वर्षातील शेवटच्या 'सुपरमून'चं दर्शन, जाणून घ्या याबाबतची काही तथ्य अन् मिथकं

    • Author, जेरेमी हॉवेल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गुरुवारी (4 डिसेंबर) रोजी आकाशात पौर्णिमेच्या रात्री सुपरमूनचं दर्शन झालं. याला कोल्ड मून असंही म्हटलं जातं.

बीबीसी वेदरनं दिलेल्या माहितीनुसार, हा 2025 मधला शेवटचा सुपरमून असणार आहे.

डिसेंबरची पौर्णिमा कोल्ड मून म्हणून ओळखली जाते, ती हिवाळ्याची सुरुवात दर्शवते, ती संक्रांतीच्या जवळ जाणारी असते.

'कोल्ड मून' आपल्याला सर्व ठिकाणांहून पाहता येऊ शकेल.

याआधी, 7 सप्टेंबरला भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये 'पूर्ण चंद्रग्रहण' दिसलं होतं. या दिवशी चंद्र लाल आणि नेहमीपेक्षा मोठा दिसतो. अशा चंद्राला 'ब्लड मून' म्हटलं जातं.

हे पूर्ण चंद्रग्रहण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आशियातील बहुतेक भागामध्ये दिसलेलं. यामध्ये आफ्रिकेचा पूर्व भाग, युरोप, पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचा समावेश होता.

चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला असतो तेव्हा पौर्णिमा होते. कारण, अशा स्थितीतच आपल्यासमोरील चंद्राची एक बाजू पूर्णपणे उजळून निघालेली दिसते.

जगातील कोणतीही संस्कृती असो, त्यामध्ये चंद्राबाबत काही ना काही महत्त्व विशद केलेलं आहेच. विशेषत: जगभरातील बऱ्याच संस्कृतींमध्ये तसेच परंपरांमध्ये पौर्णिमेच्या चंद्राला तर अधिकच महत्त्व दिलेलं असल्याचं दिसून येतं.

या पौर्णिमेनिमित्त आपण आता जगभरातील संस्कृतींमध्ये पूर्णाकृती चंद्राबाबत असलेल्या मिथककथा, लोकसंस्कृतीतील धारणा, परंपरा आणि त्यांचे अर्थ यांचा धांडोळा घेणार आहोत.

आपल्या पूर्वजांसाठी कसा महत्त्वाचा होता पौर्णिमेचा चंद्र?

चंद्राच्या कला दिवसागणिक वाढत आणि कमी होत जातात, हे आपल्याला ठाऊकच आहे. आपले पूर्वज कालगणनेसाठी चंद्राच्या याच कलांचा वापर करायचे.

'इशांगो बोन' हे याचंच एक उदाहरण आहे. ते 1957 साली म्हणजेच आधुनिक काळातील डेमोक्रॅटीक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये सापडलं होतं. ते जवळपास 20 हजार वर्षे जुनं आहे. ते 'बबून'चं (माकडाची प्रजात) हाड असावं.

गुडघा ते पाऊल यांमधल्या पायाचा जो पुढचा भाग असतो, तिथलं हे हाड असावं. या हाडाचा वापर त्यावेळी कालगणनेसाठी कॅलेंडर म्हणून केला जात असावा, असं तज्ज्ञांचं मत आहे.

एका बेल्जियन भूगर्भशास्त्रज्ञाला हे हाड सापडलं होतं. या हाडावर विशेष खुणा आणि नक्षी दिसून येते. त्यावर अशा काही खुणा आहेत ज्यामध्ये हलकी, गडद किंवा अर्ध वर्तुळे दिसतात. हार्वर्डमधील पुरातत्वशास्त्रज्ञ अलेक्झांडर मार्शॅक यांनी या हाडाचा अभ्यास केला.

त्यांच्या अभ्यासातून त्यांना असं आढळून आलं की, या हाडांवरील खुणा या चंद्राच्या वेगवेगळ्या कलांच्या निदर्शक असू शकतात.

तसेच हे हाड 'लूनार कॅलेंडर' म्हणून वापरलं जात असावं. 'लूनार कॅलेंडर' हे चंद्राच्या कलांवर आधारित सहा महिन्यांसाठीचं कॅलेंडर असतं.

पौर्णिमेच्या पूर्णाकृती चंद्राला 'हार्वेस्ट मून' या विशेष नावानं संबोधलं जातं. हे शरद ऋतूत (सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस) सूर्य विषुववृत्ताच्या वर असण्याच्या वेळी (या स्थितीला इक्वीनॉक्स म्हणतात) दिसून येतं. यावेळी, चंद्र सूर्यास्त झाल्यानंतर लगेचच उगवतो.

पूर्वीच्या काळी, शेतकरी उशिरापर्यंत काम करुन या पूर्णवेळ असणाऱ्या प्रकाशाचा वापर करत असत. सध्याचे शेतकरी, त्याऐवजी विजेचे दिवे वापरताना दिसतात.

पौर्णिमेच्या दिवशी कोणते सण असतात?

