You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल - लाँग मार्च म्हणजे शहरी माओवाद? 'त्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची प्रखरता कमी होते का?'
अखिल भारतीय किसान सभेच्या नाशिक ते मुंबई झालेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमधून शहरी माओवाद डोकवतोय, अशी टीका भाजप खासदार पूनम महाजन यांनी केली होती.
सोमवारी देवेंद्र फडणवीस सरकारसोबत बैठक झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र खासदार महाजन यांच्या वक्तव्याने आंदोलनाला नक्षली रंग देण्याचा प्रयत्न झाला आहे.
एका मराठी वृत्त वाहिनीवर 'लाँग मार्च'बद्दल प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाल्या, "शहरी माओवाद्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली."
महाजन यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न BBC मराठीच्या वाचकांना काय वाटतं. जाणून घेऊया...
काही वाचकांनी पूनम महाजन यांना "सत्तेचा माज" आला असल्याचं म्हणत त्यांच्यावर टीका केली, तर काहींनी त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत, "ज्या आयोजकांनी हातात लाल झेंडा दिला त्यांनी पायात चपला का नाही दिल्या," असा सवाल उपस्थित केला आहे.
निखील वाघ यांनीही एक प्रश्न उपस्थित केला आहे - "ठीक आहे, काही काळ तसं समजूया. पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची प्रखरता किंवा महत्त्व कमी होतं का?"
निखील वाघ पुढे लिहितात : "शेतकऱ्यांचे प्रश्नही या लोकांनी खोटेनाटे उभे केले आहेत का? मोर्चा कुणाच्या प्रेरणेतून निघाला यापेक्षा त्यात मांडलेल्या प्रश्नांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, यावर तुमची राजकीय प्रगल्भता दिसणार आहे. जर शेतकऱ्यांना अस्तित्त्वाचे प्रश्न भेडसावत नसते तर कुणी कितीही दिशाभूल केली असती तरी शेतातील कामे सोडून ते 200 किलोमीटर पायपीट करत आले नसते."
तर गौरव पवार यांनी पूनम महाजन यांच्या या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. ते म्हणतात, "पूनम महाजन अतिशय योग्य बोलल्या आहेत. ज्या आयोजकांनी शेतकऱ्यांच्या हातात लाल झेंडा दिला त्यांनी त्यांच्या पायात चपला का नाही दिल्या?"
गौरव पाटील यांच्या या प्रतिक्रियेला काहींनी पाठिंबा दिला आहे, तर त्यावर टीका केली आहे.
पूनम महाजनला असं वाटणं सहाजिक आहे, कारण त्यांच्या घरातच एकमेकांना नक्षल्यांसारखी गोळी घालण्याचे संस्कार आहेत, असं मत अदक मनोज यांनी व्यक्त केलं आहे.
तर निशांत भोईनालू म्हणतात, "सरकार विरोधात बोलणारी व्यक्ती म्हणजे सरसकट नक्षलवादी अथवा दहशतवादी ठरवण्याचा अजेंडा स्पष्टपणे दिसतो. अशा प्रवृत्तीलाच ठेचून काढलं पाहिजे."
शाहू जवानजल यांनी, पूनम महाजन यांना "सत्तेचा माज आला" असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात, "शेतकऱ्यांची कळवळा न दिसता त्यांना फक्त शहरी माओवाद दिसला. त्यांची पायपीट, जखमा आणि चेहरे पाहूनही जर पूनम महाजन यांना काही वाटलं नाही, तर त्याला सत्तेचा माज म्हणतात."
ओम शिंदे यांनी पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
"अनेकांच्या तळपायाची कातडी सोलून निघाल्याने त्यातून रक्त निघत होतं. त्या रक्ताचा लाल रंग यांना दिसला नाही. दिवसभर चालून देखील विद्यार्थ्यांची परीक्षा आहे, त्याची कोंडी होऊ नये म्हणून विश्रांती न घेता रात्रभर चालून शांततेत आझाद मैदानात पोहचतानाचा प्रवास आणि झोपमोडीमुळे झालेल्या डोळ्याचा लाल रंग नाही दिसला. परंतु डोक्यावर घातलेल्या टोपीवरून शहरी माओवाद त्यांना दिसला. हे केवळ चुकीचंच नाही तर निषेधार्ह असं वक्तव्य आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.
"तीन वर्षांत 50,000 माओवादी शहरात तयार झालेत? मग हे तर सरकारचं अपयश आहे. काँग्रेसच्या काळात एवढे माओवादी शहरात कधीच तयार झाले नव्हते," अशी टीका राजू तुलालवार यांनी केली नाही.
तर पूनम महाजन योग्यच बोलल्यात, असं मत वासूदेव तनकर यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, "त्रिपुरातील निकालाने कोमात गेलेल्या सीताराम येचुरींना या मोर्च्याने ऑक्सिजन दिलं. म्हणूनच मोर्च्यासमोर बोलताना राणा भीम देवी थाटात बोलत होते."
"शहरी नक्षलवादी! हे असले शब्दप्रयोग करून भांडण लावायचं काम बरं जमत या राजकारणी लोकांना," अशी प्रतिक्रिया सचिन होडे यांनी दिली आहे. तर उमेश इंगळे यांनी "ताईंचा अभ्यास कमी" असल्याचं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)