दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील स्फोटानंतरचे 10 फोटो पाहा

दिल्लीतील अत्यंत गजबजलेल्या भागातील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये सोमवारी (10 नोव्हेंबर) स्फोट झाला.

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाला फोनवरून मिळाली होती. त्यानंतर सात गाड्या तातडीने रवाना करण्यात आल्या होत्या.

दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आज 6.52 वाजता सौम्य गतीनं चालणारी गाडी सिग्नलवर थांबली होती. त्या गाडीत स्फोट झाला आणि त्या स्फोटामुळे आसपासच्या गाड्यांनाही नुकसान झालं."

दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते संजय त्यागी यांनी रात्री 9.28 वाजता दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

संजय त्यागी यांनी बीबीसीबरोबर फोनवरून बोलताना ही माहिती दिली. स्फोटाच्या कारणाचा शोध घेतला जात असल्याचंही ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेबाबत माहिती दिली असून, त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना भेट देत त्यांची चौकशीही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट करत या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं.

"आज संध्याकाळी दिल्लीतील स्फोटात ज्यांनी प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या प्रती मी शोक व्यक्त करतो. जखमी झालेल्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं, ही प्रार्थना. प्रशासनाकडून पीडितांना सर्व आवश्यक मदत पुरवली जात आहे," असं पंतप्रधान म्हणाले.

तसंच गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आज 6.52 वाजता सौम्य गतीनं चालणारी गाडी सिग्नलवर थांबली होती. त्या गाडीत स्फोट झाला आणि त्या स्फोटामुळे आसपासच्या गाड्यांनाही नुकसान झालं.

एफएसएल, एनआयए अशा सर्व यंत्रणा इथे उपस्थित आहेत. काही लोकांचा मृत्यू झाला आहे आणि काही जखमी झाले आहेत.

आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. गृहमंत्र्यांनीही आम्हाला फोन केला होता. त्यांना वेळोवेळी माहिती दिली जात आहे."

राजधर पांडे नावाच्या एका स्थानिक रहिवाशानं याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "आम्ही घराच्या टेरेसवरून आगीच्या ज्वाळा पाहिल्या. त्यानंतर काय चाललं आहे, ते पाहण्यासाठी मी खाली आलो. खूप मोठा आवाज झाला. इमारतीच्या खिडकीचे काच हादरले. माझे घर गुरुद्वाराजवळ आहे."

स्फोटापासून काही अंतरावर वली उर रहमान होते. ते म्हणाले की, "स्फोट झाला तेव्हा मी दुकानात बसलो होतो. अचानक एवढा मोठा स्फोटाचा आवाज झाला जो मी आजवर ऐकला नव्हता. त्या स्फोटाच्या आाजानंतर मी तीन वेळा खाली पडलो. यानंतर, आजूबाजूचे सर्व लोक पळून जाऊ लागले."

दरम्यान, दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत पोलिसांकडून सर्वत्र खबरदारीचा इशारा देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)