#5 मोठ्याबातम्या: आनंदी गोपाळ जोशी यांना गुगलकडून अभिवादन

आजच्या दैनिकांतील, वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. आनंदी गोपाळ जोशी यांना गुगलकडून अभिवादन

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांना गुगलनं डूडल साकारून मानवंदना दिली आहे. आज आनंदी गोपाळ जोशी यांची 153वी जयंती आहे. त्या निमित्तानं गुगलनं त्यांना अभिवादन केलं आहे, असं द इंडियन एक्सप्रेसनं म्हटलं आहे. याआधी गुगलनं भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांना देखील मानवंदना दिली होती.

आनंदी जोशी या 19 व्या वर्षी डॉक्टर झाल्या होत्या. अमेरिकेतील पेनसिल्विनियातून त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली होती. भारतात येऊन महिलांचे वैद्यकीय कॉलेज काढण्याचा त्यांचा विचार होता, पण वयाच्या 22 व्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळं त्यांचं हे स्वप्न अधुरं राहिलं.

2. 'चंदा कोचर या व्हीडिओकॉन कर्जाच्या मोठ्या लाभार्थी'

ICICI बॅंकेच्या मुख्याधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे व्हीडिओकॉननं दिलेल्या कर्जाचे लाभार्थी आहेत. पर्यायाने चंदा कोचरदेखील लाभार्थी आहेत, असा आरोप अरविंद गुप्ता यांनी केला आहे. गुप्ता हे इंडियन इन्व्हेस्टर प्रोटेक्शन काउंसिलचे विश्वस्त आहेत. "पुरावा असं सांगतो की चंदा कोचर आणि त्यांच्या पतींना व्हीडिओकॉनच्या कर्जाचा फायदा झाला आहे. सरकारनं त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करावी," असं आवाहन गुप्ता यांनी केलं असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे.

ICICI बॅंकेचे चेअरमन एम. के. शर्मा यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "या प्रकरणात बॅंकेची आणि चंदा कोचर यांची बदनामी केली जात आहे. व्हीडिओकॉनला देण्यात आलेल्या कर्जाची प्रक्रिया ही कायदेशीररीत्या झाली आहे."

3. '1992च्या करारानुसार मुत्सद्द्यांना वागणूक देऊ'

दूतावासातल्या अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीत सुधारणा करण्याचा निर्णय भारत आणि पाकिस्ताननं घेतला आहे. गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही देशांनी एकमेकांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. आता 1992च्या करारानुसारच दोन्ही देशातील मुत्सद्द्यांना वागणूक दिली जाईल असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे. भारत आणि पाकिस्ताननं परस्परांच्या देशातील मुत्सद्द्यांना 1992च्या करारानुसार वागणूक देण्याचा निर्णय घेतला आहे, असं भारताच्या परराष्ट्र खात्यानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

दोन्ही देशातील परराष्ट्र खात्यानं परस्परांवर आरोप केले होते. "भारताचे अधिकारी आम्हाला विनाकारण त्रास देत आहे," असा आरोप पाकिस्ताननं केला होता तर भारताने देखील याच प्रकारचा आरोप केला होता. आता परिस्थिती निवळली असल्याचं दोन्ही देशांनी म्हटलं आहे.

4. 'पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याची सरकारला चिंता'

"शेतमालाला योग्य किंमत मिळाली तरच शेतकरी जगेल. पण राज्यकर्त्यांना पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची चिंता अधिक आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे, असं वृत्त लोकमतनं दिलं आहे.

"शेतकरी उद्ध्वस्त झाला तर ५० वर्षांपूर्वीसारखी स्थिती निर्माण होईल. त्यावेळी आपल्याला 'लाल मिलो' हे धान्य आयात करावं लागलं होतं. ते खायची वेळ आपल्यावर येईल," अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

"शेतकरी जगला तरच खाणारे जगू शकतील. त्यामुळे मला त्यांची चिंता अधिक आहे," असं ते जळगावमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले.

5. रेल्वेत नोकरीसाठी 2.8 कोटी अर्ज

भारतीय रेल्वेनं नोकरभरतीसाठी परीक्षा जाहीर केली असून ऑनलाइन परीक्षेमार्फत 90,000 जागा भरण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी अंदाजे 2.8 कोटी अर्ज आले आहेत असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. हे अर्ज स्वीकारण्याची मुदत पूर्ण होईपर्यंत आणखी 20,000 अर्ज येऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रेल्वे स्टाफची एकूण क्षमता 13 लाख आहे. दरवर्षी अनेक जण निवृत्त होतात. त्या जागा भरून काढण्यासाठी रेल्वेनं विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)