सबरीमला मंदिरातील सोन्याच्या चोरीचे नेमके प्रकरण काय? कोर्टानं काय म्हटलं?

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
    • Author, अश्रफ पडन्ना
    • Role, तिरुवनंतपुरम

दक्षिण भारतातील प्रसिद्ध सबरीमला मंदिरातील सोन्याच्या चोरीमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. देशभरातून लाखो भाविक दरवर्षी इथं दर्शनाला येत असतात.

या मंदिरातील मूर्ती आणि पवित्र वस्तूंच्या चोरीमुळं न्यायालय, पोलीस आणि राजकारणाशी संबंधित नवा वाद निर्माण झाला आहे.

मंदिरातील काही मूर्तींचे सोन्याचे आवरण काढून घेतल्याचे पुरावे मिळाल्याचे केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

भारतातील बहुसंख्य मंदिरांमध्ये मूर्तींवर सोनं आणि चांदीचा मुलामा चढवणं सामान्य आहे, हे काम भक्तांच्या देणगीतून केलं जातं.

दरवर्षी लाखो भाविक भेट देणाऱ्या सबरीमला मंदिरातील सोनं चोरीमुळे भक्तांना धक्का बसला आहे. ही घटना प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

केरळ उच्च न्यायालयाने यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पोलिसांनी सोने गायब होण्याची चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणात माजी सहायक पुरोहीतसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणावर देखरेख करणाऱ्या दोन न्यायाधीशांचे पॅनेल सप्टेंबरपासून नियमित सुनावण्या घेत आहे.

डोंगरावर असलेलं भगवान अयप्पा यांचं हे मंदिर काही वर्षांपूर्वीही चर्चेत आलं होतं. या मंदिरात मासिक पाळी असणाऱ्या महिलांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने हा भेदभाव संपवण्याचा आदेश दिला होता, परंतु तीव्र आंदोलनं झाल्यानंतर न्यायालयाने आपल्या ऐतिहासिक निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचं ठरवलं आणि त्या आदेशास स्थगितीही दिली होती.

काय चोरीला गेलं?

सध्याचा वाद दोन 'द्वारपाल' मूर्तींभोवतीचा आहे. म्हणजेच मुख्य देवता बसलेल्या मंदिराच्या पवित्र गर्भगृहाच्या अगदी बाहेर उभ्या द्वाररक्षक मूर्ती.

न्यायालयाने नेमलेल्या सबरीमला विशेष आयुक्ताच्या अहवालात अनेक ठिकाणी मूर्तींचे सोन्याचे आवरण काढून टाकण्यात आल्याचे म्हटले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये न्यायालयाने हे प्रकरण हाती घेतले.

न्यायालयाच्या आदेशांमध्ये न्यायमूर्ती राजा विजयराघवन आणि के. व्ही. जयकुमार म्हणाले की, त्यांनी मंदिराच्या अधिकाऱ्यांकडून आलेल्या नोंदी, आधीचे आणि नंतरचे फोटो त्याचबरोबर एसआयटीने जमा केलेली इतर कागदपत्रे पाहिली आहेत.

त्यांनी या प्रकरणाला 'श्री अय्यप्पांच्या पवित्र वस्तूंच्या चोरीचे गंभीर प्रकरण' म्हटलं आहे.

न्यायमूर्ती म्हणाले की, "जेव्हा त्यांनी मंदिराच्या अधिकाऱ्यांना मूर्तींच्या दुरुस्तीच्या पूर्ण नोंदी आणि फाइल्स सादर करण्यास सांगितलं, तेव्हा ते प्रत्यक्षात खूप मोठ्या 'समस्येला हात' घालत आहेत, याची त्यांना जाणीव नव्हती."

मंदिराच्या नोंदींनुसार, 1998-99 मध्ये मूर्तींवर आणि मंदिराच्या काही भागांवर सोनं मढवण्यासाठी 30.291 किलो सोनं वापरलं गेलं. त्यावेळी हे सोनं आता भारताबाहेर पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्याने दिलं होतं.

मंदिराच्या या भागांमध्ये काही खांब, दरवाज्यांच्या कमानी आणि श्री अय्यप्पांच्या कथा दाखवणाऱ्या पॅनल्सचा समावेश होता.

न्यायालयानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2019 मध्ये मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने (टीडीबी) मुख्य संशयित माजी सहाय्यक पुरोहित उन्निकृष्णन पोट्टीला मूर्तींना नवीन सोनं लावण्यासाठी बाहेर काढण्याची परवानगी दिली होती.

