नागालँड निवडणूक : चर्चच्या पत्रामुळे मतांची लाट भाजपविरोधात जाणार?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, नागालँडहून

ईशान्य भारतातल्या नागालँडमध्ये 90 टक्के लोक ख्रिश्चन आहे. म्हणून इथल्या चर्चचा केवळ समाजावरच नव्हे तर स्थानिक राजकारणावर प्रचंड प्रभाव असतो.

त्यामुळेच ऐन 27 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाच्या तोंडावर चर्चने जाहीर केलेल्या एका पत्रामुळे नागालँडमध्ये राजकीय वादळ उठलं आहे, ज्यानं इथली राजकीय गणितं बदलू शकतात.

नागालँडमधल्या जवळपास 1,500 चर्चेसची शिखर संस्था आहे 'नागालँड बाप्टिस्ट चर्च काउंसिल' म्हणजे 'NBCC'. या काउंसिलचे सरचिटणीस असणाऱ्या रेव्हरंड डॉ झेल्हू किहो यांनी 9 फेब्रुवारीला सर्व पक्षांच्या अध्यक्षांना उद्देशून एक अनावृत्त पत्र लिहिलं, ज्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर टीकास्त्र सोडलं.

"'RSS'ची राजकीय संघटना असणाऱ्या भाजपाची सत्ता जेव्हापासून आली आहे तेव्हापासून हिंदुत्वाची ताकद वाढली आहे आणि स्वरूपही अधिक आक्रमक झालं आहे. सामान्य माणसाला तुम्ही कितीही समजावून सांगा, पण हे वास्तव बदलता येणार नाही. तुम्ही हे पण नाकारू शकत नाही की देशात सत्तेवर असलेला हा पक्ष आपल्या पूर्ण ताकदीनिशी नागालँडमध्ये आपले अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की यामागे त्यांचं उद्देश काय आहे? जर नसेल विचार केला, तर स्वत:ला मूर्ख बनवू नका," असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.

भाजप सरकार आल्यावर ख्रिश्चन मिशनरी, पास्टर्स यांच्यावर हल्ले वाढले आहेत, असं म्हणत रेव्हरंड किहो पत्राच्या शेवटी आवाहन करतात की, "जे येशूला जखमी करू इच्छितात त्यांच्या हातून पैसा आणि विकासासाठी आपल्या ख्रिश्चन तत्त्वांशी आणि धर्माशी तडजोड करू नका."

पत्रातल्या या टीकेमुळे नागालँडमध्ये चर्च भाजपच्या विरोधात आहे आणि या पक्षाला मत देऊ नका असं सांगतोय, ही चर्चा सुरू झाली आणि त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे.

भाजपा नागालँडमध्ये 11 वर्षं मुख्यमंत्री राहिलेले निम्फ्यू रिओ यांच्या 'NDPP' पक्षासोबत निवडणूक लढवतो आहे. त्यांनी २० उमेदवार इथे उभे केले आहेत.

पण चर्चच्या मतावरून राजकारण तापल्यावर रेव्हरंड किहो यांनी 'बीबीसी'शी बोलताना म्हटलं की, "भाजपला मत देऊ नका, असं कधीही म्हटलं नाही. मी पत्रात असं कधीही लिहिलं नाही की भाजपला मत देऊ नका. मी असं म्हटलं की भाजपा ही 'RSS'ची राजकीय संघटना आहे आणि तो एक जातीयवादी पक्ष आहे. सगळा देश त्याचा अनुभव घेतो आहे."

रेव्हरंड किहो पुढे म्हणाले की, "चर्चला हे वाटलं की आपल्या लोकांना, नेत्यांना सांगण्याची आपली जबाबदारी आहे की बाहेर जे होत आहे ते नागालँडमध्येही येऊ शकतं. राजकीय पक्ष हे धर्मनिरपेक्ष असायला हवेत, जातीयवादी नव्हे, असं मी म्हटलं आणि त्यावरून मी खूप टीकाही झेलतो आहे."

पत्राने मतं बदलतील का?

निवडणुकीच्या वातावरणात या पत्राचा जो परिणाम व्हायचा तो झालाच.

भाजपचे मित्र असलेले मुख्यमंत्रीपदाचे दावेदार निम्फ्यू रिओ यांनी 'बीबीसी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं की त्यांना नाही वाटत की नागालँडमध्ये ख्रिश्चन धर्मियांना काही धोका आहे. पण जर भविष्यात धर्म आणि नागा संस्कृतीवर जर काही धोका ओढवला तर ते भाजपशी युती तोडून टाकतील.

