You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॉमनवेल्थ गेम्स 2018 : इन्स्पेक्टर दया आणि सीआयडीची फॅन मेहुलीला रौप्यपदक
गेल्या वर्षी राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 8 पदकं पटकावत 17वर्षीय मेहुलीनं नेमबाजी वर्तुळात आपल्या नावाची छाप उमटवली. यानंतर मेक्सिकोमध्ये झालेल्या नेमबाजी विश्वचषकात दोन पदकांसह जगाला दखल घेण्यास भाग पाडलं.
पश्चिम बंगालमधल्या सिरमपूरची मेहुली टीव्हीवरच्या सीआयडी मालिकेची चाहती आहे. इन्स्पेक्टर दया तिला प्रचंड आवडतो. प्रसिद्ध अशा शोले चित्रपटातला जय-वीरू यांच्यातलं नेमबाजीचं दृश्यं पाहायला तिला आवडतं. बंदूक, पिस्तूल आणि नेमबाजीची आवड बहुधा यातूनच रुजली असावी.
14 व्या वर्षी घडलेला एक प्रसंग मेहुलीच्या आयुष्यात निर्णायक ठरला. नेमबाजीची प्रॅक्टिस सुरू असताना मेहुलीच्या बंदूकीतून सुटलेल्या गोळीनं एक व्यक्ती जखमी झाला. यामुळे मेहुलीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या घटनेमुळे मेहुली अनेक दिवस नैराश्यग्रस्त होती. यातून बाहेर पडण्यासाठी तिला मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागले. याप्रकरणानं हताश मेहुलीच्या पालकांनी तिला अव्वल नेमबाज जॉयदीप कर्माकर यांच्या अकादमीत भरती केलं.
रोज तीन ते चार प्रवास करून मेहुली कर्माकर यांच्या अकादमीत जात असे. अनेकदा प्रशिक्षण संपवून घरी पोहोचायला मेहुलीला रात्र होत असे.
हळूहळू मानसिक धक्क्यातून मेहुली सावरली आणि तिचा खेळ बहरला. 2016 आणि 2017 या दोन वर्षांत मेहुलीनं राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं पटकावली.
2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये जॉयदीप यांचं पदक अवघ्या काही गुणांनी हुकलं होतं. मोठ्या स्पर्धांमध्ये मानसिक कणखरता कुठे कमी पडते हे जाणून जॉयदीप यांनी आपल्या विद्यार्थ्यांना कणखर बनवलं.
नेमबाजी विश्वचषकात मेहुलीच्या नावावर दोन पदकं आहेत. गोल्डकोस्ट येथे होणारी कॉमनवेल्थ स्पर्धा हे मेहुलीचं कॉमनवेल्थ पदार्पण आहे. मात्र पदार्पणाचं दडपण बाजूला सारत 17 वर्षीय मेहूलीनं रौप्यपदक मिळवलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)