डहाणूजवळ बोट उलटून तिघींचा मृत्यू; ONGC हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये 4 ठार

पालघर जिल्ह्यातल्या डहाणूजवळ 35 ते 40 विद्यार्थ्यांना समुद्रात घेऊन गेलेली बोट बुडाली आहे. यातील 32 जणांना वाचवण्यात आलं असून 3 विद्यार्थिंनींचा मृत्यू झाला आहे.

काही जण अजूनही बेपत्ता आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सर्व विद्यार्थी डहाणूच्या बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयातले होते. त्यांनी समुद्रात फेरफटका मारायला धीरज हंभिरे यांच्या बोटीतून जाण्याचं नियोजन केलं.

त्यात जान्हवी सुरती (17), सोनाली सुरती (17) आणि संस्कृती मायावंशी (17) रा. डहाणू मसोली, यांचा बुडून मृत्यू झाला आहे. बचाव कार्य अजूनही सुरू असून काही जण बेपत्त असल्याचं सांगितलं जात आहे.

डहाणू पारनाका बीच इथे सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली. एका बोटीतून हे विद्यार्थी समुद्रात गेले होते. पण अचानक ही बोट उलटली आणि सर्व विद्यार्थी पाण्यात पडले. यावेळी समुद्रात असलेल्या इतर बोटींतील मच्छिमारांनी या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली.

या ठिकाणी मदत कार्य सुरू असून तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टरही शोध कार्यात सहभागी झाले आहे, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी दिली.

ONGCचं हेलिकॉप्टर अपघातात 4 ठार

अरबी समुद्रातच ONGCच्या पाच कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारं डॉफिन AS365 N3 हे पवनहंस हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं ONGCने सांगितलं आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये ONGCच्या पाच कर्मचाऱ्यांसोबत दोन पायलट होते. ONGCने दिलेल्या माहितीनुसार चार जणांचं शव बाहेर काढण्यात आली आहेत.

इतरांचा शोध घेण्यासाठी क्रॅश झाला त्या भागात ONGCच्या बोटी आणि हेलिकॉप्टर, तसंच तटरक्षक आणि भारतीय नौदल युद्धपातळीवर काम करत असल्याचं ONGCने म्हटलं आहे.

हेलिकॉप्टरने सकाळी 10.20ला जुहू हेलिबेसवरून झेप घेतली होती. सकाळी 10.40 वाजता ते ONGCच्या समुद्रातील लाँचपॅडवर पोहचणं अपेक्षित होतं. मात्र 10.35 वाजता हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता.

या घटनेमागच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याचं ONGCने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)