भाजपही चर्चच्या या पत्रातल्या दाव्यांना खोडून काढतो आहे. पक्षाचे नागालँडचे सरचिटणीस एडुझू थेलुओ म्हणाले की, "चर्चनं एका पक्षाविरुद्ध असं काही म्हटलं नाही, तर ते फक्त परिस्थितीवर आपलं मत व्यक्त करत आहेत. मी स्वत: एक बाप्टिस्ट ख्रिश्चन आहे आणि मला स्वत:ला भाजपमध्ये राहण्यात काहीही गैर वाटत नाही. भाजप एक राजकीय पक्ष आहे आणि देशाच्या घटनेप्रमाणेच आम्ही काम करतो. आम्ही आमच्या घोषणापत्रातही लिहिलंय की आम्ही अल्पसंख्याकांच्या बाजूनं आहोत, आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत."

अर्थात थेलुओ हे मान्य करतात की पक्षाला या पत्रामुळे निवडणुकीत काही प्रमाणात फटका बसू शकतो. मात्र 60 पैकी 20 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपचे सगळे उमेदवार ख्रिश्चन आहेत.

'चर्चचा प्रभाव नवा नाही'

दिमापूरच्या S D जैन कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेले इम्ती जमीर यांना वाटतं की अल्पसंख्याकांसोबत भारतभरात जे चाललं आहे, ते पाहून चर्चला चिंता वाटली असावी.

"चर्चचा प्रभाव नागालँडच्या राजकारणावर कायमच राहिला आहे. 1982 पासून चर्च इथे 'स्वच्छ निवडणूक' अभियान राबवतो आहे. त्यामुळे 2018 मध्ये त्यांचा प्रभाव हा असा काही नवा नाही."

"जर कोणी पक्ष नागांच्या ओळखीवर, राजकीय मतांवर परिणाम करणार असेल तर त्याच्या परिणाम चर्चवरही होईल, कारण इथे 90 लोक हे ख्रिश्चन आहेत. त्यामुळे आलेल्या असुरक्षिततेच्या भावनेनं त्यांना हे पाऊल उचलायला भाग पाडलं असेल. पण मला वाटतं की अंतिम निर्णय नागा मतदार घेतील, चर्च नाही," असं प्राध्यापक जमीर सांगतात.

चर्चच्या या खुल्या पत्रानं नक्कीच नागालँडमधल्या सामान्य मतदारांची मतं मात्र विभागली गेली आहेत.

सुझान लोथा या बालकांच्या न्यायासाठी काम करणाऱ्या एक मानसशास्त्रज्ञ आहेत. त्या म्हणतात, "चर्च फक्त हे म्हणतंय की आम्हाला हिंसा नकोय. ते कोणाला मत द्या वा देऊ नका, हे सांगत नाहीत. हे खरं आहे की 'NBCC'ने भाजपबद्दल काही म्हटलं आहे. पण भाजपनंही कायम धर्माच्या नावावरच राजकारण केलंय ना? ते भारताला हिंदुस्थान म्हणतात."

लोथा पुढे सांगतात, "भारतात सगळ्या धर्मांचे लोक राहतात. तुम्ही असं नाही म्हणून शकत की तो फक्त हिंदूंचा आहे. तसं म्हणाल तर ती लोकशाहीची हत्या आहे."

कवितो केरो फेसबुक ब्लॉगर आहेत आणि नागालँडच्या प्रश्नांबद्दल सतत लिहीत असतात. ते म्हणतात, "कोणत्याही संस्था-संघटनेला मी मत कोणाला द्यावं अथवा नाही हे सांगण्याचा अधिकार नाही. पण धर्मनिरपेक्षतेबाबत कोणीही तडजोड करता कामा नये, मग ते मोदी का असेनात."

केरो पुढे सांगतात की, "25 डिसेंबरला तुम्ही 'गुड गव्हर्नंन्स डे' साजरा कराल तरीही ख्रिश्चन स्पिरिट तुम्ही अजिबात कमी करू शकणार नाही. पण धर्माचं नाव घेऊन कोणी मला मत कोणाला देऊ नये, हे सांगू नये."

नागालँडमध्ये निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. मतदानानंतर जेव्हा ३ मार्चला निकाल येतील तेव्हाच खरं समजेल की चर्चच्या या अनावृत्त पत्राची राजकीय किंमत नक्की किती आहे.

हे पाहिलंत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)