प्रेस रिव्ह्यू : जेव्हा उपराष्ट्रपतीच फसव्या जाहिरातीला बळी पडतात...

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

वजन कमी करण्यासाठीच्या प्रयत्नात एका फसव्या जाहिरातीला बळी पडल्याची कबुली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत दिली.

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी राज्यसभेत फसव्या जाहिरातींवर बंदी घालण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. तेव्हा सभापती नायडू यांनी आपल्यासोबत घडलेला किस्सा सांगितला.

"वजन कमी करायचं असेल तर ही औषधं घ्या, अशी जाहिरात मी एका ठिकाणी पाहिली. ही जाहिरात पाहून मी 1000 रुपयांची औषधं मागवली. मला वाटलं यामध्ये गोळ्या असतील. पण त्यात एक चिठ्ठी निघाली - 'जर तुम्हाला औषधं हवी असतील तर आणखी हजार रुपये पाठवा'."

"मला शंका आली. मी ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी चौकशी केली आणि त्यात चौकशीमध्ये लक्षात आलं की ती कंपनी भारतात नाही तर अमेरिकेत आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करणं शक्य नाही. तेव्हा फसव्या जाहिरातींची समस्या खरंच गंभीर आहे," असं उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केलं.

2. मेघालयात काँग्रेसला भगदाड

मेघालयात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना इथल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेघालयातल्या काँग्रेसप्रणीत सत्ताधारी आघाडीच्या आठ आमदारांनी राजीनामा दिला आहे. या आठ आमदारांपैकी पाच आमदार काँग्रेसचे आहेत.

राहूल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ( संग्रहित)

आपल्या राजीनाम्यानंतर हे आमदार नॅशनल पीपल्स पार्टीत (NPP) जाणार आहेत. NPP आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे.

माजी उपमुख्यमंत्री रॉवेल लिंगडोह यांनीही राजीनामा दिला आहे. हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

त्यांच्याशिवाय अन्य तीन आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. यामध्ये एक आमदार युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचा आहे आणि अन्य दोन अपक्ष आहेत.

मेघालय विधानसभेच्या 60 सदस्यांपैकी 30 आमदार काँग्रेसचे होते. 15 डिसेंबरला एका आमदाराच्या राजीनाम्यानंतर आताच्या या घडामोडीमुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या 24 झाली आहे.

मेघालय विधानसभेचा कार्यकाळ 6 मार्च रोजी संपणार आहे.

3. हाफिज सईदसोबत दिसले पॅलेस्टाइनचे राजदूत, भारताची नाराजी

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि पॅलेस्टाइनचे राजदूत वलीद अबू अली, हे एका कार्यक्रमात एकत्र दिसले.

हाफिज सईद

फोटो स्रोत, Reuters

पाकिस्तानचे पत्रकार उमर कुरैशी यांनी हाफिज सईद आणि वलीद अबू अली यांचं छायाचित्र आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलं आहे.

रावळपिंडीतील लियाकत बागमध्ये हे दोघे जण एका सभेत एकत्र दिसले. यावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)