प्रेस रिव्ह्यू : भारत आणि इस्राईलमध्ये 9 महत्त्वाचे व्यापारी करार

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भारत भेटीत दोन्ही देशांतील व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही देशांत 9 व्यापारी करार झाले आहेत.

या करारांमध्ये तेल, नैसर्गिक वायू आणि इतर सह-उत्पादनांशी निगडित महत्त्वाच्या करारांचा समावेश आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईच्या कंपन्यांना भारताच्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केलं आहे.

भारतीय लष्कराच्या कारवाईत 7 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, पाकिस्तानी सैनिकांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराच्या कारवाईत सात पाकिस्तानी सैनिकांचा सोमवारी मृत्यू झाला.

एलओसीवरील जंगलोट भागात आणि मेंढर सेक्टर नजीक ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी सैनिकांमध्ये एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या हद्दीतच हे मृत्यू झाले असून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या खटाल्यांपासू 'ते' 4 न्यायाधीश दूर

हिंदुस्तान टाइम्समधील वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टात सोमवारपासून देश पातळीवरील महत्त्वाच्या विषयांवरील याचिकांची सुनावणी होणार आहे.

आधारपुढील आव्हानं, पुरुषांचे समलैंगिक संबंध, शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश या विषयांवर सुनावण्या सुरू होणार आहेत. मात्र, या सुनावण्यांसाठी गठित करण्यात आलेल्या खंडपीठांमध्ये सरन्यायाधीशांविरोधात दंड थोपटलेल्या चारपैकी एकाही न्यायाधीशाचा समावेश नाही.

देशाचे अॅटर्नी जनरल आणि बार काऊन्सिल ऑफ इंडिया यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शमल्याचा दावा करण्यात आल्यानंतर खंडपीठाची ही नेमणूक समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

कमला मिलमध्ये पुन्हा रुफटॉप हॉटेलसाठी 7 अर्ज

महाराष्ट्र टाइम्समधील वृत्तानुसार, कमला मिलमधील कॅफे व पबला लागलेल्या आगींनंतर मुंबई महापालिकेचे रूफटॉप हॉटेलांसाठीचे धोरण चर्चेत आले आहे.

मोजो रेस्टोपब व वन अबव्ह हे पब अवैध‌पणे रूफटॉपवर चालवले जात असल्याचे आढळून आले होते. आगीच्या घटनेपूर्वी वन अबव्हने रूफटॉपसाठी पालिकेकडे अर्ज केल्याचे उघडकीस आले आहे.

तसंच आता या घटनेनंतरही कमला मिल परिसरातील एकूण सात पबनी रूफटॉपच्या परवान्यांसाठी पालिकेकडे अर्ज केले आहेत.

त्यांना परवानगी मिळाल्यास टेरेसवर पब सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

एअर इंडियाचे चार भाग करणार : जयंत सिन्हा

एनडीटीव्हीवरील वृत्तानुसार, कर्जबाजारी झालेली विमान सेवा कंपनी एअर इंडियाचे चार उपकंपन्यांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या चार उपकंपन्यांचे 51 टक्के भाग विकण्यात येणार आहेत.

ही प्रक्रिया 2018च्या शेवटपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. देशांतर्गत सेवा, विमानतळावरील कामे, अभियांत्रिकी कामे हे सुद्धा वेगळे करुन विकण्यात येणार आहेत.

अशी माहिती नागरी उड्डाण व हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)