प्रेस रिव्ह्यू : कारमध्ये महिला बाळाला दूध पाजताना पोलिसांकडून टोईंग

एका कारमध्ये एक महिला आपल्या बाळाला दूध पाजत होती. अशा अवस्थेत तिच्या कारचं मुंबई ट्राफिक पोलिसांनी टोईंग केलं.

या महिलेचा पती काही खरेदी करण्यासाठी कार खाली उतरला. ही कार त्यानं नो पार्किंग भागात पार्क केली. ज्यावेळी पोलिसांची टोईंग व्हॅन आली. त्यावेळी ही महिला तिच्या सात महिन्याच्या बाळाला दूध पाजत होती.

आधी पोलिसांनी कारला जॅमर लावलं आणि नंतर ती कार उचलली. असं वृत्त एबीपी माझा डॉट कॉमवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

पोलीस कारवाई करत असतानाचा व्हीडिओ एका तरुणानं शूट केला आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान संबंधित पोलीस काँस्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे.

पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग - फारूख अब्दुल्ला

पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचं वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केलं आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या काश्मीरला स्वायत्तता देण्याची मागणी त्यांनी केली आहे असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

"एका बाजूला चीन, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि तिसऱ्या बाजूला भारत अशी आमची स्थिती आहे. या तिन्ही देशांकडं अण्वस्त्रं आहेत. त्यामुळं आहे ती परिस्थिती स्वीकारून काश्मीरच्या जनतेला त्यांचा भूभाग चालवण्याची परवानगी देण्यात यावी" असं ते म्हणाले.

अंतर्गत स्वायत्तता दिली तरचं काश्मीरमध्ये शांतता नांदेल असं ते पुढं म्हणाले. "भारताच्या लोकांनी आमचा विश्वासघात केला आहे," असं वक्तव्य सुद्धा फारूख अब्दुल्ला यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना केलं.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास काही आठवड्यात पूर्ण होईल - गृहमंत्री

"ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास काही आठवड्यात पूर्ण होईल," असं कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी म्हटलं आहे.

या हत्येच्या तपासासाठी कर्नाटक सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचं काम लवकरचं पूर्ण होईल असं त्यांनी म्हटल्याचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे. या प्रकरणात एसआयटीनं दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

त्यांच्याविरोधात पुरावे गोळा केले जात आहे असं रेड्डी यांनी बेंगलुरू प्रेस क्लबमध्ये पत्रकारांना सांगितलं.

या प्रकरणाचा संबंध नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि एमएम कलबुर्गी यांच्याशी आहे की नाही याचा देखील एसआयटी तपास करत असल्याचं ते म्हणाले.

रेल्वेत खाद्यपदार्थांच्या छुप्या दरवाढी विरोधात तक्रारी

रेल्वे प्रवासादरम्यान तसंच प्लॅटफॉर्मवरील फुडमॉलमध्ये कमाल किरकोळ विक्री किमतीपेक्षा जास्त दर (MRP) आकारला जात आहे. अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं लक्षात आल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

गेल्या सहा महिन्यांत विविध प्रकारच्या 1,137 तक्रारी आयआरसीटीसीकडे आल्या असून गेल्या वेळच्या तुलनेत त्यात चौपटीने वाढ झाली आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2017 पर्यंत अशा प्रकारच्या केवळ 573 तक्रारी आल्या होत्या.

आयआरसीटीसीकडे एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2017 पर्यंत विविध प्रकारच्या 2,150 तक्रारी आल्या.

यामध्ये सर्वाधिक तक्रारी खाद्यपदार्थासाठी ठरलेल्या रकमेऐवजी जादा दर आकारल्यासंबंधी आहेत. त्याविरोधात 1,085 तक्रारी करण्यात आल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. काही तक्रारी दर्जा, प्रमाण आणि स्वच्छतेबाबतही आहेत.

खरेदी केंद्रे बंद असल्यामुळे राज्यावर केंद्राची तीव्र नाराजी

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी खरेदी केंद्रावर सोयाबीन, उडीद आणि मूगाची खरेदी का होत नाही? असा प्रश्न कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला विचारला आहे.

हमी भाव देऊनही खरेदी का होत नाही हे पाहण्यासाठी त्यांनी शनिवारी बैठक घेतली. त्यामध्ये सोयाबीन, उडीद आणि मूग यांची फक्त 72 क्विंटलच खरेदी झाल्याची माहिती त्यांना मिळाली.

याबाबत त्यांनी राज्य सरकारला जाब विचारला आहे. राज्य सरकारनं मात्र या बैठकीविषयी मौन बाळगलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)