ग्राउंड रिपोर्टः तिरंगा यात्रेनंतर पेटलेलं कासगंज अजूनही धुमसतंय

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी कासगंजहून

उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये प्रजासत्ताक दिनाला काढण्यात आलेल्या एका तिरंगा रॅलीदरम्यान दोन समुदायांमध्ये संघर्ष झाला. त्याला हिंसेचं गालबोट लागलं आणि यात एका तरुणाचा जीवही गेला.

कासगंजमध्ये या घटनेनंतर जमावबंदी लावण्यात आली आहे आणि आता या हिंसाचाराची धग उत्तर प्रदेशसोबतच सर्वत्र पोहोचत आहे. नेमकं काय घडलं त्या दिवशी कासगंजमध्ये?

26 जानेवारी म्हणून काही तरुणांनी शहरातून बाईकवरून तिरंगा रॅली काढली. जेव्हा रॅली बड्डूनगर भागातून जात होती, तेव्हा त्यात सहभागी तरुणांचा मुस्लीम समाजातल्या काही लोकांसोबत वाद झाला. त्यानंतर या वादाने हिंसक वळण घेतलं.

दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या. आणि मग गोळीबारही झाला. यात चंदन गुप्ता नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला तर नौशाद नावाचा तरुण गंभीर जखमी झाला.

चंदन गुप्ता या तरुणावर शनिवारी अंतीम संस्कार करण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा शहरात अचानक हिंसा भडकली.

सहावर गेट भागातल्या जवळपास दोन डझन दुकानांना लुटून पेटवण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय नदरई गेट आणि बाराद्वारी भागांमध्ये अनेक दुकानांना आग लावण्यात आली.

शुक्रवारनंतर कोणाचा मृत्यू झाल्याची बातमी आलेली नसली तरी वाहन आणि दुकानं जाळण्याच्या घटना शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.

दरम्यान हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांप्रती निर्माण झालेला द्वेष थांबायचं नाव घेत नाही आहे. शिवाय दोन्ही समाजांमध्ये पोलीस प्रशासनाविरोधातही नाराजी आहे.

कासगंजमधये प्रवेश केल्यानंतर नदरई गेटपासून पुढं एक किलोमीटर दूरवरील घंटाघर आणि बाराद्वारपर्यंत जळालेली दुकानं, अद्याप तिथून निघणारे धुराचे लोट आणि जागोजागी जळालेली वाहनं, मागील दोन दिवसांपासून इथल्या रस्त्यांवर हेच दृष्य पाहायला मिळत आहे.

शनिवारी दिवसभर पोलिसांच्या वाहनांमुळं आणि सायरनमुळं कासगंजच्या रस्त्यांवर पसरलेली शांतता भंग पावत होती. मुख्य रस्त्यावर फक्त पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवानच दिसत होते. गल्लीबोळातून अनेक वेळा लोकांचा जमाव पोलिसांपासून स्वतःला लपवत रस्त्यांवरील दृष्य पाहण्यासाठी अधूनमधून डोकावत होता.

तिरंगा रॅली

जिथं सर्वाधिक हिसेंच्या घटना घडल्या त्या नदरई गेटच्या परिसरात आम्ही पोहोचलो तेव्हा अंधार पडला होता. तिथंच एका गल्लीत काही अंतर चालल्यावर आम्हाला एका घराबाहेर शेकोटीच्या आजूबाजूला बसलेले दहा-बारा लोक दिसले. या लोकांकडे बघूनच इथं एखादी दुर्घटना घडली असावी, याचा अंदाज येत होता.

हे घर होतं त्याच चंदन गुप्ताचं जो शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात गोळी लागून मृत्यू पावला होता.

बाहेर बसलेल्या लोकांपैकी एक होते चंदन गुप्ताचे वडील सुशील गुप्ता, त्यांची नजर शुन्यात हरवलेली. आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणाले, "मुलांच्या ग्रुपने तिरंगा रॅली काढली होती. ही रॅली तिथून जात होती. मुस्लीम भागात लोकांनी 'हिंदुस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देण्यापासून रोखलं. जेव्हा मुलांनी घोषणा सुरूच ठेवल्या तेव्हा त्यांनी दगडफेक केली. नंतर गोळी झाडली. त्यातच माझा मुलगा गेला. मला न्याय हवाय!"

आणि त्यांना रडू कोसळलं. त्यांना पाहून तिथे बसलेल्या इतरांचा राग अनावर झाला. मोठ्या आवाजात ते सांगू लागले, "आम्ही आमच्या देशात तिरंगा रॅली काढू नाही शकत का?", "आम्हाला आमच्याच घरांमध्ये कैद कऱण्यात आलं आहे", "आम्हाला बळजबरीनं आमच्याच मुलावर दुसऱ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी भाग पाडलं जात आहे."