दोन महिन्यांनी मूर्ती परत आल्या, तेव्हा त्यांचं वजन केलं गेलं नाही. पण न्यायालयानं म्हटलं की, नंतरच्या तपासणीत लक्षात आलं की, मूर्ती खूप हलक्या झाल्या आहेत.

एसआयटीनं पुढील तपास केला आणि पायथ्याचे आणि दरवाज्यांच्या चौकटीतीलही सोनं गायब झालं असल्याचं समोर आलं.

न्यायालयाच्या माहितीनुसार, 2019 पासून सुमारे 4.54 किलो सोनं गायब झालं आहे.

'सोन्याची चोरी आणि लूट'-न्यायमूर्ती

न्यायालयानुसार, सर्वात असामान्य बाब म्हणजे, सामान्यतः दुरुस्तीचे काम मंदिराच्या आतच केलं जातं. पण पुजारी पोट्टीला मूर्ती बाहेर काढण्याची परवानगी देण्यात आली.

तसेच, मंदिर समितीने 'मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे सोपवताना' सोन्याने मढवलेल्या वस्तूंची नोंद 'तांब्याच्या प्लेट्स' म्हणून केल्या.

न्यायमूर्तींनी मंदिर समितीवर ताशेरे ओढले. समितीने दुरुस्ती नंतर पुजारी पोट्टीला अंदाजे 474.9 ग्रॅम सोनं ठेवण्याची चुकीची परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले.

न्यायालयानुसार, पुजारी पोट्टीने मंदिर व्यवस्थापन समितीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये हे 'अतिरिक्त सोनं' एका मुलीच्या लग्नासाठी वापरण्याची परवानगी मागितली होती. ही मुलगी ओळखीची किंवा त्याची नातेवाईक होती.

ही गोष्ट खूप धक्कादायक आणि त्रासदायक आहे. तसेच अयोग्य वर्तन उजेडात आणणारी असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं.

संशयित आणि त्यांचा नकार

पोट्टीला अटक करण्यात आली आहे आणि न्यायाधीशांनी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. बीबीसीला त्याच्याशी संवाद साधता आला नाही.

अटक झाल्यानंतर कोर्टातून बाहेर जाताना, पोट्टीने पत्रकारांच्या दिशेने पाहत आपल्याला 'सापळ्यात अडकवलं जात आहे', असं ओरडून सांगितलं.

"सत्य समोर येईल. ज्यांनी मला या सापळ्यात अडकवलं, त्यांना कायद्याला सामोरं जावं लागेल. सर्व काही उघड होईल," असं तो ओरडून सांगत होता.

गेल्या काही दिवसांत पोलिसांनी मंदिर समितीच्या दोन अधिकाऱ्यांनाही अटक केली आहे.

मंदिर समितीचे अध्यक्ष पी. एस. प्रसांत, यांचीही चौकशी सुरू आहे. बीबीसीच्या कॉल आणि संदेशांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

तत्पूर्वी, त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की, 'सध्याच्या मंदिर समितीचा या प्रकरणाशी संबंध नाही', पण त्यांनी असंही म्हटलं की, ते 'चौकशीस पूर्ण सहकार्य करत आहेत' आणि 'सर्व दोषींना न्याय मिळेल अशी आशा करतो'.

एसआयटीला चौकशी पूर्ण करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

'या प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवून कायद्याच्या चौकटीत आणलं जाईल. व्यक्तीचे स्थान, प्रभाव किंवा स्थिती काहीही असली तरी त्यांची चौकशी करू,' असं न्यायालयानं म्हटलं.

राजकीय वाद आणि आंदोलनं

या घोटाळ्यामुळे राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी केरळच्या कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात निदर्शने केली आहेत.

"सुमारे 5 किलो सोनं चोरीला गेलं आहे," असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे व्ही.डी. सतीशन यांनी बीबीसीला सांगितलं.

देवाच्या मौल्यवान वस्तूंचे रक्षण करण्यात राज्याचे मंदिर व्यवहार मंत्री व्ही.एन. वासवन यांना अपयश आलं आहे, त्यामुळे त्यांना जबाबदार धरावं, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सतीशन आणि इतर विरोधी राजकारण्यांनी केली आहे.

वासवन यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले आणि विरोधकांची राजीनाम्याची मागणी फेटाळली. "आम्ही उच्चस्तरीय पोलीस पथकाद्वारे न्यायालयाच्या देखरेखीखाली चालणाऱ्या तपासाला पूर्ण सहकार्य करू," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

"लोकांना 1998 पासूनचे सर्व व्यवहार आणि सध्याची परिस्थिती माहिती व्हावी. आमच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही," असं त्यांनी म्हटलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.