माळावरची मेजवानी : औरंगाबादचा हुर्डा

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - माळावरची मेजवानी : औरंगाबादचा हुर्डा
    • Author, अमेय पाठक आणि रोहन टिल्लू
    • Role, बीबीसी मराठीसाठी

महाराष्ट्राच्या विभिन्न खाद्य संस्कृतीत माळावरच्या मेजवानीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या माळावरच्या मेजवानीतील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे 'हुर्डा'!

दिवाळी सरली, ज्वारीचं पीक टरारून आलं की, मराठवाड्याला हुर्डा पार्टीचे वेध लागतात. हुर्डा पार्टी ही आता मराठवाड्यातलीच नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातलीही संस्कृती बनली आहे.

हुर्डा पार्टी
फोटो कॅप्शन, हुर्डा आणि भाजलेला पापड

वयाची अनेक वर्षं मागे सारणारी थंडी, त्या थंडीतलं कोवळं कोवळं उन्ह, उबदार शेकोटी, त्या शेकोटीत भाजली जाणारी ज्वारीची कणसं, मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याची चटणी, दही-साखरेची वाटी... एवढ्यानं चाळवलेली भूक भागवायला ठेचा-भाकरी, खरपूस भाजलेल्या वांग्याचं भरीत आणि गुऱ्हाळातला ताजा गूळ... याला म्हणतात हुर्डा पार्टी!

हुर्डा पार्टी
फोटो कॅप्शन, कणीस भाजलं की, ते मस्त चोळून त्याचे दाणे काढले जातात.

नुसतं वर्णन वाचूनही जिभेचा नळ सुरू होतो तिथं प्रत्यक्ष अनुभवाची मजा काही औरच! हा अनुभव शहरातल्या लोकांनाही मिळावा, म्हणून आता मराठवाड्यासह पश्चिम महराष्ट्रात हुर्डा पार्ट्यांचं आयोजन व्यावसायिक स्तरावर केलं जातं.

हुर्डा म्हणजे ज्वारीचं कोवळं कणीस. हे कणीस शेणाच्या गोवऱ्यांमध्ये भाजलं जातं आणि मग मस्त हातावर चोळून ते दाणे काढले जातात.

हुर्डा करताना शाळू ज्वारीचं कणीस प्रसिद्ध आहे. कारण ते चवीला गोड असतं.

हुर्ड्याचा उगम हा शेताच्या राखणदारीतून झाला, असाही एक समज आहे. रात्री शेतं राखायला शेतातल्या खोपटात जाऊन पहारा द्यायची पद्धत आहे.

हुर्डा पार्टी
फोटो कॅप्शन, शेणाच्या गोवऱ्यांवर ही कणसं भाजल्यावर त्यांना वेगळाच स्वाद येतो.

शेतं राखता राखता भूक लागली, तर बाजूची दोन-चार कणसं तोडून ती पेटवलेल्या शेकोटीत भाजून त्याचे दाणे खाल्ले जात.

त्यानंतर हळूहळू मित्र, आप्त आणि कुटुंबीय यांच्यासह मस्त मोकळ्या शेतात या हुर्ड्याच्या मेजवानीची सुरुवात झाली. आता तर या मेजवान्यांनी व्यावसायिक स्वरूप धारण केलं असून राज्यभरात ठिकठिकाणी त्यांचं आयोजन केलं जातं.

माळावरची मेजवानी स्पेशल

व्हीडिओ कॅप्शन, माळावरची मेजवानी - कोल्हापूरचं रस्सामंडळ!
व्हीडिओ कॅप्शन, वैदर्भीय खाद्यसंस्कृतीचा मानबिंदू - रोडगे

(अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)