गुलजार आणि पंडित रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार

फोटो स्रोत, Getty Images ANI
सुप्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराच्या निवड समितीने 17 फेब्रुवारी (शनिवार)ला ही घोषणा केली. उर्दू साहित्यातील कार्याबाबत गुलजार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून यासोबतच संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराला साहित्य क्षेत्रातील अतिशय मानाचं स्थान आहे. गुलजार यांनी हिंदी चित्रपटांमध्ये केलेलं लेखन आणि त्यांच्या उर्दू कवितांची चर्चा होत असते.
याआधी गुलजार यांना 2002 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 ला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2004ला पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. यासोबतच त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा करताना समितीने सांगितलं की, "संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि सुप्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार या दोन भाषांमधील नामवंत लेखकांना (2023 साठी)चा ज्ञानपीठ पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते, शिक्षक आणि 100 हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत.
गुलजार यांचा अविस्मरणीय प्रवास
गुलजार यांनी शायरी केली, कविता केल्या, कथानकं लिहिली. गुलजार आपली संपूर्ण प्रतिभा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात वापरू शकतात.
या सगळ्यांत तुम्ही त्यांना एखाद्या विषयावर बोलायला सांगितलं तर ते तयारी न करता अगदी तासनतास त्या विषयावर बोलू शकतात. आणि त्यांचं बोलणं ऐकताना थिएटर हॉलमध्ये हजारो श्रोते असतील तरी कुठेही चूळबूळ होत नाही. हिंदी आणि उर्दूत घोटलेले त्यांचे शब्द, त्यांची भाषा आणि त्यांचे संदर्भ ऐकून अधूनमधून टाळ्यांचा गजर होतो.
डोळ्यांसमोर त्यांनी शेकडो लोकांना मरताना पाहिलं होतं. लाखो लोक एका रात्रीत उद्ध्वस्त झाले होते. लहान वयात मिळालेल्या जखमा आयुष्यभर भरून येत नाहीत. गुलजार यांच्या मनात आजही या आठवणी ताज्या आहेत.

फोटो स्रोत, RANGNATH SINGH
म्हणूनच गुलजार लिहितात, डोळ्यांना व्हिसाची गरज नसते, स्वप्नांना सीमा नसतात, मी बंद डोळ्यांनी रोज सीमेपार जातो. त्यांनी जेव्हा माचिस चित्रपट बनवला तेव्हा त्यांच्या वेदना काहीशा अशा पद्धतीने बाहेर आल्या...
छोड़ आए हम वो गलियां, छोड़ आए हम वो गलियां...
जहां तेरे पैरों के कंवल गिरा करते थे...
हंसे तो दो गालों में भंवर पड़ा करते थे...
तेरी कमर के बल पे नदी मुड़ा करती थी...
हंसी तेरी सुन-सुनके फ़सल पका करती थी...
गुलजार यांचा हा प्रवास सुरू झाला 1947 च्या फाळणीनंतर. देश विभागल्यानंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं.
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचे वडील छोटे-मोठे व्यवसाय करू लागले. फाळणीच्या काळात झालेला हिंसाचार गुलजार वर्षानुवर्षे विसरू शकले नाहीत. त्यावेळी ते अकरा-बारा वर्षांचे होते.
चित्रपट जगताकडे कल
त्या काळात गुलजार चित्रपट गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होते. डाव्या विचारसरणीमुळे गुलजार शैलेंद्रसारख्या गीतकारांच्या संपर्कात आले. पुढे ते बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. पण त्यांना लेखन सुरू करता आलं नाही.
शैलेंद्र यांनीच त्यांना सर्वप्रथम बिमल रॉय यांच्या चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची प्रेरणा दिली. त्यांनीच बिमल रॉय यांचे सहकारी देबू सेन यांना गुलजार यांचं नाव सुचवलं. अशा प्रकारे 1963 मध्ये बंदिनी चित्रपटातील 'मोरा गोरा अंग लइ ले, मोहे श्याम रंग दे दई...' हे गाणं गुलजार यांनी लिहिलं.
बिमल रॉय यांच्या निधनानंतर गुलजार हृषिकेश मुखर्जी यांचे सहाय्यक बनले. हृषीकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांचे स्क्रीन प्ले आणि गाणी यामुळे गुलजार यांना कमालीचं यश मिळवून दिलं. त्यात आशीर्वाद, आनंद आणि गुड्डी या सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे.

