प्रेस रिव्ह्यूः बॅटरीच्या प्रकाशात मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया

उत्तर प्रदेशातील उन्नाव इथल्या एका सरकारी आरोग्य केंद्रात बॅटरीच्या प्रकाशात 32 रुग्णांच्या मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

हिंदूस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, या प्रकरणात मुख्य वैद्यकीय अधिकारी राजेंद्र प्रसाद यांना निलंबित केल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केली आहे.

नवाबगंज येथील आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सोमवारी रात्री वीजपुरवठा खंडीत झाला होता. मंगळवारी सकाळी वीजपुरवठा पुर्ववत झाला. मात्र, मुख्य वैद्यकिय अधिकारी प्रसाद यांनी वीज नसतानाही शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली.

या आरोग्य केंद्रात दोन बॅटरींच्या उजेडातच शस्त्रक्रिया करण्यात आल्या. उत्तर प्रदेशात फक्त बारा तास वीज पुरवठा होतो. याप्रकरणी नवाबगंजच्या आरोग्य केंद्राच्या प्रमुखाचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं या प्रकरणी अहवाल मागवला आहे.

सेन्सेक्स पहिल्यांदाच 34,000 वर

मुंबई शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्सनं 34,000 अंकाचं शिखर सर केलं आहे.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, मुंबई शेअर बाजार सेन्सेक्स मंगळवार दिवसअखेरीस 34010.61 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्येही अभूतपूर्व तेजी आढळली. तो 10531.50 वर बंद झाला.

मुबलक रोखता आणि गुंतवणुकदारांचा भरवसा या दुहेरी भांडवलावर ही तेजी दिसून आली. कंपन्यांच्या तिमाही निकालांविषयी आणि आगामी अर्थसंकल्पाविषयी शेअर बाजारामध्ये सकारात्मक उत्सुकता आणि विश्वास दिसू लागला आहे.

गेल्या काही आठवड्यात मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी आणि गुंतवणूक केलेली दिसते. यावर्षी आतापपर्यंत या गुंतवणूकदारांनी 7.71 अब्ज डॉलर किमतीच्या भारतीय शेअरची खरेदी केली आहे.

महाराष्ट्र भाजपमुक्त करू- अल्पेश ठाकोर

भारतीय जनता पक्षाच्या एकाधिकारशाहीमुळं देशातील संसदीय लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण झाला असून महाराष्ट्र भाजपमुक्त करू, असं वक्तव्य गुजरातमधील ओबीसी नेते आणि आमदार अल्पेश ठाकोर यांनी मुंब्रा इथं केल.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, पासबन-इ-अदब मुशायरा कमिटीतर्फे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा इथं मुशायराचं आयोजित केलं होतं. या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमदार अल्पेश ठाकोर यांनी देशात कधी नव्हे इतकी अराजकता सध्या माजली आहे, असा आरोप केला.

दलित, अल्पसंख्याक वर्ग दहशतीमध्ये जगत आहे. भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. ठराविक लोकांच्या भल्यासाठी जनतेला वेठीस धरलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोपलवार पुन्हा 'समृध्दी'चा कारभार बघणार

ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य सरकारनं मंगळवारी फेरनियुक्त केलं.

लोकमतच्या वृत्तानुसार, बोरीवलीतील एका मोठ्या भूखंडाच्या वाटपात मोपलवार यांची कोकण विभागाचे तत्कालीन आयुक्त म्हणून संशयास्पद भूमिका होती, असा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणात राज्य सरकारनं माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या समितीनं मोपलवार यांना क्लीन चिट दिल्यानंतर, राज्य सरकारनं मोपलवार यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतलं. तसेच ते ज्या पदावर आधी कार्यरत होते, पुन्हा त्याच पदावर त्यांना नियुक्त केलं आहे.

मोपलवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत ३ ऑगस्ट रोजी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलं होतं. तथापि, तेव्हापासूनची त्यांची १४५ दिवसांची अर्जित रजा आता मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळं या दिवसांचं वेतनदेखील त्यांना मिळेल.

आगामी वर्ष साखरेसाठी अडचणीचं - शरद पवार

पुढील वर्ष साखर उद्योगासाठी अडचणीचं ठरणार असून साखर कारखान्यांनी आतापासूनच गळीत हंगामाची आखणी करावी, असा सल्ला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते.

"आगामी वर्षात ऊस लागवडीचं क्षेत्रफळ जास्त आहे. राज्यात आणि उत्तर प्रदेशात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. राज्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये विक्रमी गळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गळीताचं नियोजन आतापासूनच करावं लागणार आहे. पुढील वर्षी मे आणि जून महिन्यापर्यंत कारखाने सुरू ठेवावे लागतील, अशी परिस्थिती आहे," असं ही पवार यांनी यावेळी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)