You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या भूमिकेत योग्य'
बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर नवीन चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका करणार आहे. हा चित्रपट 23 जानेवारी 2019ला प्रदर्शित होणार आहे.
या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, नवाजुद्दीनला बाळासाहेबांच्या भूमिकेत पाहून काय वाटतं? याला प्रतिसाद देताना बऱ्याच जणांनी नवाजुद्दीनच्या अभिनयाचं कौतुक केलं.
काही जणांना नवाजुद्दीननं बाळासाहेबांची भूमिका करणं पटत नसलं तरी अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
महेश नाडे म्हणतात, "नवाजुद्दिनची निवड अतिशय योग्य आहे. तो भूमिकेला योग्य न्याय देईल." विभावरी विटकर म्हणतात, "नवाजुद्दिन बाळासाहेबांच्या रोलसाठी परफेक्ट आहे." क्रांती गाडगीळ-भिडे हेच लिहितात.
निखिल वाघ यांनी नवाजुद्दीनचं खूप कौतुक केलं आहे. ते लिहितात. "मस्त वाटतं. त्यांच्यासारखी नैसर्गिक संवादशैली फक्त नाना पाटेकर यांच्याकडेच आहे.
"नवाजुद्दीन एक गुणी अभिनेता आहे. बॉलिवूडमधील यश त्यांना वारसाहक्काने मिळालेले नाही. त्यांनी आपण खणखणीत नाणे आहोत हे सिद्ध केलेलं आहे. एखाद्या भूमिकेत शिरून ती भूमिका वठवणारे खूप कमी कलावंत आहेत. त्यापैकी नवाजुद्दीन आघाडीचे कलाकार आहेत. ते नक्कीच ही जबाबदारी उत्तमरित्या पेलतील!" असं निखिल वाघ म्हणतात.
"कला क्षेत्रातला बापमाणूस निवडला आहे. चांगलाच आऊटपुट मिळेल," असं लिहिलं आहे निशांत भोईनल्लू यांनी.
विशाल सावणे यांना नवाजुद्दीनच्या निवडीविषयी काही तक्रार नाही पण ते एक वेगळाच मुद्दा मांडतात. "नवाज ही भूमिका उत्तम साकारू शकेल पण 2019 च्या निवडणुकांच्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित करून भावनिक राजकारण केलं जाणार हे नक्की," असं ते म्हणतात.
निवडणुकांसाठी भावनिक राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे, असं मतं ओंकार भागवत यांनीही व्यक्त केलं आहे. "नेमकं 2019 च्या निवडणुकांच्या आधी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा उद्देश काय?" असा प्रश्न विचारला आहे स्टनिंग आमीर या फेसबुक अकाऊंटवरून.
मयुर अग्निहोत्री लिहितात, "भूमिका कोणीही करा. नवाज त्याला न्याय देईलच. पण बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेशी छेडछाड करू नये ही अपेक्षा."
गौरव संकलेचा विचारतात, "नवाजुद्दीन बाळासाहेबांसारखा दिसेल पण त्यांच्यासारखा आवाज कुठून आणणार?"
"याच शिवसेनेच्या लोकांनी नवाजुद्दीनला मुस्लीम आहे म्हणून रामलीलेत काम करायला नकार दिला होता ना? त्यामुळे मला हे ऐकून आश्चर्य वाटलं," अशी प्रतिक्रिया दिली आहे गजानन पाचणकर यांनी.
सागर घाटगे यांना काही ही निवड पटलेली नाही. ते म्हणतात, "मराठी नटांना संधी मिळायला हवी होती. आक्षेप कलाकाराच्या जातीधर्माबद्दल नाहीये. किमान बाळासाहेबांची भूमिका मराठी माणसाला देणं अपेक्षित होतं." असंच मत व्यक्त केलं आहे महेश सरफरे यांनी.
अर्चना पाटील यांनी ट्वीट केलं आहे की, "नवाजुद्दीननं बाळासाहेबांची भूमिका करणं हा म्हणजे नियतीचा सूड आहे."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)