You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्राची दुसरी बाजू कशी दिसते? ती आपण कधीच का पाहू शकत नाही?
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
चंद्राचा कुठलाही फोटो काढला की कायम एकसारखाच दिसतो. याचं कारण म्हणजे चंद्राची कायम एकच बाजू पृथ्वीवरून दिसते.
मग चंद्राची दुसरी बाजू नाहीय का? आणि जर आहे तर ती कशी दिसते?
चंद्राची दुसरी बाजू का दिसत नाही?
आपल्याला शाळेतच एक शिकवली गेली होती, ती म्हणजे चंद्राला पृथ्वीभवती प्रदक्षिणा घालायला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ चंद्राला स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला लागतो.
त्यामुळे चंद्राची एकच बाजू कायम पृथ्वीवरून दिसत राहते. हा काही योगायोग नसून, अब्जावधी वर्षांमध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे निश्चित झालेलं चंद्राचं हे कालचक्र आहे.
पण हे दिसतं तितकं सोपं नाही.
खगोलशास्त्रज्ञ डॉ. ॲलेस्टर गन सांगतात की, "चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा अंडगोलाकार अर्थात elliptical आहे. त्यामुळे कधीकधी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असताना चंद्र स्वतःच्या अक्षाभोवती कधी थोडा मागे, कधी थोडा पुढे असतो. अशा परिस्थितीत चंद्राचा आपल्याला दिसणारा चेहरा जरा बदलू शकतो."
दुसरी गोष्ट म्हणजे, चंद्राचा अक्ष त्याच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेच्या 90 अंशात नाहीय, त्यामुळे आपल्याला कधीकधी चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशाकडचा थोडा-थोडा भागही दिसतो. त्यामुळे आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा एकूण 59 टक्के भाग दिसतो. पण दुसरी बाजू कधीही दिसत नाही.
मग असं कधी झालं नाहीय का की कुणी चंद्राच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पाहिलं आहे?
चंद्राची दुसरी बाजू कुणी पाहिली?
चंद्राची दुसरी बाजू सर्वांत आधी 1959 साली रशियाच्या लुना-3 या चांद्र मोहिमेने दाखवली होती. चंद्रावर यशस्वीरीत्या लँड होणारी लुना-3 ही तिसरी चांद्रमोहीम होती, पण चंद्राची दुसरी बाजू दाखवणारी पहिलीच मोहिम होती.
या मोहिमेने पाठवलेले चंद्राचे ते फोटो धुसर आणि मळकट होते, पण ते एका अशा बाजूचे होते, जे जगाने कधीही पाहिले नव्हते.
यात खगोलशास्त्रज्ञांना दिसलेला सर्वांत मोठा फरक म्हणजे, पृथ्वीवरून दिसणाऱ्या बाजूच्या तुलनेत या बाजूला थंडावलेल्या लाव्हांचे समुद्र नव्हते, ज्यांना मारिया म्हटलं जातं.
या मागच्या बाजूला अनेक लहानलहान क्रेटर आहेत, खड्डे आहेत, वेगवेगळ्या आकारांचे.
याच्या सुमारे 50 वर्षांनंतर 2009 साली अमेरिकेच्या नासा अंतराळ संस्थेच्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) ने चंद्राच्या पृष्ठभूमीचा अभ्यास करून अतिशय विस्तृत आणि अचूक असा चंद्राचा नकाशा तयार केला आहे.
त्याच्या आधारे जे चित्र लुना 3 मोहिमेने 1959 साली दिलं होतं, त्याचीच कैक पट स्पष्ट आवृत्ती LROने 50 वर्षांनंतर दिली आहे.
त्यानंतर 2015मध्ये नासाच्या DSCOVR या अंतराळात असलेल्या एका उपग्रहाने चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीच्या पार्श्वभूमीवर टिपली होती.
ही ऐतिहासिक दृश्यं होती, जी नासाच्या EPIC किंवा Earth Polychromatic Imaging Camera (EPIC) या चार मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याने कैद केली होती.
ही दृश्यं स्पष्ट करतात की चंद्राची दुसरी बाजू आहे आणि तिची अनेक रहस्यं उलगडणं अजूनही बाकी आहे.
हा व्हीडिओ पाहिलात का?
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)