गुलजार यांना आनंदसाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, पण ते इतके घाबरले होते की ते स्वीकारण्यासाठी ते स्टेजवर गेले नाहीत.
मात्र नंतर हा पुरस्कार घेण्यासाठी त्यांना तब्बल 19 वेळा स्टेजवर चढावं लागलं. पहिल्या पुरस्कारानंतर त्यांना पुरस्कार घेण्याची सवयच लागली होती, कारण त्यांचं कामच त्या तोडीचं होतं.
यशस्वी प्रयोगांचा कालावधी
हृषिकेश मुखर्जी यांच्या सोबत सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर गुलजार दिग्दर्शक म्हणूनही बऱ्यापैकी यशस्वी झाले. त्यांच्या चित्रपटांमध्ये मेरे अपने, परिचय, कोशिश, अचानक, माचीस आणि आंधी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
माचीसनंतर गुलजार यांनी चित्रपट दिग्दर्शनाला अलविदा ठोकला. आणि गाणी लिहायला सुरुवात केली. त्यामुळे काही वर्षांतच त्यांना स्लमडॉग मिलेनियरसाठी ऑस्कर मिळाला.
'बिडी जलइले' पासून 'दिल तो बच्चा है जी' पर्यंत गुलजार यांनी नवनवे प्रयोग केले आणि विशेष म्हणजे ते त्यात यशस्वी देखील झाले.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र या संपूर्ण प्रवासात गुलजार यांनी इतरांची नक्कल केल्याचा आरोपही करण्यात आला. मग ते 'इबने बतूता, पहनके जुता' किंवा 'ससुराल गेंदा फूल' अशी गाणी असतील.
गुलजार यांनी गालिबचे शेर इतके वापरले आहेत की गालिबच्या नावाने पेन्शन मिळत असल्याचे ते स्वतः सांगतात. जी पेन्शन गालिबला कधी मिळूच शकली नाही.
गुलजार लिहितात, गालिबचं कर्ज घेणं, ते कर्ज वेळेत फेडता आलं नाही म्हणून त्यासाठी सबबी शोधणं, या गोष्टी मला भावनिकरित्या गालिबच्या जवळ घेऊन जातात. पण ते नक्कल करण्यात सुद्धा यशस्वी झाल्याचं त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलंय.
पण गुलजार या वेदनेपुरते मर्यादित राहिले नाहीत. ते म्हणतात, "वेळेबरोबर मला जाणवलं की कमी बोलण्यात जास्त अर्थ दडलाय. जास्त बोलल्याने वाक्याचा अर्थ संपतो."
म्हणून हेच गुलजार जेव्हा चेष्टेच्या मूडमध्ये येतात तेव्हा लिहितात, 'गोली मार भेजे में, भेजा साला शोर करता है...'
हेच गुलजार एक प्रेमकविता लिहितात... टतुम्हारे ग़म की डली उठा कर.. ज़ुबां पर रख ली है देखो मैं ने... वह क़तरा क़तरा पिघल रही है... मैं क़तरा क़तरा ही जी रहा हूं...'
गुलजार यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याची आवड होती. गुलजार यांच्या वडिलांना वाटायचं की कविता आणि गोष्टी लिहून आपलं पोट भरत नसतं. त्यामुळेच ते आपल्या नातेवाईकांना सांगायचे की, हा आपल्या भावांकडून कर्ज घेईल, गुरुद्वाराच्या लंगरमध्ये जाऊन आपली भूक भागवेल.
1950 मध्ये गुलजार आपल्या भावाला कामात मदत करण्यासाठी मुंबईत आले. आपण एक दिवस सिनेसृष्टीत काम करू असं त्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. सुरुवातीला त्यांनी मोटार गॅरेजमध्ये काम केलं पण हळूहळू त्यांचा चित्रपट जगताकडे कल वाढला.
...म्हणून राखी आणि गुलजार वेगळे झाले
गुलजार यांच्या आयुष्याकडे पाहताना हे लक्षात येतं की, ते काळानुसार स्वतःला बदलत राहिले.
त्यांचं लक्ष कधीही विचलित झालेलं पाहायला मिळालं नाही, अगदी त्यांच्या वैयक्तित आयुष्यात वादळं आलेली असतानाही.
पन्नास वर्षांपूर्वी 18 एप्रिल 1973 साली गुलजार आणि राखी यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या लग्नाला सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.
गुलजार यांची मुलगी आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी आपल्या वडिलांचं चरित्र लिहिलं आहे... ‘बिकॉज ही इज...’
लग्नामध्ये सुनील दत्त राखी यांचे भाऊ बनले होते आणि एसडी बर्मन तसंच जीपी सिप्पी यांच्या कुटुंबियांच्या देखरेखीखाली हे लग्न कसं संपन्न झालं होतं, याबद्दल मेघना यांनी या पुस्तकात लिहिलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER@NFAIOFFICIAL
मेघना यांनी राखी आणि गुलजार या दोघांची 1968 साली पहिल्यांदा झालेली भेट ते त्यांच्या विभक्त होण्यापर्यंतचा प्रवास लिहिला आहे.
विशेष म्हणजे पाच वर्षांच्या कोर्टशिपनंतर झालेलं हे लग्न मात्र एकच वर्षं टिकलं. 1974 साली राखी आणि गुलजार विभक्त झाले. पण वेगळं झाल्यानंतरही 49 वर्षं त्यांनी अशाप्रकारे एकमेकांची साथ दिली की, ते विभक्त झाले आहेत असं वाटलंच नाही.
वेगाची आवड
याशिवाय ते नेहमी उर्दूमध्येच लिहितात. त्यांची गाणी आणि स्क्रिप्ट्स बऱ्याचदा उर्दूमध्ये लिहिलेल्या असतात त्यामुळे त्यांच्या गाण्यांची नक्कल करणं शक्य होत नाही.
गुलजार यांच्या व्यक्तिमत्त्वात आणखी एक खास गोष्ट आहे. शांत दिसणाऱ्या गुलजार यांना गाडी वेगात चालवण्याची सवय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ते लाँग ड्राईव्हला जातात.
पण आपल्या सगळ्यांना गुलजार आवडतात त्यांच्या गाण्यांसाठी, चित्रपटांसाठी, त्यांच्या शायरीसाठी, कवितांसाठी, कथांसाठी. चित्रपटात दिलेल्या योगदानामुळे त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.











