#5 मोठ्या बातम्या : 'मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली'

'मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली' असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचं वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यासह आजच्या इतर पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे.

1. 'मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पन्हाळा तालुक्यातल्या गोलिवडे या त्यांच्या मामाच्या गावाला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. सत्कारानंतर बोलताना मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी टिप्पणी पवार यांनी केली.

2. शेतकऱ्यांना गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा

मागील आठवडाभर राज्यात ढगाळ वातावरण असल्यानं रविवारी त्याचा परिणाम दिसून आला.

लोकसत्तातल्या बातमीनुसार, रविवारी जालना, परभणी, बुलडाणा, बीडसह मराठवा़डा आणि विदर्भातल्या अनेक तालुक्यांमध्ये जोरदार गारपीट झाली.

कमी उत्पादन आणि कर्जमाफीच्या घोळामुळे त्रस्त शेतकऱ्यांना आता या अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे, असं या बातमीत म्हटलं आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आणि विमा कंपन्यांना आकडेवारी सादर करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.

3. मराठी अभियंत्याची ऑस्करवर मोहोर

मराठी चित्रपटांवर ऑस्करची नाममुद्रा कोरली जावी, हे मराठी माणसांचं स्वप्न विकास साठ्ये या मुंबईकर युवकाने सत्यात उतरविले आहे. लोकमतनं या संदर्भात बातमी दिली आहे.

'के 1 शॉटओव्हर' या कॅमेऱ्याची निर्मिती करण्यात मोलाचा वाटा उचलणारे साठ्ये यांना 90 व्या ऑस्कर अकॅडमी अवार्डच्या 'सायंटिफिक अँड टेक्निकल' पुरस्कारानं लॉस अंजलिस येथे गौरविण्यात आलं आहे.

हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाच्या कथानकाशी साजेशी धडपड करत विकास साठ्ये यांनी 'के 1 शॉटओव्हर' कॅमेरा तंत्र विकसित करून जागतिक सिनेमाचे छायांकन सुस्पष्ट केल्याचा बातमीत उल्लेख आहे.

4. जगातल्या पहिल्या 15 श्रीमंत शहरांमध्ये मुंबई

जगातल्या पहिल्या 15 श्रीमंत शहरांमध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबईचाही समावेश आहे. महाराष्ट्र टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार, मुंबईची एकूण संपत्ती 950 अब्ज डॉलर्स (साधारण 61 लाख कोटी रुपये) एवढी आहे.

जगातल्या सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत 3 ट्रिलियन डॉलर्स (सुमारे 193 लाख कोटी) संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहे, न्यू यॉर्क शहर. 'न्यू वर्ल्ड वेल्थ' या संस्थेच्या अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

5. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

महानगरपालिकेतून बडतर्फ झालेल्या चार कर्मचाऱ्यांनी नोकरीत पुन्हा सामावून घेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर इथल्या रामगिरी या निवासस्थानासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सकाळनं ही बातमी दिली आहे. पोलिसांनी वेळीच या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)