सोशल : 'ग्रहणानंतर मोबाईलला आंघोळ घालून फेसबुक सुरू करणार'

चंद्रग्रहण असल्यामुळे आज संध्याकाळी अनेक मंदिरं बंद ठेवली गेली. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे हे सिद्ध झालं असूनही त्याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, ग्रहणाच्या काळात मंदिर बंद ठेवण्याविषयी तुमचं काय मत आहे. वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. काही जणांनी या कृतीचं समर्थन केलं तर अनेकांना असं करणं अंधश्रद्धेचं प्रतीक वाटलं.

अनेकांच्या प्रतिक्रिया मजेशीर होत्या. आलेल्या सगळ्या प्रतिक्रियांपैकी या काही प्रातिनिधिक.

अनिरुद्ध पवार म्हणतात, "ग्रहणमोक्ष झाल्यावर मोबाईलला आंघोळ घालूनच फेसबुक आणि व्हॉटस्अॅप सुरू करावं."

जयराम तेल्हुरे सांगतात की, "ग्रहणाच्या काळात मंदिर बंद ठेवल्याची बातमी या आधी कधी ऐकलेली किंवा वाचलेली नाही."

"अशा अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या परंपरा लाथाडून द्यायला हव्यात," असं मत व्यक्त केलं आहे सचिन बांगल यांनी.

"ग्रहण चालू असेपर्यंत आम्ही आमचं फेसबुक अकाऊंट बंद ठेवणार आहोत," अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे प्रशांत ताथे यांनी.

मानसी लोणकर लिहितात, "जर संपूर्ण निसर्ग देवाच्या अस्तित्वामुळे चालतो मग ग्रहणाचा देवावर काय फरक पडणार?"

"या काळात लोकांना चंद्रग्रहण पाहाता यावं म्हणून मंदिरं बंद ठेवली असतील," अशी कोपरखळी सागर नाईकांनी मारली आहे.

अमोल शेडगे लिहितात की, "प्रबोधनकार ठाकरे यांचं धर्माची देवळे आणि देवळांचे धर्म हे पुस्तक कोणी वाचलंय का? सगळा गंज उतरून जाईल आणि ते बाळासाहेब ठाकरे यांचे पिता असल्याने कोणी नावं ठेवू शकणार नाही."

प्रतिक शिंदे म्हणतात, "मंदिर बंद ठेवलीच पाहिजेत. तो श्रद्धेचा भाग आहे."

जितेंद्र गजघाट म्हणतात, "21 व्या शतकात आलो, हातात तंत्रज्ञान आहे तरी मेंदूला लागलेली वाळवी काही कमी व्हायची नावं घेत नाही."

बीबीसी मराठीने चंद्रग्रहण लाईव्ह दाखवलं होत. यात सुपरममून, ब्लू मून आणि खग्रास चंद्रग्रहण असा तिहेरी सोहळा तज्ज्ञतांच्या विश्लेषणासह वाचकांना पाहाता आला. यावर देखील अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या.

नागार्जुन वाडेकर लिहितात की, "अनेक वर्षांनंतर असा चमत्कार दिसत आहे. माणसाचा जन्म होण्याच्या आधीपासून अशा घटना घडत आहेत त्यामुळे याचा माणसावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)