You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीरमध्ये घरात शौचालय बांधण्यासाठी विद्यार्थिनीचं उपोषण
- Author, मोहित कंधारी
- Role, जम्मूहून, बीबीसी हिंदीसाठी
सकाळी सकाळी उठून लवकर आटोपून शाळेत जाणं अनेकांच्या जिवावर येतं. त्यात घरात संडास नसेल तर काम आणखी कठीण होऊन जातं. डोंगराळ भागात राहणाऱ्या मुलींसाठी हे काम आणखी अवघड होऊन बसतं. कारण घरात संडास नसेल तर जंगलात जावं लागतं. त्या ठिकाणी जंगली श्वापदं आणि किड्यांची भीती असते.
जम्मूत राहणाऱ्या एका मुलीनं मात्र यावर उपाय शोधून काढला. घरात संडास नाही म्हणून ती चक्क दोन दिवस उपोषणाला बसली. तिच्या या हट्टासमोर सगळ्यांनी हात टेकले आणि तिची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन तिला मिळालं.
जम्मू-श्रीनगर महामार्गावर एक गाव आहे 'कुद.' या ठिकाणी निशा राणी नावाची मुलगी राहते. ती हायर सेकंडरी स्कूलमध्ये दहावीत शिकते.
14 मार्च रोजी उधमपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्या शाळेत येऊन स्वच्छता अभियानाबाबत माहिती दिली. उत्तर प्रदेशातून आलेल्या एका टीमने तिच्या शाळेत एक छोटं नाटक दाखवलं. त्यातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला होता. संडासचा वापर कसा करावा याबाबतही त्यांनी जागरुकता निर्माण केली.
शाळेत एकूण मुलांची संख्या 350 आहे पण या नाटकाचा परिणाम निशा राणीवरच झाला. ती घरी गेली आणि तिनं आपल्या आईवडिलांकडे संडास बांधण्याचा हट्ट केला. जर अंगणात संडास बांधला नाही तर मी उपाशी राहील असं ती म्हणाली.
तिचे वडील मजूर आहेत आणि त्यांच्यावर कुटुंबातील एकूण सात जण अवलंबून आहेत. आपल्या अंगणात संडास असावा याबाबत त्यांनी कधीच विचार केला नव्हता.
पण जेव्हा आपल्या लाडकी मुलीनं अन्नत्याग केला तेव्हा त्या याबाबत विचार करू लागले. मुलीला ही कल्पना कशी सुचली याचा शोध घेण्यासाठी ते शाळेत पोहोचले. तिथं त्यांनी विचारलं की नेमकं तुम्ही तिला काय शिकवलं ज्यामुळं ती असा हट्ट करत आहे.
तिच्या वडिलांना काय करावं हे सूचत नव्हतं. ते दुसऱ्या पर्यायाचा विचार करतील तोपर्यंत ही गोष्ट सगळ्या जिल्ह्यात पसरली होती. ही गोष्ट त्या भागातील गट विकास अधिकाऱ्यांच्या कानावर पडली तेव्हा ते तिच्या घरी गेले आणि त्यांनी संडास बांधून देण्याचं आश्वासन तिला दिलं.
त्यानंतरच तिनं हे उपोषण सोडलं. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांनी तिच्या घरी संडास बांधायचं काम सुरू केलं.
बीबीसी हिंदीनं निशा राणीशी संपर्क साधला आणि उपोषण करण्यामागची तिची प्रेरणा विचारली. तिनं सांगितलं, "मी शाळेत नाटक पाहिलं आणि मला घरात संडास नसल्याचे दुष्परिणाम समजले. घरात संडास नसल्यामुळं परिसरात रोगराई पसरते. त्यामुळं मी संडासचा हट्ट केला."
तिनं केलेल्या उपोषणामुळं घरी संडास बांधण्यात आला ही गोष्ट जेव्हा परिसरात कळली तेव्हा सर्व जण तिचं कौतुक करू लागले. इतकंच नाही तर तिच्यासोबत शिकणाऱ्या 30-40 मुलांनी घरी संडास बांधण्याची मागणी आपल्या आईवडिलांकडं लावून धरली.
निशाचे प्राचार्य मुकेश कुमार यांनी सांगितलं, "निशाने घेतलेल्या पुढाकारनंतर आता चेनेनी ब्लॉकमध्ये (20 ग्राम पंचायतींचा समूह) 500 घरी शौचालय बांधण्याचं काम सरकारनं हातात घेतलं आहे."
"या भागात आतापर्यंत 1687 संडास बांधण्यात आले आहेत. अजून 7980 घरांमध्ये संडास बांधण्याचं काम बाकी आहे," अशी माहिती गट विकास अधिकारी लियाकत अली खान यांनी बीबीसीला दिली.
"2018 हे वर्ष संपायच्या आत पूर्ण उधमपूर जिल्ह्यात प्रत्येक घरात संडास बांधला जाईल. या वर्षाच्या अखेरीस कुणी उघड्यावर शौचास जाणार नाही," असं ते म्हणाले.
"भविष्यात स्वच्छ भारत मिशनची एक सैनिक म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे. याबाबत जनजागृती करण्याचा माझा निर्धार आहे," असं निशा राणीनं म्हटलं.
निशा राणीला अभ्यास करून डॉक्टर व्हायचं आहे. निशाचा नुकताच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी तिच्या कामाचं कौतुक केलं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)