#5मोठ्या बातम्या : भाजपकडून काँग्रेसचा पुन्हा एकदा (चुकून) प्रचार

आजच्या दैनिकांतील, वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. भाजपकडून काँग्रेसचा पुन्हा एकदा (चुकून) प्रचार

अमित शाह यांच्या अनुवादकाकडून चूक झाल्यानंतर पुन्हा एकदा शाह यांची प्रचार मोहीम चर्चेत आली आहे. कर्नाटकातील चल्लकेरे प्रचारादरम्यान शाह म्हणाले, सिद्धरमैय्या यांनी राज्यासाठी काही केलं नाही. मोदींवर विश्वास ठेवा आणि येडियुरप्पा यांना मतदान करा, आम्ही कर्नाटकाला देशातील सर्वोत्तम राज्य बनवू.

त्यांच्या या वाक्याचा अनुवाद प्रल्हाद जोशी यांनी पुढील प्रमाणे केला, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित आणि गोर-गरिबांसाठी काही करणार नाहीत. ते देशाचं वाट्टोळं करतील. त्यांना मतदान करा."

याआधी अमित शाह यांच्याकडून चुकीने येडियुरप्पा यांचं सरकार सर्वाधिक भ्रष्ट आहे असं म्हटलं गेलं होतं. त्यांनी आपली चूक लगेच दुरुस्त केली होती, असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

2. GST ढासळणार - स्वामी

वस्तू आणि सेवा करावर विरोधी पक्षातील नेते वेळोवेळी टीका करताना दिसतात, मात्र आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

"GST ढासळण्याच्या उंबरठ्यावर आलं आहे. लवकरच दुकानदार लोक रस्त्यावर उतरतील," असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करून दिला आहे.

"दुकानदारांना रिफंड मिळण्याची शक्यता कमीच आहे. डिपॉजिटमुळे ICICI आणि HDFC बॅंकांचा फायदा झाला आहे," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

इकॉनॉमिक टाइम्स नं दिलेल्या वृत्तानुसार, स्वामी यांनी आधारबाबतही चिंता व्यक्त केली आहे. आधार कार्ड सक्तीचं केलं तर सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ शकतो.

3. डिजिटल माध्यमांवर येणार बंधन - स्मृती इराणी

डिजिटल प्रसारण आणि माध्यमांवर लवकरच बंधनं आणली जाणार असून त्याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालय पावलं उचलणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी इंडिया इकॉनॉमिक काँक्लेव्हमध्ये दिली आहे.

भारतीय राज्यघटनेनुसार सर्वांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे, पण त्याचबरोबर अफवांमुळे दोन गटांत आणि समुदायांत तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता देखील घेणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

4. दिल्ली विमानतळावर बॅगांचा गोंधळ

दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॅग हाताळणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हजारो बॅगांचा गोंधळ झाला. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच त्रास झाल्याचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे. यंत्रणेत बिघाड झाल्यानं कुठल्याच विमानांमध्ये बॅगा लोड करता आल्या नाहीत, अशी माहिती विमानतळ प्रशासनानं दिली.

प्रवाशांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर तणाव निर्माण झाला. सामान हाताळण्याची यंत्रणा बिघडली त्यामुळे हजारो बॅगा लोड होऊ शकल्या नाही. दिल्ली विमानतळावरुन उड्डाण घेतलेले लोक वेगवेगळ्या शहरात पोहचले. पण त्यांना त्यांच्या बॅगा न मिळाल्यानं त्रास झाला. आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे, असं विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

5. 20 सेंटीमीटर व्यासाचीच पोळी हवी!

इंजिनिअर पतीच्या 'परफेक्शन'च्या अट्टहासाला कंटाळलेल्या पत्नीनं पिंपरी येथील कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाजीनगर येथे राहत असलेल्या दाम्पत्याचा विवाह 2008 साली झाला होता. घरात कसं वागावं याची नियमावलीच पतीनं तयार करुन ठेवली होती. पोळ्यांचा आकार वीस सेंमी असावा असा त्याचा आग्रह असे. त्या पोळ्यांचं मोजमाप देखील तो करत असे, असं वृत्त लोकमतनं दिलं आहे.

सर्व घरकामाचं 'इव्हॅल्युएशन' एक्सेल शीटवर केलं जात असे. घरात काही नवीन पदार्थ करायचा असेल तर पतीकडून इमेलद्वारे परवानगी घ्यावी लागत असे. जर पत्नीकडून काही चुकी झाली तर पतीकडून मारहाण केली जात असे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)