जाळपोळीच्या घटना

तिथंच बसलेले वयोवृद्ध राम दयाळ रागातच बोलले, "कोण आगी लावत आहे, कोण गाड्या जाळत आहे, याचा शोध प्रशासनानं लावावा. आम्ही इथं मुलाच्या मृत्यूच्या दुःखात आहोत. आम्ही दंगली करायला जाणार आहोत का? दूध, औषधीसारख्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठीही प्रशासन आम्हाला बाहेर पडू देत नाही आहे."

दरम्यान, शुक्रवारीच्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरातच कर्फ्यूसारखं वातावरण आहे. शुक्रवारी कर्फ्यूची औपचारीक घोषणा करण्यात आली होती.

पण शनिवारी अलीगढ झोनचे ADG अजय आनंद यांनी बीबीसीशी बोलताना याबद्दल नकार दिला. मात्र "आम्ही हिंसा माजवणाऱ्यांना सोडणार नाही. दोन FIR दाखल करण्यात आल्या आहेत आणि उपद्रवी लोकांचा शोध घेतला जात आहे," असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी सांगितलं की स्थिती नियंत्रणात असून खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 49 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर नऊ लोकांना अटक करण्यात आलं आहे.

पण जाळपोळीच्या घटना फक्त शनिवारी रात्रभर आणि रविवारी सकाळीही सुरू होत्या.

प्रशासन आणि पोलीस

पोलीस आणि प्रशासन लोकांना घरातच राहण्यासाठी भाग पाडत असून कुणाच्याच अडचणी ऐकून घेतल्या जात नाही आहे, असं सांगत स्थानिकांनी आपला राग व्यक्त केला.

शिवालय गल्लीत ज्या पद्धतीनं राग दिसत होता, तसाच राग तिथून दोन किलोमीटर दूरवर असलेल्या बिलराम गेट भागात दिसत होता. इथूनच हिंसेला सुरुवात झाली होती.

बिलराम गेट परिसरातल्या बड्डूनगर मोहल्ल्यातल्या लोकांची तक्रार होती की त्यांना मुद्दामहून त्रास दिला जात आहे. मोहम्मद असलम म्हणाले, "आमची दुकानं जाळण्यात येत आहेत. आम्ही इथं बसलोय. पोलीस आम्हाला बाहेर पडू देत नाही. आम्हाला हे पण माहीत नाही की कुणाचं दुकान जळालंय आणि कुणाचं वाचलंय."

आमचं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नसल्याची तक्रार फरीद यांनी केली. "अधून-मधून पोलीस येतात आणि दोन-चार लोकांना पकडून घेऊन जातात."

अनेक लोक गायब असल्याचंही लोकांचं म्हणत होतं, पण पोलिसांनी या गोष्टीला दुजोरा दिला नाही.

दुःखद वातावरण

प्रशासनाने हिंदू समुदायाच्या लोकांना मोकळं सोडलं आहे जेणेकरून ते आमच्या मालमत्तेचं नुकसान करू शकतील, असे थेट आरोप या भागातील लोकांनी केले.

सलमान अहमद सांगायला लागले, "ते म्हणतात की आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. पण काहीच नियंत्रण नाही. आम्हाला घरांमध्ये कैद करून ठेवलं आहे आणि त्यांना पूर्ण मोकळं सोडलं आहे. कलम 144, सारं काही आमच्यासाठीच लावण्यात आलेलं आहे. इथं एकही नेता किंवा खासदार आमचे हाल बघण्यासाठी आलेला नाही."

बिलराम गेट भागातल्या तिरछल्ला मोहल्ल्यात नौशादच्या घरातही वातावरण दुःखद होतं. नौशादचे वडील वलीउल्ला म्हणाले, "माझा मुलगा सामान आणायला बाहेर पडला होता. पण काही वेळानं पळतच घरी आला आणि म्हणाला मला गोळी लागली आहे. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तो गंभीर असल्याचं सांगत अलिगढला पाठवलं."

दहशतीमागचं का?

गंभीर अवस्थेत नौशाद सध्या अलिगढच्या हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे. त्याच्या तीन लहान मुलांची देखभाल त्याचे वडील आणि बहीण करत आहेत.

दरम्यान, या सगळ्यामध्ये असे अनेक लोकं आहेत, जे काही कारणांमुळे कासगंजमध्ये आले होते किंवा त्यांना यावं लागलं होतं, त्यांना अजूनही या दहशतीचं कारण समजलेलं नाही.

रस्त्यांवर कोणी आढळून आलं की पोलीस त्यांना पिटाळून लावतात. मात्र इतकी सतर्कता असतानाही रविवारी सकाळी दोन दुकानांना आग लावण्यात आली होती.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)