You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रेस रिव्ह्यू : कुलभूषण जाधव यांना पत्नीला भेटण्याची परवानगी
हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानात अटकेत असलेले कुलभूषण जाधव यांना त्यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून हा निर्णय घेतल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.
'लोकसत्ता'नं दिलेल्या बातमीतनुसार, कुलभूषण जाधव यांची भेट घेता यावी, यासाठी त्यांच्या आई आणि पत्नीनं पाकिस्तानकडे अर्ज केला होता.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अजिज यांना २७ एप्रिलला पत्र पाठवून जाधव कुटुंबीयांना व्हिसा मंजूर करण्याची विनंती केली होती. मात्र त्याकडे पाकिस्ताननं दुर्लक्ष केलं होतं.
शुक्रवारी पाकिस्ताननं नरमाईची भूमिका घेतली. पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांची भेट घेण्याची परवानगी दिली आहे. आता कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला पाकिस्तानला जाता येणार आहे.
'मार देणारे कार्यकर्ते हवेत!'
"राजकीय पराभव येत राहतो, जात राहतो. या पराभवानं खचायचं नसतं. पराभवानं खचणारे अन् सतत रडणारे कार्यकर्ते मला नको आहेत. आता मला मार खाणारे नव्हे, तर मार देणारे कार्यकर्ते हवेत," असं सांगत अरेला कारे उत्तर दिलंच पाहिजे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
'महाराष्ट्र टाइम्स'च्या बातमीनुसार, महापालिकेतील पराभवानंतर तब्बल आठ महिन्यांनी नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बंद दरवाजाआड शुक्रवारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
संघटनेत आलेली मरगळ दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गंगापूर रोडवरील चोपडा बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
तुम्ही प्रत्येक जण राज ठाकरेच आहात, असं समजून जबाबदारी पार पाडा, असं त्यांनी स्पष्ट केलं. पक्ष स्थापनेवेळी माझ्यामागे कोणीही नव्हतं. तुमच्या पाठबळावरच पक्ष उभा केला. "अगोदरचे दोर कापून टाकावे लागतात तेव्हा कुठे गड सर करता येतो," असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हंटलं आहे.
सम-विषमवरून हरित लवादाचा इशारा
दिल्लीत सोमवारपासून सम-विषम योजना लागू करण्याचा निर्णय कशाच्या आधारे घेण्यात आला? असा सवाल करत या योजनेचे फायदे सांगा, अन्यथा ही योजना रद्द करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय हरित लवादानं दिल्ली सरकारला दिला आहे.
हरित लवाद शनिवारी याबाबत निकाल देणार असल्याचं 'टाइम्स ऑफ इंडिया'नं म्हटलं आहे. दरम्यान, सम-विषम योजनेची यशस्वी अंमलबजावणी व्हावी म्हणून दिल्ली सरकारनं सर्व नागरिकांसाठी पाचही दिवस मोफत बसप्रवासाची घोषणा केली आहे.
या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे आकर्षित होतील, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हंटलं आहे.
जीएसटीत मोठा बदल
च्युइंगमपासून चॉकलेट, सौंदर्य उत्पादनं, केसांचे टोप आणि मनगटी घड्याळं, फर्निचर, दुचाकी, तीनचाकी तसंच ट्रॅक्टरचे टायर्स अशा वस्तूंसह १७८ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
त्यामुळे या वस्तू आता स्वस्त होणार आहेत. केवळ ५० वस्तूंवरच आता २८ टक्के जीएसटी ठेवला असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं.
आतापर्यंत जीएसटीमध्ये केलेला हा सर्वांत मोठा बदल आहे. 'लोकमत'नं हे वृत्तं दिलं आहे. एसी आणि नॉन-एसी अशा सर्व रेस्टॉरंटवर आता ५ टक्के कर लावण्यात आला आहे.
सध्या नॉन-एसी रेस्टॉरंटच्या बिलावर १२ टक्के, तर एसी रेस्टॉरंटच्या बिलावर १८ टक्के कर होता.
मात्र, पंचतारांकित हॉटेलांमधील रेस्टॉरंटच्या दरात ही कपात नसेल. आजच्या निर्णयानंतर २८ टक्के जीएसटी करकक्षेत आता फक्त ५0 वस्तू आणि सेवा राहिल्या आहेत. आधी ही संख्या २२८ होती.
चैनीच्या वस्तू, सिगारेट आणि पानमसालासारख्या वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागणार आहे.
प्रवेश परीक्षा एकाच छत्राखाली
केंद्र सरकारनं राष्ट्रीय परीक्षा संस्थेची (एनटीए) स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षांबाबात सरकारनं हा निर्णय घेतला आहे. देशात दरवर्षी ४० लाख विद्यार्थी अशा परिक्षांना बसतात.
'हिंदुस्तान टाइम्स'च्या बातमीनुसार, उच्च शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश परीक्षांसाठी १८६० च्या भारतीय संस्था नोंदणी कायद्यांतर्गत, स्वायत्त अशा राष्ट्रीय परीक्षा संस्था या शीर्षस्थ परीक्षा संघटनेच्या स्थापनेला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)