प्रेस रिव्ह्यूः कोरेगांव भीमामध्ये दगडफेक, जाळपोळ; एकाचा मृत्यू

पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे, असं वृत्तपत्रांनी म्हटलं आहे.

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, कोरेगाव भीमामध्ये किरकोळ वादातून दोन गट भिडले. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो जण जमले होते. त्यामुळे नगर रस्त्यावर गर्दी होती. त्याच वेळी झालेल्या किरकोळ भांडणातून दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली, असं लोकसत्तानं म्हटलं आहे.

घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले. औरंगाबाद आणि नांदेड इथं किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. नगर-पुणे रस्त्यावर राज्य राखीव दलाच्या ६ कंपन्या तैनात केल्याचं वृत्त आहे.

सकाळच्या वृत्तानुसार, पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसंच कोंढापुरी इथं अनेक वाहनांची तसेच रस्त्यावरील दुकानांची तोडफोड व जाळपोळ झाली.

दंगलखोरांनी 15 ते 20 दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जाळपोळ केली. पोलिसबळ कमी असल्यानं सुमारे तीन-ते चार तास हा धुमाकूळ सुरू होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण सरकारनं गांर्भीयानं घेतलं असल्याचं सकाळच्या वृत्तात म्हटलं आहे. "या प्रकरणात जे सहभागी आहेत, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.", असंही त्यांनी सांगितल्याचं सकाळनं वृत्त दिलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्याचं लोकमतनं म्हटलं आहे.

गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज स्वस्त होणार

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने व्याजदरात कपात केल्यानं गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना याचा फायदा होणार आहे.

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, बँकेने विद्यमान मूळ व्याजदरात (बेस रेट) आणि संदर्भीय मूळ कर्जदरात (बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट )०.३० टक्के कपातीची घोषणा केली आहे.

मूळ व्याजदराशी अजूनही कर्जं निगडित असलेल्या स्टेट बँकेच्या जुन्या कर्जदारांना याचा मोठा फायदा होईल. यात गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे.

बँकेने मूळ व्याजदर वार्षिक ८.९५ टक्क्य़ांवरून आता ८.६५ टक्के केला आहे. अशा प्रकारे स्टेट बँकेचा मूळ व्याजदर हा देशात सर्वात कमी ठरला आहे.

मध्यंतरी रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपात होऊनही सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नव्हता. तसेच बँकेने गृहकर्जाच्या प्रक्रिया शुल्कातील सूट ३१ मार्च २०१८ पर्यंत विस्तारित केली आहे.

मुंबईजवळ समुद्रात तेल-वायूचे नवे साठे

मुंबईजवळ अरबी समुद्रात असलेल्या सध्याच्या 'मुंबई हाय तेलक्षेत्रा'च्या पश्चिमेस खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या आणखी बऱ्याच मोठ्या साठ्यांचा शोध घेण्यात 'ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन' (ओएनजीसी) या अग्रगण्य सरकारी तेल कंपनीस यश आलं आहे.

हे नवे साठे येत्या दोन वर्षांत विकसित करून तिथून सुमारे ३० दशलक्ष टन तेल आणि तेवढ्याच वायूचे उत्पादन करणं शक्य होऊ शकेल.

नवर्षारंभानिमित्त संसदेला सोमवारी ऐनवेळी सुटी जाहीर केली गेली. तरी आजच्या कामकाजात नमूद असलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेली ही माहिती लोकसभेच्या वेबसाइटवरून प्रसिद्ध करण्यात आली.

आज डॉक्टर संपावर

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी मंगळवारी देशातील खासगी वैद्यकीय सेवांमधील डॉक्टरांनी १२ तास ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांच्या संघटनेतर्फे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मात्र वैद्यकीय सेवा देण्यात येईल, असं आयएमएने स्पष्ट केलं आहे.

नव्या विधेयकामध्ये डॉक्टरांच्या भूमिकेचा आणि सहभागाचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही असा आरोप संघटनेनं केला आहे. ज्या समितीमध्ये डॉक्टरांचा सहभाग अधिक हवा त्यात बिगरवैद्यकीय व्यक्तींचा सहभाग वाढवण्यात आलेला आहे असं संघटनेचं हणनं आहे.

तिहेरी तलाकविरुद्ध लढणारी इशरत भाजपमध्ये

मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या प्रथेविरोधात आवाज उठवून न्यायालयात दाद मागणाऱ्या याचिकाकर्त्या इशरत जहाँ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

इशरत यांच्या पतीने त्यांना दुबईतून फोन करून तोंडी तलाक दिला होता. त्यानंतर त्यांनी या प्रथेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

सकाळच्या वृत्तानुसार, इशरत जहाँ यांना उदरनिर्वाहासाठी नोकरी देण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचं पश्‍चिम बंगालमधील भाजप महिला मोर्चाच्या नेत्या लोकेत चॅटर्जी यांनी सांगितलं.

तोंडी तलाकला गुन्हेगारी कृत्य ठरविणारं विधेयक केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात लोकसभेत मंजूर केलं. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी इशरत जहाँ यांनी भाजपची वाट धरली. त्या हावडा येथील रहिवासी आहेत.

शनिवारी त्या भाजपच्या कार्यालयात आल्या होत्या. तिथे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर पक्षाच्या कोलकता येथील प्रदेश कार्यालयात त्यांचं स्वागत करण्यात आले.

रत्नागिरीचे मेजर प्रसाद महाडिक यांचा चीनच्या सीमेजवळमृत्यू

मेजर प्रसाद गणेश महाडिक यांना चीनच्या सीमेवर दारुगोळ्याची तैनात तपासत असताना मृत्यू आला.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, विरार पश्चिमेकडील यशवंत सोसायटीत राहणारे महाडिक हे गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावचे सुपुत्र होते. 2010 पासून ते अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात दारुगोळा चेक करण्याचे काम करत होते.

31 डिसेंबरलाही नेहमीप्रमाणे दारुगोळा चेक करण्यासाठी गेले असता सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)