पद्मदुर्ग : जंजिरा पडला नाही, पण शिवरायांनी सिद्दीला रोखण्यासाठी जंजिऱ्याच्या उरावर बांधला हा जलदुर्ग

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

स्वराज्याचे गड-किल्ले म्हटल्यावर अनेकांना आठवतील सह्याद्रीचे बुलंद कडे आणि दऱ्याखोऱ्यांमधला मावळ्यांचा पराक्रम. पण फक्त जमिनीवरच नाही, समुद्रावरही वर्चस्व गाजवण्याकडे महाराजांचं लक्ष होतं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच जलदुर्ग बांधले. ऐकायला हा आकडा लहान वाटेल पण दुसऱ्या कुणाही शासकानं एकट्यानं इतके जलदुर्ग बांधले नाहीत.

मुघलांपासून डचांपर्यंत नि पोर्तुगीजांपासून इंग्रजांपर्यत अनेक शत्रूंचा चहूबाजूंनी धोका असतानाही, शिवरायांनी समुद्रावरील आपलं वर्चस्व वाढवलं. या वर्चस्वाचं दृश्य रूप म्हणजे हे पाच जलदुर्ग – खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग आणि पद्मदुर्ग.

हे पाचही जलदुर्ग शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही डौलानं उभे आहेत. आजच्या शासन-प्रशासनाचं दुर्लक्ष, तसंच वादळवारा नि समुद्राच्या लाटांनी काही अंशी या जलदुर्गांची पडझड झालीय खरी, मात्र या जलदुर्गांचे उरले-सुरले अवशेषही शेकडो पिढ्यांना शिवरायांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची आठवण करून देत राहतील, असे आहेत.

यातल्या पद्मदुर्ग किल्ल्याबद्दल आपण या लेखातून अधिक जाणून घेणार आहोत.

राजपुरी खाडीच्या मुखापाशी जंजिऱ्याच्या वायव्येस सुमारे तीन किलोमीटरवर असेलेल्या कांसा बेटावर शिवरायांनी हा ‘पद्मदुर्ग’ किल्ला बांधला. आजच्या नकाशाप्रमाणे हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात मोडतो.

निजामशाहीच्या काळात सिद्दी घराण्यानं समुद्र किनारपट्टीवर सत्ता काबिज केली आणि या किनारपट्टीवर काही जलदुर्ग आणि भुईकोट किल्ले बांधले.

दांडा राजपुरी म्हणजे जंजिरा हा त्यांपैकीच एक. जंजिरा जिंकण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा प्रयत्न केला, पण जंजिरा जिंकणं त्यांना शक्य झालं नाही.

मात्र, सिद्दीच्या कुरापती तर वाढतच होत्या आणि त्या रोखणं मराठा साम्राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं बनलं होतं. त्यामुळेच सिद्दीच्या कुरापतींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्या रोखण्यासाठी जंजिऱ्याच्या उरावरच शिवरायांनी ‘पद्मदुर्ग’ बांधला.

‘पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजपुरी केली’ – असं पद्मदुर्गबद्दल बोललं जातं आणि तत्कालीन स्थिती पाहता हे खरंही आहे.

पद्मदुर्गाच्या नजरेतच सामराजगड आहे. सिद्दीच्या जमिनीवरील हालचालींना आळा घालण्यासाठी शिवरायांनी सामराजगड आणि समुद्री हालचालींवरील नियंत्रणासाठी पद्मदुर्गाची उभारणी केली.

‘पद्मदुर्ग’चा स्वतंत्र इतिहास कुणी लिहिला नसला, तरी शिवरायांच्या गडकिल्ले मोहिमांच्या इतिहासात पद्मदुर्गचा उल्लेख येतोच. हा पद्मदुर्ग किल्ला नेमका कसा आहे, हे आपण पाहू. त्यानंतर या किल्ल्याच्या इतिहासाकडे वळू.

कमळपाकळीच्या बुरुजांचा पद्मदुर्ग

पद्मदुर्ग किल्ल्याचे दोन भाग पडतात – मुख्य किल्ला आणि पडकोट.

