You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रेस रिव्ह्यू : 'काश्मीरमधल्या आगामी पंचायत निवडणुकांत भाग घेणाऱ्यांचे डोळे काढू'
काश्मीरमध्ये फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकांत भाग घेणाऱ्यांचे डोळे काढू, अशी धमकी हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेनं दिली आहे.
जहालवादी संघटना 'हिजबुल मुजाहिद्दीन'नं काश्मीरमध्ये फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकांत भाग घेणाऱ्यांचे डोळे काढू, अशी धमकी दिली आहे. ही बातमी 'द हिंदू'नं दिली आहे. 'हिजबुल'चा नेता रियाज निक्कू यानं ही धमकी दिली आहे.
याशिवाय अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीचा बेपत्ता झालेला पीएचडीचा विद्यार्थी अब्दूल मनान वाणी हा हिजबुलमध्ये सहभागी झाल्याचं आणि त्याचे हिजबुलचा नेता सईद सलाउद्दीननं संघटनेत स्वागत केल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. हा विद्यार्थी 4 दिवसांपासून बेपत्ता होता.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश पांडे यांनी खात्री केल्याशिवाय या वृत्ताला दुजोरा देता येणार नाही, असं म्हटलं आहे.
तर विद्यापीठातले वरिष्ठ अधिकारी एम. मोहसीन खान यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा विद्यापीठासाठी सर्वोच्च असून तपासात सहकार्य केलं जाईल, असं म्हटलं आहे.
भारत मुक्त, पण पुन्हा संकटात : राहुल गांधी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बहरीनमध्ये झालेल्या अनिवासी भारतीयांच्या परिषदेत केंद्र सरकार लोकांत फूट पाडत असल्याची टीका केली आहे.
ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पिपल ऑफ इंडियन ओरिजिन या संघटनेनं ही परिषद आयोजित केली होती. हिंदुस्तान टाइम्सनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. भारत जरी मुक्त असला तरी पुन्हा एकदा संकटात आहे. सरकार रोजगार निर्मितीमध्ये अपयशी ठरलं आहे.
तर दुसरीकडे ते सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणण्याचं सोडून बेरोजगारीच्या रागाचं परिवर्तन जातीधर्मातल्या द्वेषात करत आहेत. रोजगाराअभावी देशात मोठा असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका देखील त्यांनी केली.
चित्रपटगृहांतील राष्ट्रगीत सक्ती मागे?
चित्रपटगृहांतील राष्ट्रगीत वाजवण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात केली आहे.
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. यासंबंधीचे नियम सरकार 6 महिन्यात बनवेल.
तोपर्यंत 30 नोव्हेंबर 2016 रोजी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी स्थगित करावी, अशीही विनंती केंद्रानं केली असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
शरद पवार धुरंदर नेते : संभाजी भिडे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ या संघटनांवर टीका केली आहे. या संघटना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत करून सांगत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
एबीपी माझानं त्यांची मुलाखत घेतली आहे.
भीमा कोरेगावमध्ये जे घडलं ते आश्चर्यजनक आहे, त्यात शिवप्रतिष्ठानचा अजिबात हात नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
भीमा कोरेगावात झालेल्या हिसंक घटनांबद्दल भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोदं आहे.
भिडे यांनी या मुलाखतीमध्ये हे आरोप फेटाळले आहेत. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार धुरंदर नेते असल्याचं भिडे यांनी म्हटलं आहे.
'पद्मावत' राजस्थानात प्रदर्शित होणार नाही
संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा सिनेमा राजस्थानमध्ये प्रदर्शित होणार नाही, असं राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी म्हटलं आहे.
इंडिया टुडेनं हे वृत्त दिलं आहे. सेन्सार बोर्डनं या सिनेमात विविध बदल सुचवले होते.
त्यानंतर हा सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. सरकारनं सांस्कृतिक मंत्री गुलाब चंद कटारिया यांना याविषयी सूचना दिल्या आहेत.
'राणी पद्मिनी फक्त इतिहास नाही', असं वसुंधराराजे यांनी म्हटल्याचं या बातमीमध्ये म्हटलं आहे.
आर्थिक नुकसान झेलून रोहितचं मुंबई इंडियन्सला प्राधान्य
काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या अकराव्या हंगामासाठी संघात कायम राखण्यात आलेल्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली. 'टाइम्स नाऊ'ने हे वृत्त दिलं आहे.
मुंबई इंडियन्स संघानं कर्णधार रोहित शर्मासह जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याला संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला.
मुंबई इंडियन्सने 15 कोटी रुपये देत रोहितला आपल्या ताफ्यात कायम राखले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला 17 कोटी रुपये खर्चून आपल्याकडेच कायम राखलं.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन व्दिशतकं नावावर असणाऱ्या रोहितला मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने 15 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली.
प्रत्यक्षात रोहितलाही विराटप्रमाणेच 17 कोटी रुपये मिळण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती मात्र मुंबई इंडियन्स संघाचंच प्रतिनिधित्व करायला मिळावं यासाठी रोहितने 2 कोटी रुपये कमी मिळत असतानाही मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्यालाच प्राधान्य दिलं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)