जगातील वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये पौर्णिमेच्या दिवशी वेगवेगळे सण साजरे केले जातात. चीनमध्ये मिड-ऑटम फेस्टिव्हलला 'झोंगक्यु जी' किंवा 'मून फेस्टिव्हल' असंही म्हणतात.

हा सण 'हार्वेस्ट मून' दिवशी साजरा केला जातो. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. हा उत्सव साधारणत: 3 हजार वर्षांपूर्वी सुरू झाला होता. चांगलं पीक प्राप्त व्हावं, यासाठी लोकांनी हा सण साजरा करण्यास सुरुवात केली होती.

अगदी याचप्रमाणे कोरियामध्येही असाच सण साजरा केला जातो.

कोरियामधील 'चुसेओक' नावाचा हा उत्सव तीन दिवस चालतो. हा सणदेखील हार्वेस्ट मूनच्या दिवशीच असतो. या दिवशी, आपल्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी तसेच मिळालेल्या पिकांबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी लोक कुटुंबासह एकत्र येत आनंदोत्सव साजरा करतात.

हिंदू संस्कृतीमध्ये, पौर्णिमेच्या चंद्राला अनुसरुन अनेक सण दिसून येतात. कारण, भारतामध्ये अनेक संस्कृती अस्तित्वात आहेत. पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या सणाला हिंदू लोक उपवास करतात तसेच प्रार्थनाही करतात.

अशीच एक महत्त्वाची पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा. ती नोव्हेंबर महिन्यात येते. हिंदू कॅलेंडरमध्ये हा सर्वात पवित्र महिना समजला जातो.

भगवान शिवाचा राक्षसावरील विजयाचा दिवस, तसेच विष्णूचा पहिला म्हणजेच मत्स्य अवतार अस्तित्वात आला तो दिवस म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

या दिवशी लोक नद्यांमध्ये स्नान करतात आणि मातीचे दिवे लावतात. कुंभमेळाही पौर्णिमेलाच सुरू होतो. दर 12 वर्षांतून एकदा येणाऱ्या कुंभमेळ्याला हिंदू संस्कृतीत विशेष स्थान आहे.

बुद्ध धर्मामध्येही पौर्णिमेचं स्थान अनन्यसाधारण आहे. कारण, 2500 वर्षांपूर्वी पौर्णिमेच्या दिवशीच गौतम बुद्धांचा जन्म झाला असल्याचं सांगितलं जातं. त्यांना झालेला साक्षात्कार आणि त्यांचं महानिर्वाणदेखील पौर्णिमेच्या याच दिवशी झालं, असं म्हटलं जातं.

बुद्ध जन्माचा हाच दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणवला जातो. सहसा हा दिवस एप्रिल अथवा मे महिन्यात येतो.

श्रीलंकेतील पौर्णिमा थोडी अधिकच खास असते. कारण, तिथे प्रत्येक पौर्णिमेला सार्वजनिक सुट्टी असते. त्या दिवसाला ते 'पोया' असं म्हणतात. या दिवशी मद्य तसेच मांस वर्ज्य असतं.

बालीमध्ये (इंडोनेशिया) पौर्णिमेला 'पूर्णमा' म्हणतात. याच दिवशी देवी-देवता पृथ्वीवर अवतरले, असा तिथल्या लोकांचा समज आहे. या दिवशी ते देवाला प्रार्थना करतात, नैवेद्य देतात तसेच आपल्या बागेत फळझाडं लावतात.

मुस्लीम संस्कृतीमध्ये पूर्णाकृती चंद्राला मोठं स्थान आहे. पौर्णिमेच्या चंद्राच्या आसपास मुस्लीम धर्मीय सलग तीन दिवस उपवास करतात. या दिवसांना 'अल-अय्याम अल-बिद' असं म्हणतात.

इस्लामी कॅलेंडरमधील 13, 14 आणि 15 या तीन तारखांना हा उपवास केला जातो. प्रेषित मुहम्मद या दिवशी अल्लाहचे आभार मानण्यासाठी उपवास करत असत, असं सांगितलं जातं.

ख्रिश्चन धर्मामध्ये 'इस्टर' हा सण देखील पौर्णिमेच्या दिवशीच येतो. वसंत ऋतूमध्ये 'इक्वीनॉक्स' म्हणजेच सूर्य विषुववृत्तावर येऊन गेल्याच्या पहिल्या पौर्णिमेनंतर पहिल्या रविवारी हा उत्सव साजरा केला जातो.

मेक्सिको तसेच इतर अनेक लॅटिन अमेरिकन देशांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी महिला एकत्र येतात आणि 'मून डान्स' करतात. पौर्णिमेच्या आसपास तीन दिवस महिला एकत्र जमतात, नाचतात, आनंद साजरा करतात तसेच प्रार्थनाही करतात.

पौर्णिमेच्या अनुषंगाने प्रचलित मिथकं

युरोपामध्ये प्राचीन काळापासून असं समजलं जातं की, पौर्णिमेच्या काळात काही लोकांमध्ये वेडसरपणा येतो. लोकांमध्ये येणारा मुर्खपणा वा वेडसरपणाचा संबंध पूर्णाकृती चंद्राशी जोडला जातो.

