधिक मुलं या शाळेत शिकण्यासाठी येतात. खेळात करिअर घडवण्यासाठी उत्सुक अनेक जण या शाळेत शिकतात.

केवळ सात-आठ तास वीजपुरवठा

गोरिया गावात जायला अनेक बारीक गल्ल्या आहेत, रस्ता कच्चा आहे. गावात शिरतानाच शेणाचा वास नाकात जातो. गाई, म्हशी यांचा वावर सहज दिसतो.

मनूच्या घरी कुटुंबीय, नातेवाईक आणि गावातली मंडळी तिच्या पदकाचं सेलिब्रेशन करण्यासाठी एकत्र जमलेले. दुपारी दोन वाजता कडक उन्हात महिला घागरा कुर्ती आणि सलवार कमीज या पेहरावात हजर होत्या. डोक्यावर पदर घेतलेल्या स्त्रिया पाण्यासाठी लागलेल्या लाइनमध्ये उभ्या होत्या.

युवा मंडळींनी गावाचं नाव उज्ज्वल करण्याची ही पहिलीच वेळ नाही, असं सरपंच नीरज देवी यांचे पती सतीश कुमार सांगतात. गावातली अनेक मुलं IAS ऑफिसर होतात. अनेक मुलं लष्करात आहेत.

2010 मध्ये रणबीर आणि दीपक यांची IAS साठी निवड झाली. काही दिवसांपूर्वीच सुनैना या गावच्या लेकीची लेफ्टनंदपदी निवड झाली. मनूच्या वर्गातील युक्ता भाकरने राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं.

या गावातल्या प्रत्येक घरात एक मनू आहे. गावातल्या खासगी शाळेत मनूसह 70 मुलंमुली रोज नेमबाजीचं प्रशिक्षण घेतात. 2011 जनगणनेनुसार झज्जर जिल्ह्यातलं प्रमाण 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं 774 होतं. डिसेंबर 2017 मध्ये हे प्रमाण 920 होतं.

गावकऱ्यांनी इंदिरा गांधी सुपर थर्मल ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत. काँग्रेस सरकारने 24 तास वीजपुरवठ्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आजही गावात केवळ सात ते आठ तास वीजपुरवठा असतो, असं राकेश कुमार सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)