बेंगळुरूत 7 कोटींच्या फिल्मी स्टाईल दरोडा प्रकरणी कारवाई, पोलिसांनी अशी केली तिघांना अटक

    • Author, इम्रान कुरेशी

रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे सांगत बँकेची रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन (कॅश व्हॅन) लुटल्याच्या प्रकरणाचा गुंता पोलिसांनी सोडवला आहे.

अखेर या 7 कोटींच्या दरोडा प्रकरणात तीन संशयितांना अटक केल्याचं बेंगळुरू पोलिसांनी सांगितलं. तसंच गुन्ह्याची उकल करत 5.76 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

उर्वरित रक्कम आणि आणखी पाच जणांना लवकरच ताब्यात घेतलं जाईल, असं बेंगळुरूचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

अटक केलेल्या तिघांपैकी गोपाल प्रसाद वाहनाचा सुरक्षा रक्षक होता. तर झेवियरनं आधी कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस (सीएमएस) मध्ये काम केलेलं होतं आणि अन्नप्पा नाईक बेंगळुरूच्या पश्चिम उपनगरातील एका पोलीस ठाण्यात तैनात होता.

पोलिसांनी हा गुंता सोडवण्यासाठी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि गोवा यासह दक्षिण भारतातील सर्व राज्यांमध्ये आपले 200 अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले होते.

आरोपींनी लुटीनंतर गाड्या बदलत, बनावट नंबर प्लेट वापरल्या. तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखरेख नसलेल्या किंवा अगदी कमी असेल अशा ठिकाणी रोख रकमेच्या पेट्या बदलण्याचं काम त्यांनी केलं.

बंगळुरू शहराच्या मध्यवर्ती भागातून दिवसाढवळ्या कॅश व्हॅन लुटणाऱ्या चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली होती.

आरोपींनी वाहनं बदलत आणि कॅश ट्रान्सफर करत पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

'कागदपत्रं व्हेरिफाय करायचं म्हणून कॅश व्हॅन थांबवली'

हा दरोडा बुधवारी (19 नोव्हेंबर) दुपारी पडला. 6 पुरुष एका एसयूव्हीमधून आले आणि त्यांनी रोख रक्कम घेऊन जाणारी कॅश व्हॅन रस्त्यातच थांबवली.

हे पैसे बँकेच्या शाखांमध्ये नेले जात होते, असं बंगळुरूचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग यांनी बीबीसीला सांगितलं. दरोड्याचा हा प्रकार वर्दळीच्या ठिकाणी घडला.

या व्हॅनमध्ये 1 चालक, 1 कॅश कस्टोडियन आणि 2 सशस्त्र सुरक्षा रक्षक होते.

दरोडेखोरांनी व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे सांगितले. इतक्या मोठ्या रकमेची वाहतूक करण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी करायची असल्याचे ते म्हणाले.

पोलीस म्हणाले की, दरोडेखोरांनी कॅश कस्टोडियन आणि सुरक्षा रक्षकांना त्यांची शस्त्रं व्हॅनमध्ये ठेवून एसयूव्हीमध्ये बसण्यास सांगितलं. तर चालकाला रोख रकमेसह गाडी चालवण्याची सूचना दिली.

दरोडेखोरांनी काही किलोमीटर एसयूव्ही कॅश व्हॅनच्या मागे चालवली. नंतर त्यांनी चालकाला व्हॅनमधून बाहेर काढलं. कॅश कस्टोडियन आणि सुरक्षा रक्षकाला एसयूव्हीमधून उतरवलं. बंदुकीचा धाक दाखवत कॅश ताब्यात घेतली आणि त्यांनी तेथून पलायन केलं.

त्या भागात सीसीटीव्ही कमी होते. दरोडेखोरांनी या दरोड्यात एकापेक्षा जास्त वाहनांचा वापर केला होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या कंपनीने पोलिसांत तक्रार नोंदवली होती.

'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया'चं स्टिकर आणि बनावट नंबर प्लेट

दरोड्यात वापरलेल्या एसयूव्हीवर बनावट नंबर प्लेट होती. त्यावर 'भारत सरकार' असं स्टिकर होतं, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिली.

रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा या दरोड्याशी काही संबंध आहे का, या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.

दरोड्यात वापरलेली एसयूव्ही पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना दिली.

परंतु, गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी संशयितांनी पळून जाण्यासाठी कोणतं वाहन वापरलं हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं सांगितलं.

"दरोडेखोरांनी गाडी बदलून पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले, हे तपासणीत नक्की झालंय," असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

पोलीस यापूर्वी झालेल्या मोठ्या बँकांच्या दरोड्यांप्रमाणे या प्रकरणाचाही छडा लवकरच लावतील, याबद्दल खात्री असल्याचा विश्वास गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मे महिन्यात, विजयपुरा जिल्हा बँकेतून लॉकरची बनावट चावी वापरून 532.6 कोटी रुपयांचे 59 किलो सोनं चोरीला गेलं होतं. पोलिसांनी त्यापैकी 39 किलो सोनं आणि काही रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच दोन माजी कर्मचाऱ्यांसह 15 जणांना अटक केली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)