You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'कर्नाटक भारतातच आहे, पाकिस्तानात नाही'
सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्रिपद सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी 'जन्मावे तर कर्नाटकमध्येच' हे कन्नड अभिमान गीत गायल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.
बेळगावजवळच्या गोकाक तालुक्यातल्या तवगमध्ये शुक्रवारी एका कार्यक्रमास पाटील यांना हजेरी लावली होती. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हेसुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कन्नडमधून 'जन्मावे तर कर्नाटकमध्येच जन्मावे' (हुट्टी दरे कन्नड नल्ली हुट्ट बेकू) हे दाक्षिणात्य अभिनेता राजकुमार यांचं गीत गायलं. कन्नडमध्ये गीत गाऊन त्यांनी कानडी लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान मराठी युवा मंच एकीकरण समितीनं पाटील यांचा निषेध केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांनी मराठी जनतेची माफी मागावी, असं म्हटलं आहे.
त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरून झालेल्या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. "बेळगावमधल्या गोकाकच्या तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी घडलेला प्रकार सहज जाणिवेतून घडलेला प्रकार आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता."
"यल्लाप्पा म्हणून माझ्या घरातीलच एक कुटुंबातील कार्यकर्ता गोकाक तालुक्यातील तवग येथे राहतो. त्याने गावात सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. या कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी तिथे गेलो होतो."
तेथील वातावरण पाहून तसंच गावकर्यांनी कन्नड भाषेतून संवाद आणि गाणं म्हणण्याची विनंती केली. त्यानुसार मी त्या ठिकाणी दुर्गा देवीवर सुमारे दोन मिनिटं कन्नड भाषेतून संवाद साधला आणि गाण्याच्या दोन ओळी गायल्या. तसेच ग्रामविकास या विषयावर सुमारे वीस मिनिटं मी हिंदी भाषेतून भाषण केले. तेथील वातावरणानुसार घडलेला हा एक सहज प्रकार आहे. यामागे अन्य कुठलाही राजकीय हेतू नाही." असं त्यांनी आपल्या पोस्ट म्हटलं आहे.
या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकचं गर्वगीत गाण्याबद्दल तुमचं काय मतं आहे?
वाचकांनी त्यांच्या प्रतिक्रिया पाठवल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक.
श्रीकांत कदम यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "कर्नाटकात विधानसभेच्या तोंडावर भाजपची जाहिरातबाजी करण्यासाठी चंद्रकांतदादांनी कन्नड अभिनेता राजकुमारचे गीत गायलं. मात्र सीमाभागात मराठी बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराची जाणीव त्यांना राहिली नाही."
"पाटलांच्या या राजकीय स्वार्थाला पाहून 'भाजपने केवळ राजकीय स्वार्थ पाहू नये, मराठीचा आणि मराठी बांधवांचा विचार करावा अन्यथा सीमावासीय भडकले तर महाराष्ट्रात विधानसभेत याची किंमत मोजावी लागेल', असा इशारा सीमावासीयांनी दिला आहे," असंही ते पुढे म्हणतात.
गणेश पुरी लिहितात, "कर्नाटक भारतातच आहे. पाकिस्तानात नाही. राजकारणासाठी दोन्ही बाजूने एवढा तिरस्कार बरा नव्हे." किशोर बोमानेही हेच लिहितात.
"देशाला जर एकसंध ठेवून राष्ट्रीय एकात्मता जोपासायची असेल तर आपल्याला राजकारण्यापासून दूर राहावे लागेल. हे राजकारणी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. हे सर्व व्होट बँकेसाठी चाललं आहे. याचा कर्नाटकातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला काही फायदा नाही," असं मत मांडलं आहे गुरू बल्की यांनी.
तर प्रदीप मसकर यांना वाटतं की, "सीमावर्ती भागातले अत्याचार पाहता, चंद्रकांत पाटील यांचं वर्तन असभ्य आणि महाराष्ट्र विरोधी म्हणावं लागेल.
"कर्नाटक हा भारताचा अविभाज्य घटक आहे हे ढोंगी महाराष्ट्र प्रेमींनी समजून घ्या," असं परखड मत व्यक्त केलं आहे भाऊसाहेब पवार यांनी.
कोहम कोहम या अकाउंटवरून कमेंट केली आहे की, "चंद्रकांत पाटील हे सामान्य व्यक्ती नाहीत. ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत, महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, अशा पदावर असलेल्या व्यक्तींनी थोडे तारतम्य बाळगायचे असते."
"आज सीमाभागात कर्नाटक राज्य मराठी भाषा व मराठी माणसांची गळचेप करत असताना महाराष्ट्राच्या मंत्र्यानी कर्नाटक गौरव गीत गाणे महाराष्ट्राचा अपमान आहे," असंही ते पुढे लिहितात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)