म्हणूनच इंग्रजीतील 'लूनासी' हा 'वेडसरपणा'ला समानार्थी असणारा शब्द 'लूना' (चंद्र) या लॅटीन शब्दावरुन निर्माण झाला आहे.

बऱ्याच लोकांना असं वाटतं की, पौर्णिमेच्या काळात काही लोक जंगली श्वापदासारखं हिंस्त्र आणि अनियंत्रित पद्धतीनं वागतात. यातूनच त्या संस्कृतीत 'वेअरवॉल्फ'चं मिथक निर्माण झालं आहे.

या मिथकानुसार, एखादी व्यक्ती पौर्णिमेच्या दिवशी लांडग्यात रुपांतरित होऊ शकते. लांडग्यात रुपांतरित झालेल्या अशा व्यक्ती हिंस्त्र वागतात, त्या हल्ला करतात आणि दहशत निर्माण करतात.

इसवीसन पूर्व चौथ्या शतकामध्ये ग्रीक इतिहासकार हेरोडोटस यांनी न्यूरी नावाच्या एका जमातीबद्दल लिहिलं होतं. त्यांनी असा दावा केला होता की, या जमातीचे लोक (जे सध्या रशियामध्ये राहतात) दरवर्षी काही दिवस लांडगे बनतात.

युरोपामध्ये याच गैरसमजुतीतून 15व्या ते 17व्या शतकादरम्यान काही लोकांवर ते लांडगे असल्याचा आरोप करण्यात येत होता.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. त्यापुढे त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात येत होता आणि त्यांना शिक्षाही देण्यात येत होती.

यासंदर्भातील सर्वांत प्रसिद्ध प्रकरण 1589 साली जर्मनीमध्ये घडलं होतं. पीटर स्टब (किंवा स्टंप) नावाच्या माणसावर याच मिथकानुसार तो वेअरवॉल्फ असल्याचा आरोप करण्यात आला होता.

त्याला माणसामधून लांडग्यामध्ये परिवर्तीत होताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलंय, असा दावा काही शिकाऱ्यांनी केला होता.

यानंतर पीटरला अटक करण्यात आली आणि त्याचा अतोनात छळ करण्यात आला. सरतेशेवटी, या छळाला कंटाळून पीटरने त्यांचं म्हणणं मान्य केलं.

त्यानं हे कबूल केलं की त्याच्याकडे एक 'जादूई पट्टा' आहे ज्यामुळे तो वेअरवॉल्फ अर्थात लांडगा बनू शकतो. पुढे त्याने असाही दावा केला की, लांडग्याच्या रूपात त्याने अनेक लोकांची शिकार केली असून त्यांना खाऊनही टाकलंय.

पौर्णिमेचा चंद्र दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करतो?

अभ्यासातून निघालेले निष्कर्ष दाखवून देतात की, पौर्णिमेच्या दिवशी वा त्या काळात लोकांना झोपायला जास्त वेळ लागतो.

एकतर ते कमी वेळ झोपतात वा कमी वेळ गाढ झोप घेतात. या काळात लोकांच्या शरीरात मेलाटोनिन हे संप्रेरक कमी प्रमाणात तयार होतं. हे संप्रेरक खरं तर झोपेला मदत करतं.

या अभ्यासामध्ये सहभागी झालेले लोक सांगतात की, या काळात चंद्रप्रकाशही पोहोचू शकत नाही अशा अगदी पूर्णपणे बंद असलेल्या खोल्यांमध्ये झोपल्यावरही पौर्णिमेच्या वेळी त्यांना फार चांगली झोप लागली नाही.

बागकाम करणारे काहीजण पौर्णिमेदरम्यान बिया पेरून लागवड करतात. त्यांचा असा विश्वास आहे की, पौर्णिमेचा चंद्र मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो. इंडोनेशियातील बालिनी लोक पौर्णिमेच्या वेळी याच समजुतीतून फळझाडं लावतात.

पौर्णिमेच्या वेळी, चंद्राचं गुरुत्वाकार्षण पृथ्वीला एका बाजूला खेचतं; तर सूर्याचं गुरुत्वाकर्षणही दुसऱ्या बाजूला खेचू लागतं.

याच कारणास्तव समुद्राला भरती येते. काहींचा असा विश्वास आहे की या काळात मातीच्या पृष्ठभागावर अधिक ओलावा निर्माण होतो. त्यामुळे झाडे वाढण्यास चांगली मदत होते.

पौर्णिमेच्या काळात प्राणीही अधिक आक्रमक होतात, असा एका अभ्यासाचा दावा आहे. या काळात प्राण्यांकडून चावा घेण्याचं प्रमाण अधिक असतं, असं पौर्णिमेदरम्यान यूके (ब्रॅडफोर्ड, 2000) मध्ये केलेल्या अभ्यासात आढळून आलं आहे.

1997 ते 1999 च्या दरम्यान, पौर्णिमेच्या रात्री प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे जखमी झालेले सर्वाधिक लोक रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, एखाद्या लांडग्याने चावा घेतल्याची नोंद या अभ्यासात नमूद नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)