You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#पैशाची गोष्ट : पाहा व्हीडिओ - नव्या आर्थिक वर्षात तुमच्यासाठी काय बदललं?
नवीन आर्थिक वर्ष याच आठवड्यात सुरू झालं आहे, त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांना नवीन आर्थिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
आणि हे नवीन वर्ष चांगलं जावं यासाठी आर्थिक नियोजनाच्या काही टीप्स देण्याचा हा प्रयत्न आहे.
महत्त्वाचे 10 आर्थिक बदल
1.स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा आता 30 हजारांवरून 40 हजार रुपये झाली आहे. याचाच अर्थ तुमच्या एकूण पगारातून चाळीस हजार रुपयांची रक्कम करमुक्त झाली आहे.
प्रवास भत्ता आणि मेडिकल भत्त्याच्या जागी ही वाढ मिळाली आहे. याचाच आणखी एक अर्थ असा की प्रवासाची आणि औषधाची बिलं आता सांभाळून ठेवावी लागणार नाहीत.
2.अतिरिक्त अधिभार - आयकरावर आता तीन ऐवजी चार टक्क्यांचा अधिभार बसणार आहे. अतिरिक्त अधिभार हा शिक्षणसाठी असेल.
3.दीर्घ कालीन भांडवली नफा - बजेट 2018मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दीर्घकालीन भांडवली नफा किंवा लाँग टर्म कॅपिटल गेनची घोषणा केली आहे.
त्यानुसार, शेअर किंवा म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर एक लाख रुपयांच्या वर झालेल्या नफ्यावर 10 टक्के कर द्यावा लागणार आहे.
शिवाय त्यावर चार टक्क्यांचा अधिभारही लागेल. 31 जानेवारी 2018 पर्यंतच्या गुंतवणुकीवर आणि नफ्यावर मात्र हा कर लागणार नाही.
4.सिंगल प्रिमिअम आरोग्य विमा - तुम्ही चालू आर्थिक वर्षाबरोबरच पुढच्या महिन्याचा हप्ताही एक साथ भरलात तर त्यावरही तुम्हाला कर बचतीचा फायदा मिळू शकेल.
5.राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) - एनपीएस म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची मुदत संपली किंवा खातं तुम्हा मुदतीपूर्वीच बंद केलं तरी मिळणाऱ्या पैशावर कर बसणार नाही.
6.महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे आयकर विवरणपत्र भरलं नाही(रिटर्न्स फाईल केले नाहीत) तर दंड भरावा लागेल. उत्पन्न करपात्र नसेल तरी विवरणपत्र भरणं फायद्याचं ठरतं.
7.ज्येष्ठ नागरिकांना बँक आणि पोस्टात ठेवलेल्या मुदतठेवींवर 50 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर आता कर द्यावा लागणार नाही.
8.ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्यातही सवलत मिळणार आहे. विम्याच्या 50 हजार पर्यंतच्या हप्त्यावर कर बचत शक्य होणार आहे.
9.गंभीर आजारावरच्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चावर कर सवलत मिळणार आहे. ही सूटही ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
10.याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा म्हणजे पंतप्रधान वय वंदना योजने अंतर्गत पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर त्यांना खात्रीशीर व्याज मिळणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)