पडकोटातील कमळपाकळीसारख्या बुरुजांच्या बांधकामामुळेच या किल्ल्याला ‘पद्मदुर्ग’ नाव दिलं गेलं असावं, असं दुर्ग अभ्यासक डॉ. सचिन जोशी त्यांच्या ‘रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव’ पुस्तकात म्हणतात.

मुख्य किल्ला पडकोटापेक्षा थोडा उंच आहे. मुख्य किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर दोन्हीकडे देवड्या आहेत. देवड्या म्हणजे बुरुजांवरील किंवा दरवाज्यांच्या दोन्ही बाजूस असलेली पहारेकऱ्याची जागा.

मुख्य किल्लाच पद्मदुर्गाचा बालेकिल्ला मानला जातो. कारण याच भागात किल्ल्यावरील सर्व महत्त्वाच्या वास्तू आहेत.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर स्वागतालाच तीन तोफा दिसतात. डावीकडील देवडीजवळून तटबंदीवर जाण्यासाठी दगडी जिना आहे. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडील भागात बांधकामाचे अनेक अवशेष आहेत.

मुख्य दरवाजाच्या समोरच तटबंदीजवळ पडकोटात जाणारा दरवाजा आहे. उजवीकडील भागात प्रथम एका घराचे अवशेष आहेत. हे एका खोलीचे बांधकाम असून, फक्त कोपरेच शिल्लक आहेत.

या बांधकामाचा मूळ पाया आणि त्यावरील हे बांधकाम यात फरक वाटतो. हाच प्रकार शेजारी असलेल्या चार खोल्यांच्या वाड्याच्या बाबतीत आढळतो.

याचं मुख्य कारण हे की, किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला. त्यावेळी काही बांधकामे झाली, पण नंतर बराच काळ किल्ला सिद्दीकडे होता. याच दरम्यान मूळ बांधकामाचा पाया न तोडता त्यावर नवीन बांधकाम केले गेले.

पद्मदुर्गवर मशीदही आहे. या मशिदीचं घुमट शिल्लक नाही. पण चार भिंती आणि दरवाजा शिल्लक आहे.

मशिदीच्या मागे तटाला लागूनच एका रांगेत आठ छोट्या खोल्या आहेत. किल्ला इंग्रजांकडे आला, त्यावेळी त्यांनी तुरुंगसदृश खोल्या बांधल्या असाव्यात, असं डॉ. सचिन जोशी म्हणतात.

या किल्ल्यावर कमळपाकळीसारखी दिसणारी बुरुजं, अगदी जवळ जाईपर्यंत न दिसणारं प्रवेशद्वार या वैशिष्ट्यांसोबतच आणखी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे किल्ल्याच्या बांधकाम साहित्यात वापरलेला चुना.

दोन घडीव दगड एकमेकांवर ठेवताना खालच्या आणि बाजूच्या दरवाजांमध्ये वापरलेलं हे सिमेंटिंग मटेरियल इतकं भक्कम आहे की, सुमारे 1670 च्या आसपास म्हणजे साडेतीनशेहून अधिक वर्षापूर्वी काळ्या दगडात बांधलेल्या या किल्ल्याचे दगड समुद्री लाटा आणि उन्ह-वारा-पावसाने झिजले, मात्र चुना तसाच राहिलाय. परिणामी चुन्याच्या पट्ट्या वर आलेल्या दिसतात.

तसंच, किल्ल्यावर पावसाळी पाण्याच्या साठवणीसाठी तीन हौद आहेत. आता हौदातलं पाणी पिण्यायोग्य नाही. मात्र, शिवकालीन बांधकामाचं वैशिष्ट्य दाखवणाऱ्या बऱ्याच गोष्टी पद्मदुर्गावर दिसून येतात.

किल्ल्याच्या तटबंदीवरून मुरुडचा किनारा, जंजिरा किल्ला आणि सामराजगड किल्ला दिसतो.

आता आपण पद्मदुर्ग किल्ल्याच्या इतिहासाकडे वळूया. आधी नमूद केल्याप्रमाणे, या किल्ल्याबाबत फारसं स्वतंत्रपणे कुणी लिहून ठेवलं नसलं, तरी शिवारायांच्या गडकोटांबाबत लिहिताना, पद्मदुर्गला टाळून कुणालाच पुढे जाता येत नाही. या किल्ल्याचं किल्ला म्हणूनही आणि जलदुर्ग म्हणूनही अशा दोन्ही अर्थांनी महत्त्वं होतं.

शिवरायांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात बांधायला घेतलेल्या किल्ल्यांपैकी एक पद्मदुर्ग किल्ला मानला जातो.

पद्मदुर्गचा इतिहास

ऐतिहासिक कागदपत्रांनुसार 1678 च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी आणि पद्मदुर्ग या दोन किल्ल्यांच्या बांधकामाला सुरुवात केली.

इथे एक नोंद नमूद करणं आवश्यक आहे की, रायगड जिल्हा गॅझेटिअरमधल्या नोंदीनुसार 1693 साली पद्मदुर्ग बांधला गेला. मात्र, रायगड जिल्ह्याच्या गॅझेटिअरची नोंद ग्राह्य धरल्यास शिवरायांच्या निधनानंतर दुर्ग बांधल्याचं दिसून येतं.

मात्र, इतर सर्व संशोधनांमध्ये पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधणीस सुरुवात झाल्याचं वर्ष म्हणून 1675 ते 1678 दरम्यानचे वर्षच सापडतात.

रायगड जिल्हा गॅझेटिअरमधील किल्ला बांधणीचे वर्ष हे किल्ला बांधून पूर्ण झाल्याचं वर्ष असण्याची शक्यता अधिक असल्याचं संशोधकांना वाटतं. कारण शिवरायांनी किल्ला बांधणीस सुरुवात केली, मात्र पूर्णत्त्वाला छत्रपती संभाजीराजांच्या काळात गेला, असं इतिहास संशोधकांना वाटतं.

शेकडो संकटांचा सामना करता शिवरायांनी पद्मदुर्गच्या उभारणीस सुरुवात केली होती.

मुळात पद्मदुर्गाची उभारणी सिद्दीला मानवणारी नव्हतीच. कारण त्याच्या वर्चस्वाला थेट आव्हान शिवरायांनी पद्मदुर्गाच्या उभारणीस सुरुवात करून दिलं होतं. त्यामुळे सिद्दीने वेगवेगळ्या प्रकारे पद्मदुर्गाच्या बांधकामास अडचणी निर्माण केल्या.

त्यावेळी शिवरायांनी दर्यासारंग इब्राहिमखान आणि दौलतखान यांना कांसा बेटावरील (पद्मदुर्गाची उभारणी करणाऱ्या) लोकांना संरक्षण देण्याचा हुकूम सोडल्याची नोंद सापडते.

पद्मदुर्गचे किल्लेदार म्हणून मराठा साम्राज्यातील काही सरदारांची नावं इतिहास संशोधकांनी नोंदवली आहेत. त्यानुसार, 1684-85 या काळात रामाजी नाईक हे पद्मदुर्गचे हवालदार होते, नंतर इ. स. 1702 च्या दरम्यान सुभानजी मोहिते हे पद्मदुर्गाचे किल्लेदार बनले.

28 एप्रिल 1704 मधील पद्मदुर्ग किल्ल्याविषयी एक पत्र आहे. हे पत्र नीळकंठ पिंगळे आणि परशुराम त्र्यंबक यांनी लिहिलेलं आहे.

नीळकंठ पिंगळे हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे पुत्र, तर परशुराम त्र्यंबक हे मराठा साम्राज्याचे सरदार होते.

नीळकंठ पिंगळे आणि परशुराम त्र्यंबक यांनी बहिरो पंडित यांच्या वंशजांना हे पत्र लिहिलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरे पद्मदुर्ग किल्ल्याच्या खर्चासाठी आणि देखभालीसाठी बहिरो पंडित यांना दोन गावे नेमून दिली होती. कराराप्रमाणे ती गावे आता पद्मदुर्ग किल्ल्याच्या कारकुनाच्या स्वाधीन करावी आणि यातून कोणतीही अफरातफर करू नये.’

