You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये नेमके का गेले होते?
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाण नावाच्या सैनिकाला दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांचं 2 वर्षांचं पेन्शनही कापण्यात आलं आहे.
चंदू चव्हाण हे राष्ट्रीय रायफल्सच्या 37व्या तुकडीचे जवान. वय वर्षं 23. एरव्ही एक सर्वसाधारण भारतीय सैनिक. पण त्यांचं मागच्या 13 महिन्यांचं आयुष्य एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला लाजवेल असं आहे.
या 400 दिवसांत जम्मू-काश्मीरमधली पोस्टिंग, नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये जाणं, पाकिस्तानमध्ये झालेला छळ आणि भारताच्या शिष्टाईनंतर पाकिस्तानने जानेवारीत त्याची केलेली सुटका असे सगळे अनुभव चंदू चव्हाण यांनी घेतले आहेत.
सर्जिकल स्ट्राईक
चंदू चव्हाण यांचे मोठा भाऊ भूषण चव्हाणही सैन्यातच. गेल्या वर्षी 'सर्जिकल स्ट्राईक'ची देशभर चर्चा सुरू असतानाच गुजरातमध्ये भूषण यांना सैन्यातून फोन आला.
धाकटा भाऊ चंदू गेले दोन दिवस बेपत्ता असल्याचं त्यांना समजलं. आणि पुढच्या काही तासांत एका भारतीय जवानाला पाकिस्तानी लष्करानं ताब्यात घेतल्याची बातमी पाकमधील इंटरनेट साईटनं दिली.
पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्र संघातील प्रतिनिधी डॉ. मलिहा लोढी यांनी या बातमीला दुजोरा दिला. भारतीय सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडताना पाकिस्तानच्या ताब्यात आल्याचा दावा त्यांनी केला. पुढील दोन दिवसांनी भारतीय सैन्याकडूनही चंदू यांच्या कुटुंबीयांना ही बातमी कळवण्यात आली.
चंदू चव्हाण यांचं जन्मगाव धुळ्याजवळ बोरविहीर. चंदूंच्या अटकेनं 12 हजार लोकवस्तीच्या या गावात शोककळा पसरली. त्यांचे आई-वडील लहानपणीच वारले होते. त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ आजी-आजोबांनी केला.
आजीला आपला नातू पाकिस्तानमध्ये पकडला गेल्याचं कळताच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं.
LOC का ओलांडली?
सर्जिकल स्ट्राईकच्या एकाच दिवसानंतर चंदू बेपत्ता झाले होते. त्यामुळे सुरुवातीला नेमकं काय झालं याबद्दल नेमकी माहिती नव्हती.
डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत एका भारतीय सैनिकाने जाणून बुजून नियंत्रण रेषा ओलांडल्याचं म्हटलं होतं. मीडियात उलटसुलट बातम्या सुरू होत्या.
काहींच्या मते चंदू सीमेवर तैनात असताना वाट चुकले. तर काहींच्या मते सीमेवर पाकिस्तानी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीनंतर चंदूंना ताब्यात घेण्यात आलं.
पाकिस्तानमधल्या आणखी एका वृत्तपत्राने चंदू चेकपोस्ट सोडून पळाले होते आणि एकटेच नियंत्रण रेषा ओलांडून आले अशी बातमी दिली होती.
सुटकेचे प्रयत्न
काहीही झालं तरी कुटुंबीयांसाठी चंदू पाकिस्तानच्या ताब्यात होते ही थरकाप उडवणारी गोष्ट होती.
ते जिवंत होते हे दिलासादायक असलं तरी तिथून सुटका कठीण होती. आजोबा नाना पाटील आणि भाऊ भूषण चव्हाण यांनी प्रयत्न सुरू केले.
धुळ्याचे स्थानिक खासदार आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना त्यांनी साकडं घातलं. आणि त्यांनीही हे प्रकरण उचलून धरलं.
चंदू चुकून पाकिस्तानात गेले ही गोष्ट भारताकडून वारंवार पाकिस्तानला सांगितली गेली.
दोन्ही देशांच्या DGMO (डिरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) पातळीवर 15 ते 20 वेळा या प्रकरणी बोलणी झाली.
अखेर भारताच्या शिष्टाईला यश येऊन दोन्ही देशातील संबंध सुधारण्याची भूमिका घेत पाकिस्तानने चंदूंची सुटका करण्याचं जाहीर केलं.
जानेवारी 2017 मध्ये चंदू अटारी-वाघा सीमेवरून भारतात आले.
पाकिस्तानमधले ते 4 महिने...
चंदू चव्हाण 4 महिने पाकिस्तानच्या तुरुंगात होते. ते परत आल्यावर धुळ्यातल्या त्यांच्या मूळ गावी एकच जल्लोष झाला. ते पाकिस्तानातून सुखरूप परतल्याचा आनंद सगळ्यांनाच झाला होता.
तुरुंगवासात नेमकं काय घडलं याविषयी सगळ्यांना कुतुहल होतं. त्यानंतर सैन्यातून दहा दिवसांची सुटी घेऊन ते गावी परतले.
चंदू कुठल्या मोहिमेवर आले होते का याची माहिती घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानमधील अधिकारी करत होते.
चंदू जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांच्या हाताचं बोट मोडलेलं होतं आणि त्यांना आधार घेतल्याशिवाय चालता येत नव्हतं. 'माझा जीव घ्या,' असं आपण तिथल्या अधिकाऱ्यांना सांगत होतो असं भारतात परतल्यावर चंदू यांनी सांगितलं.
सुटी संपल्यावर आता वेळ होती भारतीय सैन्य दलाकडून होणाऱ्या चौकशीची. कारण पाकिस्तानमध्ये काय घडलं याचा अहवाल त्यांना भारतीय लष्कराला द्यायचा होता.
चंदू चव्हाण यांना सैन्यदलाकडून चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं.
का झाली शिक्षेची कारवाई?
'29 सप्टेंबरच्या संध्याकाळी आपलं सैन्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी भांडण झालं आणि त्या रागात आपण चौकी सोडून गेलो. तिथे आपण भरकटलो आणि पाकिस्तानी लष्करानं पकडल्यानंतर नियंत्रण रेषा ओलांडल्याचं आपल्याला कळलं,' असं चंदू यांनी सांगितलं.
पण ड्युटीवर असताना चौकी सोडून जाणं हा गुन्हा होता. त्यामुळे चौकशी क्रमप्राप्त होती. गेले आठ महिने ही चौकशी सुरू होती.
लष्करी न्यायालयासमोर चंदू यांनी चौकी सोडल्याचा गुन्हा कबूल केला. म्हणून त्यांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पुढे काय?
"चंदू पाकिस्तानातून परत आला, यातच आम्हाला सर्व काही मिळालं," अशी प्रतिक्रिया चंदूंचे भाऊ भूषण चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
"मी सुद्धा सैन्यात आहे म्हणून सैन्याविरोधात वरच्या कोर्टात अपील करणार नाही," असं भूषण चव्हाण म्हणाले.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)