तेलंगणात उघड्यावर संडासला बसू नका, ड्रोन बघतोय!

फोटो स्रोत, Getty Images
हागणदारी मुक्तीची मोहीम यशस्वी करण्यासाठी सरकार विविध कल्पना लढवत असतं. कधी जनजागृती तर कधी उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर कारवाईसाठी चक्क मॉर्निंग स्कॉड नेमण्यात आले आहेत. आता तेलंगणाने या मोहिमेत तंत्रज्ञानाची भर घातली आहे.
तेलंगणामधील करीमनगर जिल्ह्यात उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर केला जात आहे. इथल्या एका धरणाच्या परिसरात हे ड्रोन उडवलं जात आहे.
ऑक्टोबरमध्ये सर्वप्रथम स्थानिक पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरू केला तो सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर आणि महिलांची छेड काढणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी. त्या मोहिमेअंतर्गत 260 मद्यपींवर गुन्हे नोंदवण्यात आले.
उघड्यावर संडास करणाऱ्या कुणावरही अजूनतरी गुन्हा दाखल झालेला नाही.

या भागातल्या मानैर धरणातून करीमनगर, वारंगल, सिद्दिपेट, सिरसिल्ला या जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या परिसरातील दोन बागा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "स्मार्ट सिटी" योजनेत करीमनगरचाही समावेश आहे. अंदाजे अडीच लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात 2017च्या अखेरीस 40,000 शौचालये बांधण्याचं ठरलं होतं. यापैकी जवळपास 39,000 शौचालयं बांधून तयार आहेत.
इथले नागरिक आणि लेक वॉकर्स असोसिएशनचे सदस्य नागराज सांगतात, "या मोहिमेत आम्ही प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करत आहोत. उघड्यावर संडास करणाऱ्यांचा सत्कार करणं आणि त्यांचं समुपदेशन करणं, यामुळे लोकांच्या वर्तवणुकीत बदल होत आहे."
नागराज म्हणाले, ''आम्ही उघड्यावर शौचाला जाणाऱ्या लोकांचा सत्कार करतो. त्यांना हार घालतो आणि त्याच धरणातील पाणी आपण पितो, हेही समजावून सांगतो."
"हा प्रयोग कुणाचाही अपमान करण्यासाठी नाही. उघड्यावर शौचाला जाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो."
उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना दंड करण्याचा ठरावही करीमनगर महापालिकेत मंजूर करण्यात आला आहे.
करीमनगर महापालिकेचे आयुक्त के. शशांक यांचा दावा आहे की बहुतांश नागरिकांच्या घरात शौचालयं आहेत, तीसुद्धा पालिकेनेच बांधून दिलेली.
"शौचालयांची कमतरता हा मुद्दा नाही. प्रश्न मानसिकता बदलण्याचा आहे. जर त्यांची ही सवय मोडली नाही, तर मग दंड आकारण्याशिवाय पर्यायच राहणार नाही," असंही शशांक यांनी स्पष्ट केलं.
"आमच्या या प्रयत्नांना आता पोलीस त्यांच्या ड्रोन तंत्राची साथ देत आहेत."
उघड्यावर शौचाला बसणारं कोणी सापडलंच तर त्यांचं समुपदेशन केलं जातं. त्यासाठी धरण प्रशासनाचंही वेगळं पोलीस पथक आहे. सोबत जिल्हा प्रशासन आणि नागरिकही असतातच, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

अर्थातच, असं ड्रोनच्या मदतीनं उघड्यावर संडास करणाऱ्या लोकांना पकडणं, हे लोकांच्या खाजगीपणाच्या हक्कावर गदा असल्याचं मानवी हक्क कार्यकर्ते व्ही. सुधाकर यांचं म्हणणं आहे.
"लोक उघड्यावर शौचाला का बसतात, याची नेमकी कारणं अधिकाऱ्यांनी शोधून काढायला हवी. त्या त्या भागात सार्वजनिक शौचालयं उभारून मग समुपदेशन करायला हवं."
उघड्यावर संडास करणाऱ्यांचा जाहीर अपमान करण्याच्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत. म्हणून यावर देशभरात वाद सुरू आहे.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









