प्रेस रिव्ह्यू : 10 नंबरची जर्सी फक्त आणि फक्त सचिनसाठीच

सचिन तेंडुलकरची दहा नंबरची जर्सी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सांमन्यांमध्ये कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला वापरू देणार नाही, असा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतला आहे.

द इंडियन एक्सप्रेसनं एका वृत्तात म्हटलं आहे की दहा क्रमांकाची जर्सी ही सचिन तेंडुलकरची ओळख होती. त्याच्या करिअरमधील सर्व एकदिवसीय सामने आणि एकमेव टी-20मध्ये त्यानं ही जर्सी वापरली होती.

ती त्याचीच ओळख रहावी, यासाठी BCCI ने अधिकृतपणे नव्हे, पण हा क्रमांक यापुढे कोणालाही न देण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

ऑगस्टमध्ये शार्दूल ठाकूर या मुंबईच्या बॉलरने 10 नंबरची ही जर्सी घालून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण नंतर फॅन्सकडून खूप ट्रोलिंग झाल्यावर BCCI ने हा निर्णय घेतला आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

पद्मावतीवरून सुप्रीम कोर्टाची नेत्यांना फटकार

सरकारमध्ये मोठ्या पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून 'पद्मावती' चित्रपटाबाबत होणाऱ्या टिप्पणींबाबत सुप्रीम कोर्टानं मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर स्थगितीसाठी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं मंगळवारीही फेटाळून लावली.

परदेशात या चित्रपट प्रदर्शनावर बंदीच्या मागणीची याचिकाही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या न्यायपीठानं फेटाळली.

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं सरकारमध्ये मोठ्या पदांवर असलेल्या नेत्यांना या वादात पडल्यामुळं फटकारलं आहे. CBFCचं प्रमाणपत्र मिळण्याआधीच अनेक मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी विविध वक्तव्यं केली आहेत. चित्रपटाचे मंजुरी प्रमाणपत्र प्रलंबित असताना सार्वजनिक पदांवरील लोकांची अशी वक्तव्यं अशोभनीय आहेत.

सेन्सॉर बोर्डानं चित्रपट मंजूर करावा की नाही, हे ते कसे काय सांगू शकतात? हे चित्रपटाबाबत पूर्वग्रह राखल्यासारखं आहे. यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर परिणाम होईल, असंही कोर्टानं म्हटलं आहे.

नेट न्युट्रॅलिटीवर ट्राय मैदानात

इंटरनेट सेवेत कोणताही भेदभाव नसावा, असं म्हणत टेलिकॉम रेग्युलॅटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या नेट न्युट्रॅलिटीला सबळ पाठिंबा दिला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विविध उपाययोजना करून इंटरनेट सेवा कोणत्याही प्रकारे खंडित व्हायला नको, असं मत TRAIनं व्यक्त केलं आहे.

सध्या सुरू असलेल्या सेवांसकट भविष्यातसुद्धा सेवा उत्तम सुरू रहाव्या, यासाठीदेखील काही उपाययोजना करण्याचं आवाहन ट्रायने केलं आहे.

इंटरनेटवरच्या काही संकेतस्थळांना अधिक तर काही संकेतस्थळांना कमी स्पीड देणं, अशा बाबी यापुढे चालणार नाहीत. इंटरनेटवरची सर्व संकेतस्थळं आणि अ‍ॅप्सना समान वेग पुरवला गेला पाहिजे, असे TRAIने या कंपन्यांना सुनावले आहे.

चहा विक्रेता ते पंतप्रधान

सध्या भारत दौऱ्यावर असलेली डोनाल्ड ट्रंप यांच्या कन्या इव्हांका ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, इव्हांका म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आयुष्यात केलेले प्रयत्न आणि एक सामान्य चहावाला ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे."

"माणसाने ठरवलं तर आमूलाग्र बदल घडू शकतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून समजतं," असं ट्रंप म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इव्हांका ट्रंप यांनी हैदराबादमधील ग्लोबल इकॉनॉमिक समीट (GES) 2017 चे उद्घाटन केलं.

"भारत हा अमेरिकाचा सच्चा दोस्त आहे," या डोनाल्ड ट्रंप यांचा वाक्याचा पुनरोच्चारही इव्हांका यांनी त्यांच्या भाषणात केला.

हिवाळी अधिवेशन केवळ दहा दिवस

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात 11 डिसेंबरपासून 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

लोकमतच्या वृत्तानुसार रविवारची सुटी वगळता केवळ दहा दिवसच या अधिवेशनाचं कामकाज चालणार असून, या कालावधीत 13 विधेयकं, 11 अध्यादेश आणि विधान परिषदेतील प्रलंबित विधेयकं मान्यतेसाठी सभागृहात मांडण्यात येणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली.

हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं मंगळवारी विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)