एखाद्या किल्ल्याच्या देखभालीसाठी त्याकाळी काही गावं नेमून दिली जात असत. या गावांमधून होणारी करवसुली किल्ल्याच्या देखभालखर्चासाठी वापरली जात असे. ही तत्कालीन पद्धत लक्षात घेतल्यास आणि त्याअनुषंगाने वर नमूद केलेलं पत्र पाहता, हे लक्षात येतं की, छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला नुसता बांधला नाही, तर त्याच्या देखभालीचीसुद्धा व्यवस्था लावून दिली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर काही वर्षांनी म्हणजे इ. स. 1710 च्या सुमारास सिद्दी सुरुलखान यानं मराठ्यांकडून ‘पद्मदुर्ग’ घेतला. त्यावेळी पद्मदुर्गाचे हवालदार जनाजी पवार होते, तर मुजुमदार मल्हार नारायण चेऊलकर होते.

त्यानंतर इ. स. 1732 मध्ये पेशव्यांनी जंजिऱ्याला वेढा घातला. यावेळी सिद्दी आणि पेशवे यांच्यात तह होऊन जंजिरा आणि पद्मदुर्ग हे किल्ले सिद्दीकडेच राहिले, तर बिरवाडी, तळे आणि घोसाळे हे किल्ले पेशव्यांकडे राहिले.

पद्मदुर्ग’ पुन्हा मराठ्यांकडे कधी आला?

महाराष्ट्र सरकारच्या गॅझेटिअरनुसार, मानाजी आंग्रेंच्या मृत्यूनंतर रघुजी आंग्रेंकडे त्यांचा वारसा आला. त्यावेळी सिद्दीनं मराठ्यांच्या राज्यावर आक्रमण केलं आणि बरीच मंदिरं उद्ध्वस्त केली. मात्र, पेशव्यांच्या मदतीनं रघुजीनं सिद्धीचं आक्रमण परतवून लावलं.

नुसतं सिद्दीला रघुजीनं परतवलं नाही, तर मोठ्या लढाईनंतर 28 जानेवारी 1759 रोजी सिद्दीच्या ताब्यातील उंदेरी किल्लाही मिळवला. पेशव्यांनी या लढाईत मदत केल्यानं रघुजीनं उंदेरी किल्ला पेशव्यांना भेट म्हणून दिला. उंदेरी किल्ल्याला पुढे जयदुर्ग असं नाव देण्यात आलं.

याच लढाईदरम्यान 21 फेब्रुवारी 1759 रोजी सिद्दीच्या ताब्यात असलेला कांसा किल्ला (पद्मदुर्ग) सुद्धा रघुजीनं मिळवला.

असं म्हटलं जातं की, सदाशीवराव भाऊंनी रघुजीला उत्तरेत बोलावलं नसतं, तर जंजिरा किल्लाही त्यांनी जिंकला असता. रघुजी हे आंग्रेंच्या इतर शासकांपेक्षा वेगळे होते, सर्वाधिक सतर्क होते.

पुढे ब्रिटीश सत्ताकाळात पद्मदुर्ग किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांनी या किल्ल्यावर तुरुंग सुरू केला असावा, असं संशोधकांन वाटतं. कारण इथे तुरुंगसदृश खोल्या आजही दिसून येतात.

आज पद्मदुर्ग किल्ल्याची अवस्था एखाद्या ओसाड जागेसारखी बनली आहे. आपल्या शासन-प्रशासनाचं त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. शिवरायांनी उभारलेल्या जलदुर्गांच्या साखळीतला हा महत्त्वाचा दुर्ग. मात्र, या महत्त्वाच्या ऐतिहासिक ठेव्याच्या देखभालीबाबत हलगर्जीपणा किल्ल्यकडे आज पाहताना दिसून येतो.

शासन-प्रशासनाचं दुर्लक्ष होत असलं, तरी गेल्या साडेतीनशे वर्षांहून अधिक काळ ‘पद्मदुर्ग’ छाती फुगवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत अभिमानानं उभा आहे.

‘पद्मदुर्ग’च्या बुरुजावर अरबी समुद्राच्या लाटा आपटून दगड झिजले, मात्र चुन्याचा दर्जा अजूनही शाबूत आहे. हा किल्ला जसा शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो, तसंच त्यांच्या किल्ले बांधणीची कसबही सांगतो.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)